computer

अवघड वाटा दुर्गाच्या-जुन्नरजवळचा प्राचीन चावंडगड!! तिथं काय पाहाल? प्रत्येक गोष्टीचा इतिहास काय आहे? हे ही जाणून घ्या!!

मुंबई-पुण्यापासून माळशेज, नाणेघाट, जुन्नर हा परिसर तसा जवळ आहे. आपण दोन दिवस प्लॅन करून माळशेज घाट, नाणेघाट हा जुन्नर परिसर फिरू शकतो. याचमुळे आपल्याला या परिसरात पर्यटकांची गर्दी दिसते. परंतु या संपूर्ण जुन्नर परिसराला कमीत कमी दोन हजार वर्षांचा इतिहास आहे.

जुन्नर हि सातवाहनांची पहिली राजधानी होती. या विधानाला पुष्टी करणारे काही पुरातत्वीय पुरावे आपल्याला सापडले आहेत. संपूर्ण भारतात एकूण १६०० लेणी आहेत, त्यातील जवळपास १२०० लेणी या महाराष्ट्रात आहेत. या १२०० पैकी ९०० लेणी एकट्या पुणे जिल्ह्यात आहेत. त्यातली जवळपास ७०० लेणी जुन्नर परिसरात आपल्याला आढळतात. यावरून आपल्याला जुन्नरचं प्रचंड महत्त्व लक्षात येतं. या पुरातत्वीय पुराव्यांमुळेच अनेक अभ्यासकांनी जुन्नर हि सातवाहनांची पहिली राजधानी होती असं म्हटलं आहे.

ही सर्व पार्श्वभूमी लक्षात घेतली की आपल्याला नाणेघाटाचं महत्त्व ध्यानी येतं. त्यामुळे जुन्नर ते नाणेघाट या महत्वाच्या व्यापारी मार्गावर लक्ष ठेवण्यासाठी या परिसरात अनेक दुर्ग निर्मिले गेले. जुन्नरपासून नाणेघाटपर्यंत आपल्याला दुर्गशृंखला नजरेस पडते. यामध्ये शिवनेरी, हडसर, चावंड, जीवधन, निमगिरी-हनुमंतगड या दुर्गांचा समावेश होतो.

 

आज आपण या दुर्गशृंखलेमधील चावंड या दुर्गाची सफर करणार आहोत. चामुंड, चाऊंड, चावंड, प्रसन्नगड इ. या दुर्गाची नावे आहेत. यातील प्रसन्नगड हे नाव शिवछत्रपतींनी दिलेले आहे. या दुर्गाचे भौगोलिक वैशिष्ट्य असे आहे की हा आजूबाजूच्या सर्व डोंगरांपासून विलग झालेला आहे, त्यामुळे तो स्वतंत्ररित्या दिमाखात उभा आहे.

चावंडवाडी हे याच्या पायथ्याचे गाव आहे. आजमितीस तेथपर्यंत गाडी जाते व येथून पुढे नवीन बनविलेला पायरीमार्ग सुरु होतो. काही पायऱ्या चढून गेल्यावर जुना पायरीमार्ग सुरु होतो. हा मार्ग आपल्याला मुख्य प्रवेशद्वारापर्यंत घेऊन जातो. येथील मुख्य प्रवेशद्वारावर 'गणेश प्रतिमा' कोरलेली आहे. या प्रवेशद्वारातून थोडे पुढे गेल्यावर दोन वाटा लागतात. येथून उजवीकडील वाट उध्वस्त अवशेषांकडे घेऊन जाते. येथे कातळकोरीव पायऱ्या चढून गेल्यावर काही वास्तू नजरेस पडतात. येथील एका वास्तूचा चौथरा सुस्थितीत आहे. आपल्याला येथे असे अनेक चौथरे पाहायला मिळतात. बहुधा हे गडावरील मुख्य वस्तीचे ठिकाण असावे. सभोवतालच्या परिसराचा मुलकी (Administration) कारभार येथून चालत असावा. डावीकडील वाट ही तटबंदीच्या बाजूने जाते. येथून थोडे पुढे आल्यावर आपल्याला गडावरील शौचकूप पाहायला मिळतात. यावरून आपल्याला ज्यांनी या दुर्गाची निर्मिती केली त्यांचा स्वच्छतेकडे असणारा कल दिसून येतो. कारण प्रत्येक दुर्गावर वस्ती (Settlement) होती, त्याला अनुसरून वास्तुविशारदांनी दुर्गावर शौचकूपांची आखणी केलेली आहे. या दुर्गावर एक प्राचीन मंदिर आहे, मात्र सद्यःस्थितीत ते संपूर्णपणे भग्नावस्थेत आहे. याच मंदिरासमोर एक पुष्करणी आहे व त्यात एकूण १४ कोनाडे विविध मूर्ती ठेवण्यासाठी केलेले दिसतात. सध्या त्यात एकही मूर्ती नाही. या पुष्करणीमध्ये व हरिश्चंद्रगडावरील पुष्करणीमध्ये प्रचंड साम्य आहे. या दुर्गावर पाण्याचा प्रचंड प्रमाणात साठा असलेला दिसतो. कारण पाणी हे जीवन आहे, त्यामुळे आपल्याला प्रत्येक दुर्गावर मुबलक प्रमाणात पाण्याची टाकी असलेली दिसतात. ही टाकी दगड फोडून बनवलेली असतात, याच टाक्यातील दगड हे दुर्गावरील तटबंदी, वाडे इ. वास्तूंच्या बांधणीसाठी वापरले जात असत.

या दुर्गावर एक विशिष्ट टाकं आहे, त्याला सप्तमातृका टाकं असा संबोधलं जातं. देवी भागवताच्या संदर्भाप्रमाणे ब्राह्मी, माहेश्वरी, कौमारी, वाराही, इंद्राणी व चामुंडा या सप्तमातृका आहेत. यांमध्ये चामुंडा हि श्रेष्ठ मानली जाते. येथे एकूण सात पाण्याची टाकी आहेत. त्यामुळेच या दुर्गाचे चावंड हे नाव चामुंडा या नावाशी निगडित आहे. यावरूनच या टाक्यांना सप्तमातृका टाकी असे संबोधले जाते.

सप्तमातृका टाक्यांपासून उत्तरेकडे चालत गेल्यावर दुर्गाचा पठारी भाग संपतो व तिथून एक वाट आपल्याला खाली गुहांपाशी घेऊन जाते. या गुहा प्राचीन आहेत आणि अतिशय साधारण आहेत. यात कसलेही कोरीवकाम केलेले आढळत नाही. परंतु नंतरच्या काळात या गुहांचा वापर राज्यकर्त्यांनी त्यांच्या सोयीनुसार करून घेतलेला दिसतो, कारण येथे एकूण तीन गुहा असून नंतर त्यांनी त्यात भिंत बांधून गुहेचे विभाजन केलेले दिसते. चावंडच्या सर्वोच्च भागात चामुंडा देवीचे मंदिर आहे. ही या गडाची गडदेवी आहे. मंदिरातील मूर्ती जुनी असून मंदिराचा व बाहेरील दीपमाळेचा स्थानिकांनी जीर्णोद्धार केला आहे. येथेच आपल्याला एक नंदीची मूर्ती दृष्टीस पडते. एकंदर चावंडचा घेरा विस्तीर्ण असून साधारणतः याचा परीघ ५ ते ६ कि.मी. चा आहे.

आता आपण या किल्ल्याच्या इतिहासाकडे वळूया. बहमनी राज्याचा पाडाव झाल्यानंतर इ.स.१४८५ साली निजामशाहीची स्थापना करणाऱ्या मलिक अहमदला उत्तर कोकण प्रांतातील जे दुर्ग मिळाले त्यात चावंडचा समावेश होता. इ.स. १५९४ साली बुऱ्हान निजामशहा दुसरा याच्या बहाद्दर नावाच्या मुलास वर्षभर येथे कैदेत ठेवले होते. नंतर हा बुऱ्हान निजामशहा दुसरा अहमदनगरच्या गादीवर बसला. शहाजी राजांच्या जहागिरीत पुणे परिसरातील अनेक दुर्ग होते. त्यात चावंडचा समावेश होता. इ.स. १६३७ साली माहुली येथे मोगल व आदिलशहा यांच्या संयुक्त फौजांनी शहाजीराज्यांच्या निजामशाही सैन्याचा पराभव केला. त्यावेळी झालेल्या तहामध्ये हा दुर्ग मोगलांच्या ताब्यात गेला.

कवी जयराम पिंडे लिखित 'पर्णालपर्वतग्रहणाख्यान' या मराठा इतिहासाशी निगडित ग्रंथात चामुंडगड, हरिश्चंद्रगड, महिषगड (अज्ञात), अडसरगड (बहुदा जुन्नरजवळील हडसर हा दुर्ग असावा.), हे दुर्ग मराठ्यांनी मोठ्या जिकीरीने लढून जिंकले असा उल्लेख येतो. इंग्रजांनी १ मे १८१८ साली चावंडवर हल्ला केला व येथील पायऱ्या उध्वस्त करुन हा दुर्ग स्वतःच्या ताब्यात घेतला.

 

अशाप्रकारे चावंड किल्ला हा एक महत्वाचा किल्ला होता. जर आपण त्याकडे डोळसपणे बघितलं तर आपल्याला त्याचं महत्व नक्की ध्यानी येईल, नाहीतर इतरांप्रमाणे आपल्यालाही या दुर्गावर काहीही पाहण्यासारखा नाही असं वाटून जाईल. तर या चावंडबद्दल जर तुम्हांला अजून माहिती जाणून घ्यायची असेल व जे जे तुम्ही आत्ता वाचलं ते पाहायचं असेल तर 'दुर्गवाटा' या YouTube चॅनेलवर जाऊन चावंड चा व्हिडिओ नक्की बघा. त्यात तुम्हाला आजू काही गमतीजमती पाहायला मिळतील. त्या व्हिडिओची लिंक खाली देत आहे.

लेखक:अथर्व बेडेकर-पुरातत्त्व अभ्यासक

 

 

सबस्क्राईब करा

* indicates required