भारतातली सर्वोत्तम १० हॉटेल्स!! नावे, ठिकाणे, खासियत आणि अंदाजे आकार.. सगळे काही जाणून घ्या!!
दरवर्षी सुट्ट्यांचे वेध लागले की सर्वजण नवनवीन ठिकाणी फिरायचे प्लॅन्स करतात. फिरायचे शहर किंवा एखादे ठिकाण ठरले की तिथे राहायचे कुठे हा प्रश्न पडतो. तुम्ही जर भारतात या शहरांना भेट देणार असाल आणि बजेटची चिंता नसेल, तर खालील ठिकाणी राहण्याचा जरूर विचार करू शकता. आज आम्ही तुमच्यासाठी भारतातील सर्वोत्तम १० हॉटेल्सची यादी घेऊन आलो आहोत.
१. रामबाग पॅलेस, जयपूर.
वाळवंटात वसलेलं असूनही राजस्थान मोठं देखणं आहे. याला पिंक सिटी- जयपूरही अपवाद नाही. तिथलं रामबाग पॅलेस हॉटेल सजावट, नक्षीदार खांबांचे कठडे, सुंदर जाळीदार नक्षीकाम आणि इथली मुघल गार्डन यांसाठी प्रसिद्ध आहे. इथे ३३ भव्य आणि आधुनिक निवासी दालने आहेत. राजस्थानी आदरातिथ्य आणि परंपरागत राजस्थानी भोजन तर आहेच. इथे राहायचे एका रात्रीसाठी किमान ३५,०००रुपये लागतात. जीएसटी वेगळाच!!
२. उमेद भवन पॅलेस, जोधपुर.
सन १९२८ ते १९४३ च्या दरम्यान बांधण्यात आलेले हे हॉटेल अतिशय भव्य आहे आणि हे जगातील सर्वात मोठे खाजगी हॉटेल म्हणूनही प्रसिद्ध आहे. याच हॉटेलमध्ये बॉलीवूड तारका प्रियांका चोप्राचे लग्न शाही थाटात झाले होते. हे सुध्दा ताज समूहाचे हॉटेल आहे. इथली सजावट व रंगसंगती अगदी भारावून टाकणारी आहे. या हॉटेलमध्ये वस्तुसंग्रहालय, टेनिस कोर्ट, स्क्वॅश कोर्ट, बिलीयर्ड रुम, लायब्ररी व बॉलरुम यासारख्या सुविधा उपलब्ध आहेत. महाराजा उमेद सिंग यांच्या नावावरून या हॉटेलचे नाव ठेवण्यात आले होते.
३. द ओबेरॉय उदयविलास, उदयपूर.
'सिटी ऑफ लेक ' म्हणजेच उदयपूरला कधी गेलात तर पिचोला तलावाच्या काठावर असलेल्या या अप्रतिम हॉटेलमध्ये नक्की भेट द्या. ११व्या शतकात बांधलेल्या या हॉटेलमध्ये ५० सुंदर खोल्या आणि स्वीट्स आहेत. इथे एका रात्रीच्या मुक्कामाचा खर्च तब्बल १,३८,४१५ रुपये आहे आणि जर तुम्हाला इथे लग्न करायचे असेल तर त्याचा खर्च ३,२१,७२,१७० रुपये आहे. येथील निवास व्यवस्था अत्याधुनिक स्वरुपाची आहे. आजूबाजूचा परिसर ही अत्यंत सुंदर आहे.
४, ताज फलकनुमा पॅलेस, हैदराबाद.
तब्बल ३२ एकर पहाडी परिसरावर वसलेले हॉटेल फलकनुमा म्हणजेच 'आकाशाचा आरसा '. हे हॉटेल १९ व्या शतकातील एक मोठा महाल आहे. इथून अख्खे हैदराबाद शहर दिसते. या आलिशान हॉटेलमध्ये ६० खोल्या आणि १०स्वीट्स् आहेत. या हॉटेलमध्ये एका रात्रीचे किमान भाडे २४ हजार रुपये आणि कमाल ४ लाखांच्या जवळपास आहे. इथली मोठमोठाली झुंबरे, आलिशान स्नानगृहे, बिलीयर्ड कक्ष आणि जेवणासाठी मोठी दालने भव्यतेत भरच घालतात. जगातील सर्वात मोठे डायनिंग टेबल याच ठिकाणी आहे.
५. द ताज महाल पॅलेस, मुंबई.
हे हॉटेल म्हणजे जमशेटजी टाटा यांनी त्यांच्या लाडक्या मुंबईला दिलेली भेट असे म्हणतात. ताज समूहाच्या या हॉटेलला विविध देशांचे राष्ट्राध्यक्ष, मोठे उद्योगपती तसेच चित्रपटसृष्टी व विविध क्षेत्रातील प्रतिथयश व्यक्ती यांची नेहमीच पसंती असते. मुंबईतील कुलाबा या मध्यवर्ती भागातील या सुंदर हॉटेलची वास्तुकला आणि सुंदर रचना बघून चकितच व्हायला होते. गेटवे ऑफ इंडिया या प्रसिद्ध परिसरातील या हॉटेलच्या खिडकीतून निसर्गाचे सुंदर रुप पाहण्यासारखे आहे.
६. मिहिर गड, राजस्थान.
प्रसिद्ध थर वाळवंटालगत असलेलं हे हॉटेल मेहरानगड किल्ल्यापासून ५३ किलोमीटर अंतरावर आहे. वाळवंटालगत असूनही इथे सुंदर बगिचे व झाडे आहेत. इथे राहिल्यावर तुम्हाला राजस्थानसारख्या एका ऐतिहासिक ठिकाणी रहाण्यासाठी सुखद अनुभव येईल. खासकरून इथला सूर्यास्त पाहण्यासारखा आहे. राजस्थानची संस्कृती जवळून अनुभवायची असल्यास इथे नक्की भेट द्यावी.एक रात्रीचे २८,००० पासून पुढे इथे भाडे सुरू होते.
७. द राविझ्, कोवलम.
केरळच्या सुंदर निसर्गात हे हॉटेल एका उंच कड्यावर वसवले आहे. तिथून अरबी समुद्र आणि कोवलम बीचचे विहंगम दृश्य दिसते. येथे खास जलतरण तलाव देखील आहेत. तसेच आरामदायी अनुभवासाठी स्पाची सोय उपलब्ध करुन देण्यात आली आहे. लाकडी शोभेच्या वस्तू, चहा-कॉफी मशीनसारख्या अद्ययावत सुखसोयींनी येथील दालने सुसज्ज आहेत. या हॉटेलमधून वाऱ्यावर डोलणारे माड व कोवलम बीचचे अतिशय सुंदर दृश्य दिसते. १ रात्रीचे १३,००० पासून भाडे सुरू होते.
८. कुमारकोम लेक रिसॉर्ट, कुमारकोम.
केरळच्या वेम्बनाड तलावाच्या काठावर वसलेल्या या रिसॉर्टमध्ये तुम्हाला रहाण्यासाठी सुंदर बंगले आणि त्याला लागूनच असलेले जलतरण तलाव आहे. तसेच हाऊसबोटमधील अस्सल केरळीय भोजनाची मेजवानी देखील आहे. त्याखेरीज सूर्यास्ताचे मनोहर दृश्य टिपण्यासाठी मोठ्या बोटीतून खास 'सनसेट राईड' ची व्यवस्था आहे. या रिसॉर्टच्या परिसरात खळाळत्या पाण्याचा नाद आणि पक्ष्यांचा मधुर किलबिलाट सतत कानावर पडत रहातो. इथे एका रात्रीसाठी किमान २३,०००रुपये मोजावे लागतील.
९. द लीला पॅलेस, दिल्ली.
हे हॉटेल ग्रँड डिलक्स किंवा उच्च दर्जाच्या सुखसोयीसाठी प्रसिद्ध आहे. या हॉटेलमध्ये एका रात्रीच्या मुक्कामासाठी तुम्हाला सुमारे ११,००० रुपये मोजावे लागतील. नवी दिल्लीच्या या हॉटेलमध्ये सर्वप्रकारच्या सोयी उपलब्ध आहेत. नवी दिल्लीतील वैशिष्ट्यपूर्ण ठिकाणांना भेट द्यायचे असेल तर या हॉटेलचा प्राधान्याने विचार करावा लागेल. येथील निवासी दालने सुंदररित्या सजविण्यात आली असून 'स्पा ' मध्ये आयुर्वेदिक पद्धतीचे वेगवेगळे पर्याय उपलब्ध आहेत.
१०. द मचाण, लोणावळा.
मुंबई आणि पुणेकरांना अगदी मध्यवर्तीत असणारे हे लोणावळ्यातले हॉटेल घनदाट जंगलात आहे. या हॉटेलच्या भोवताली असलेल्या हिरवागार परिसराचा नयनरम्य देखावा पाहण्यासाठी या हॉटेलमध्ये जमिनीपासून उंचावर बांधलेल्या विविध मचाणांची व्यवस्था करण्यात आली आहे. मचाणांचे असे बरेच पर्याय इथे उपलब्ध आहेत. जंगल मचाण, चांदण्यांचा प्रकाश असणारे मचाण इ. ज्यामधून निवड करणे खरोखरच कठीण आहे. त्याशिवाय वेळ घालविण्यासाठी, पक्षी निरीक्षण, निसर्ग भ्रमंती व तारे दर्शन असे जरा हटके पर्याय पण उपलब्ध आहेत. घनदाट जंगलाच्या सान्निध्यात रहाण्याचा अनुभव घेण्याची इच्छा असणाऱ्या सर्वांना, विशेषतः निसर्ग प्रेमीना हे हॉटेल नक्कीच आवडेल. इथले एका रात्रीचे दर १६,००० पासून पुढे सुरू होतात.
यातली काही ठिकाणं अतिमहाग आहेत, पण किमान अशा ठिकाणांची माहिती ठेवायला काय हरकत आहे? कधीतरी अशा ठिकाणी जायचा योग येईलच!!
शीतल दरंदळे




