computer

मशरूम आपापसात चक्क बोलतात आणि त्यांचा शब्दकोशही आहे.

सगळे सजीव प्राणी एकमेकांशी संवाद साधतात हे आपल्याला माहितीच आहे. माणसाने भाषा विकसित केली तर इतर प्राणी त्यांच्या विशेष आवाजात संवाद साधतात. पण कुठली वनस्पती संवाद साधते हे कोणी सांगितलं तर तुमचा विश्वास बसेल का! नाही ना? पण नुकत्याच एका संशोधनातून हे सिद्ध झाले आहे की मशरूम आपापसात चक्क बोलतात आणि त्यांचा शब्दकोशही आहे.


 

इंग्लंडमधील युनिव्हर्सिटी ऑफ द वेस्ट ऑफ इंग्लंडच्या प्रा. अँड्र्यू अ‍ॅडमॅटज्की यांनी हे नवे संशोधन केले आहे. त्या बाबतची सर्व माहिती ‘रॉयल सोसायटी ओपन सायन्स’ या नियतकालिकात प्रसिद्ध करण्यात आली आहे.

त्यांनी हे संशोधन एनोकी, स्प्लिट गिल, घोस्ट आणि कॅटरपिलर फंगी या 3 प्रजातींवर केले आहे. त्यांच्या मते फंगी म्हणजेच बुरशीत त्यासाठीचा मेंदू आणि चेतना दोन्ही असतात. त्यामुळे त्या संवाद साधू शकतात. त्या गोष्टीला स्पायकिंग पॅटर्न असे म्हणतात. त्यांचा जो  फंगल शब्दकोश आहेत त्यात  ५० शब्द असू शकतात. त्यातून पंधरा ते वीस शब्द ते वापरत असावेत.  प्रत्येक फंगल शब्दाची सरासरी लांबी ५.९७ अक्षरांची असते. म्हणजेच मानवी शब्दांपेक्षा थोडी मोठी.

आता हे मशरूम  काय संवाद  साधत असतील, असा प्रश्न पडतो. तर अभ्यासात असे दिसले आहे की, मशरूम आपापसात हवामान आणि आगामी धोक्यांशी संबंधित सूचना देतात.

तरीही, प्रोफेसर अँड्र्यू यांचे हे  अजब संशोधन  इतर  शास्त्रज्ञ  पूर्णपणे स्वीकारत नाहीत. त्यांच्या म्हणण्यानुसार यावर आणखी संशोधन होणे गरजेचे आहे, कारण अनेक प्रश्न अजूनही अनुत्तरीत आहेत. मशरूमच्या इलेक्ट्रिक अ‍ॅक्टिव्हिटीला भाषा ठरविणे घाईचे ठरू शकते.

कुठल्याही नव्या शोधाला बऱ्याच संशोधनातून जावे लागते. तरीही  "झाडे  बोलू लागली तर! "या विषयावर आतापर्यंत कल्पना केली जायची.  ती कल्पना आता मशरूमच्या रूपाने  प्रत्यक्षात येणार असे मानायला हरकत नाही.

शीतल दरंदळे

सबस्क्राईब करा

* indicates required