११००कोटींना विकली गेलेली जगातली सर्वात महाग कार!!
एखादी महाग कार घेण्यासाठी मध्यमवर्गीय माणसाचे आयुष्य जाते. पण कारशौकीनांची एक वेगळी दुनिया आहे. वेगवेगळ्या महाग गाड्या वापरणे हा त्यांचा छंद असतो. आता एक वेगळी कॅटेगरी असते ती म्हणजे जुन्या गाड्यांचे आकर्षण असणारी मंडळी. यांच्या संग्रहात अनेक जुन्या गाड्या दिसतात. या लोकांची हौस बघून अनेकदा जुन्या गाड्या लिलाव करून विकल्या जातात. त्यांना भाव पण चांगला मिळतो. आता मात्र एक ७० वर्ष जुनी मर्सिडीज ज्या किमतीत विकली गेली त्यामुळे डोळे पांढरे व्हायचे राहिलेत.
१९५५ साली मर्सिडीज कंपनीने 300 SLR Uhlenhaut Coupé या सिरीजमध्ये फक्त दोन कार तयार केल्या. म्हणजे तेव्हाच ही कार मिळणे कठीण होते. मर्सिडीजचे हे मॉडेल आधारित होते, W 196 R या मॉडेलवर. दोनदा वर्ल्ड चॅम्पियनशिप जिंकून देणारी म्हणून ही कार प्रख्यात होती. साहजिक 300 SLR या कारवर आधारित म्हणून तिने जी हवा करायची ती केली होती.
पण स्वतः हे मॉडेलही कमी ऐतिहासिक नाही. १२ पैकी ९ रेसिंग स्पर्धा जिंकण्याचा विक्रम या कारच्या नावावर आहे. १९५५ साली या कारचा चालक पियरे लेवेघ याने मात्र एकाच वेळी तब्बल ८३ प्रेक्षकांना या गाडीखाली चिरडून मारले. इतिहासात ही कार अशा एका मोठ्या दुर्घटनेला कारण ठरली होती. ही कार नंतर दिसली नाही तरी तिचे आकर्षण मात्र जराही कधी कमी झाले नाही.
दोनच कार त्यावेळेस तयार झाल्या असल्या तरी एक कार मर्सिडीजकडेच आहे आणि ती कंपनी म्युझियममध्ये ठेवली आहे. तर दुसरी आरएम सोथेबी या संस्थेमार्फत लिलावात काढण्यात आली. ही गाडी जागतिक कार्सच्या इतिहासात दागिना म्हणून ओळखली जाते. संबंधितांनी योग्य वेळ पाहून मग हा दागिना लिलावात काढला.
लिलाव झाला आणि जगातील आजवरची सर्वात महाग कार ठरली आहे. तब्बल ११०० कोटींमध्ये विकली गेली आहे. या रकमेत गावभरून मर्सिडीज कार विकत घेता आल्या असत्या, पण म्हणतात ना शौक बडी चीज है. याआधी फेरारी २५० जिटीओ ही कार ५४२ कोटींमध्ये विकली गेली होती, ती आजवरची सर्वात महाग कार होती.
आता मात्र या कारने सर्व विक्रम मोडले आहेत, यापुढे कित्येक वर्षे हा विक्रम मोडला जाऊ शकणार नाही. ज्या कुणी ही कार घेतली त्याचे नाव जरी बाहेर आले नसले तरी तो ती कार विशेष कार्यक्रमांवेळी लोकांना दाखवण्यात येणार असल्याचे कार विकत घेणाऱ्याने सांगितले आहे.
११०० कोटींची ही कार नेमकी दिसते कशी हे आता लोकांना पाहता येणार आहे. काहीही असले तरी लोक आपल्या हौसेपोटी पैसा खर्च करायला विचार करत नाहीत हेच खरे.




