इतिहासाला कलाटणी देणाऱ्या हत्या: रोज १०-१२ कप चहा आणि २००० लोकांच्या भेटी... बियांत सिंग खरोखर जमिनीवर असलेले मुख्यमंत्री होते!!
१९८० ते ९० चं दशक. पंजाबसाठी दहशतीचा आणि तितकाच वेदनादायक काळ. या काळात पंजाबमध्ये स्वतंत्र खलिस्तान निर्मितीच्या मागणीनं रौद्र रूप धारण केलं होतं. ब्रिटन, कॅनडा या ठिकाणी राहणाऱ्या शीख समुदायानंही स्वतंत्र खलिस्तानची मागणी केली होती. ही मागणी करण्यात अग्रेसर होती बब्बर खालसा नावाची संघटना. शिवाय सीमेपलीकडच्या देशातूनही या मागणीला उत्तेजन देणं सुरूच होतं. प्रत्येक गोष्टीला अंत असतो. तसाच याचाही झाला. पण त्याआधी या दहशतवादाने अनेकांचे जीव घेतले. पंजाबचे माजी मुख्यमंत्री बियांत सिंग हे त्यातीलच एक.
बियांत सिंग यांचा जन्म स्वातंत्र्यपूर्व काळातील पंजाबमध्ये एका लष्करी कुटुंबात झाला. सिंग यांनीही घराण्याची परंपरा पुढे सुरू ठेवली. शिक्षण पूर्ण केल्यानंतर ते लष्करात भरती झाले. फाळणीनंतर त्यांचं सगळं कुटुंब कोटलीजवळच्या बिलासपूर या ठिकाणी स्थलांतरित झालं. इथेच त्यांचा राजकारणात प्रवेश झाला. बिलासपूरचे सरपंच ते पंजाब विधानसभा हा प्रवास त्यांनी दशकभरात पूर्ण केला. त्यांची ही घोडदौड पुढे तशीच सुरू राहिली. १९९२ मध्ये ते काँग्रेसच्या तिकिटावर निवडून आले आणि मुख्यमंत्री झाले.
मुख्यमंत्री झाले तरी ते कायम जमिनीवर राहिले. त्याचं चहाप्रेम पूर्वीप्रमाणेच कायम राहिलं. घरचं साधं, शाकाहारी जेवण त्यांना जास्त आवडायचं. लोकांना प्राधान्य हे सूत्र त्यांनी शेवटपर्यंत कायम ठेवलं. प्रचंड बिझी होता हा मनुष्य. कारण जवळपास दोनएक हजार लोकांना ते रोज भेटायचे.
'ऑपरेशन ब्लू स्टार' नंतर पंजाबमधल्या अतिरेकी कारवायांना थोडा झटका बसला तरी त्या पूर्ण बंद होण्याचं नाव घेत नव्हत्या. स्वतंत्र खलिस्तान समर्थक तरुणांच्या टोळ्या अक्षरशः रस्त्यारस्त्यांवर फिरत माणसं मारायच्या. सरासरी २५ लोक रोज मारले जायचे. हा दहशतवाद मोडून काढण्यासाठी बियांत सिंगांनी अनेक कठोर निर्णय घेतले. त्यामुळे पंजाबमधील आतंकवादावर नियंत्रण मिळवता आलं. पण त्यातूनच त्यांना शत्रू निर्माण झाले. त्यांना संपवायचा कट केला गेला.
३१ ऑगस्ट १९९५. चंदीगडमधल्या सचिवालय इमारतीजवळ नेहमीप्रमाणेच वातावरण होतं. अशुभाची चाहूलही नव्हती. बियांत सिंग त्यांच्या कारजवळ येऊन पोहोचले. गाडीत बसण्याच्या तयारीत असतानाच एक कानठळ्या बसवणारा आवाज झाला, मागोमाग स्फोट. काय होतंय हे कळायच्या आत एका झटक्यात त्यांचा मृत्यू झाला. त्यांना मारणारा सुसाईड बॉम्बर होता दिलावर सिंह नावाचा तरुण. विशेष म्हणजे तो पंजाब पोलीस दलात काम करत होता. त्याने त्यांच्याजवळ येऊन त्याच्या शरीरावर असलेल्या बॉम्बचा स्फोट घडवून आणला होता. काम फत्ते करण्याचाच त्यांचा इरादा होता. पहिला हल्ला फसल्यास तिथून पुढे थोड्या अंतरावर त्याचा साथीदार बलवंतराय सिंग रजोआना त्या तयारीत होता, पण तशी वेळ आली नाही. त्याआधीच दिलावरने त्याचं काम केलं. हा स्फोट इतका शक्तिशाली होता की तिथे असलेल्या अन्य १८ लोकांचाही त्यात मृत्यू झाला. रस्त्यावर सगळीकडे रक्त आणि शरीराचे अवयव विखुरलेले होते. घटनेनंतर लगेचच बलवंत सिंगला अटक करण्यात आली. या सगळ्या हत्याकांडाचा मास्टरमाईंड हा खलिस्तान टायगर फोर्स या संघटनेचा स्वयंभू कमांडर जगतार सिंह तारा हा होता. त्याला ८ जून २००५ ला दिल्लीच्या स्पेशल सेलने अटक केली. त्याआधी म्हणजे साधारण सप्टेंबरमध्ये चंदीगड पोलिसांना दिल्लीची नंबर प्लेट असलेली एक बेवारस कार सापडली. या कारमध्ये या हत्याकांडाशी संबंधित काही पुरावे हाती लागले. त्याच्या आधारावर पोलिसांनी काही लोकांना ताब्यात घेतलं.
१९ फेब्रुवारी १९९६ ला चंदीगड सत्र न्यायालयात १२ जणांविरोधात चार्जशीट दाखल करण्यात आलं. ३१ जुलै २००७ ला बलवंतरायसिंह आणि जगतार सिंह यांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली. दोघांनी या निर्णयाविरोधात हायकोर्टात अपील केलं. १२ ऑक्टोबर २०१० रोजी उच्च न्यायालयाने बलवंतराय सिंहला दिलेली फाशीची शिक्षा कायम केली. त्यानंतर २८ मार्च २०१२ ला शिरोमणी गुरुद्वारा प्रबंधक कमिटीतर्फे बलवंतराय सिंहाच्या बाजूने राष्ट्रपतींकडे दयेचा अर्ज दाखल करण्यात आला. परिणामी केंद्रीय गृहमंत्रालयाला फाशीच्या शिक्षेच्या अंमलबजावणीला स्थगिती द्यावी लागली. या अर्जावर आजतागायत कोणतीही कार्यवाही झालेली नाही. आजही बलवंतराय सिंह हा पतियाळा येथील तुरुंगात आहे.
बियांत सिंग यांच्या मारेकऱ्यांना शिक्षा होणं हीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल. तो दिवस कधी येतो ते बघायचं.
स्मिता जोगळेकर




