यशस्वी होण्यापूर्वी १००९ वेळा अयशस्वी झालेले फास्ट फूडचे आजोबा!
जगातील १४५ देशांमध्ये २५,००० पेक्षा जास्त आउटलेट्स. प्रामुख्याने अमेरिका, चीन, जपान, रशिया, दक्षिण आफ्रिका, युनायटेड किंगडम, मलेशिया, थायलंड, ऑस्ट्रेलिया, भारत, आणि कॅनडा या देशांमध्ये अस्तित्व. सर्व ब्रॅंडसची एकूण विक्री $५.६५ बिलियनपेक्षा अधिक!! हे वर्णन वाचून चाणाक्ष वाचकांच्या लक्षात आलेच असेल की ही साधीसुधी नव्हे, तर एक बलाढ्य कंपनी आहे. ही आहे केएफसी किंवा केंटकी फ्राइड चिकन!! संस्थापक होते कर्नल हारलँड सँडर्स. कर्नल हारलँड सँडर्सची गाथा प्रेरणादायी आहे, कारण चिकाटी, समर्पण आणि महत्त्वाकांक्षा यांच्या बरोबरीने कठोर परिश्रम घेऊन यश कसे मिळवले जाते; तुमचं वय कितीही असलं तरी, याचे ते ज्वलंत उदाहरण आहे.
१९३० मधील महामंदीच्या काळात अगदी सुरुवातीलाकर्नल हारलँड सँडर्सनी रस्त्याच्या कडेला असलेल्या रेस्टॉरंटमधून तळलेले चिकन विकण्यास सुरुवात केली. नंतर त्यांनी रेस्टॉरंट फ्रॅंचायझिंगची क्षमता ओळखली आणि १९५२ मध्ये सॉल्ट लेक सिटी, युटा येथे पहिली फ्रँचायझी उघडली. ह्या कंपनीने हॅम्बर्गरच्या प्रस्थापित वर्चस्वाला आव्हान देऊन बाजारपेठेत विविधता आणली आणि फास्ट-फूड उद्योगात चिकन लोकप्रिय केले.
सर्वात आश्चर्याची गोष्ट म्हणजे त्यांचं वय. जेव्हा ते पासष्ट वर्षांचे झाले, तेव्हा अनेक वर्षे रेस्टॉरंट चालवल्यानंतर ते रूढार्थाने निवृत्त झाले. सरकारकडून त्यांना एकशे पाच डॉलर्सचा पहिला सामाजिक सुरक्षा चेक देखील मिळाला. विचार करा, वयाच्या पासष्टाव्या वर्षी एखादा माणूस काय करेल? समाधानाने निवृत्त होईल. बरोबर? नाही, ते एकशे पाच डॉलर्स कर्नल हारलँड सँडर्सकरीता त्यांच्या आंतरराष्ट्रीय कीर्तीची आणि आर्थिक यशोगाथेची फक्त सुरुवात होती.
कर्नल सँडर्सना त्यांनी बनवलेली तळलेली चिकन रेसिपी शेअर करायला खूप आवडत असे. त्यांनी बनवलेले चिकन ज्यांनी खाल्ले, त्यांच्याकडून त्यांना खूप सकारात्मक प्रतिसाद मिळाला. खरं तर कर्नल निवृत्त झाले होते आणि सेवानिवृत्तीचा काळ शांततेने व्यतीत करण्याऐवजी त्यांच्या नवीन चिकन रेसिपी जगातील खवय्यांपर्यंत पोचवायचं त्यांनी ठरवलं. कर्नल सँडर्सने अगदी घरोघरी आणि रेस्टॉरंट्समध्ये जाऊन आपली रेसिपी बनवून दाखवली. या व्यवसायात ते एखाद्या भागीदाराच्या शोधात होते. असं म्हणतात की कर्नल सँडर्स यांना पहिला होकार ऐकण्यापूर्वी १००९ वेळा नकाराचा सामना करावा लागला.
करार असा होता की रेस्टॉरंटने विकलेल्या चिकनच्या प्रत्येक तुकड्यासाठी सँडर्सना १ निकेल मिळेल. रेस्टॉरंटना रेसिपी माहित होऊ नये म्हणून फक्त काही गुप्त हर्बस आणि मसाल्यांची पाकिटे दिली जात. १९६४ पर्यंत कर्नल सँडर्सकडे ६०० फ्रँचायझी होत्या, ज्या त्यांच्या ट्रेडमार्क चिकन विकत होत्या. काही वर्षांनंतर त्यांनी आपली कंपनी $२ दशलक्ष डॉलर्सला विकली. परंतु कंपनीचा प्रवक्ता म्हणून ते कायम आपल्या फ्रॅंचाईजींना भेट देत राहिले. १९७६ मध्ये त्यांना जगातील दुसऱ्या क्रमांकाची सर्वात जास्त ओळखली जाणारी सेलिब्रिटी म्हणून स्थान देण्यात आले. त्यांचा पुतळा हॉंगकॉंगमधील कोलून येथील नॅथन रोडवर एका ठिकाणी उभा आहे. कर्नल सँडर्स त्यांच्या स्वच्छ, करकरीत पांढरा सूट, काळा टाय आणि छडी यावरून सहज ओळखता येतात.
केंटकीचा ब्रँड ॲम्बेसेडर असताना १९६८ मध्ये त्यांनी शेल्बीव्हिल, केंटकी येथे "क्लॉडिया सँडर्स डिनर हाऊस" हे रेस्टॉरंट आपल्या पत्नीच्या नांवाने उघडले. केंटकी चिकनचा ब्रॅंड न मिरवणारे हे एकमेव रेस्टाॅरंट आहे.
केंटकी फ्राइड चिकनची पाककृती हेच सगळ्यात मोठं सिक्रेट आहे. अर्थात तीच त्यांच्या अभूतपूर्व यशाचं खरं गमक आहे. ती रेसिपी गुप्त आहे आणि ती कायम गुप्त रहावी म्हणून तिच्याबद्दल कधीच जाहीर वाच्यता केली जात नाही. पण हेच जेव्हां कर्नल सँडर्स ह्यांना विचारण्यात आलं, तेव्हा ते हसून म्हणाले, "माझी जगविख्यात रेसिपी म्हणजे तुमच्या आमच्या स्वैपाकघरात उपलब्ध असलेले रोजच्या वापरातील घटक आहेत, आणखी काही नाही"!!




