क्रिकेट इतिहासातील टॉप -५ फलंदाज ज्यांनी वनडे क्रिकेटमध्ये झळकावले आहेत सर्वाधिक अर्धशतक, यादीत २ भारतीयांचा समावेश ..
क्रिकेटमध्ये सुरुवाती पासूनच फलंदाजांचा बोलबाला राहिला आहे. मात्र आजकाल गोलंदाज देखील चमकदार कामगिरी करत आहेत. फलंदाजाला बाद करण्यासाठी गोलंदाजाला केवळ १ चांगल्या चेंडूची आवश्यकता असते. मात्र फलंदाजाला शतक आणि अर्धशतक झळकावण्यासाठी संयम बाळगावं लागतं. इतकेच नव्हे तर शॉट खेळण्यासाठी योग्य चेंडूची निवड करावी लागते. कारण एक चूक फलंदाजाला बाद करू शकते. मात्र गोलंदाजांना चोप देत फलंदाज मोठ मोठे विक्रम करत असतात. आज या लेखातून आम्ही तुम्हाला टॉप - ५ फलंदाजांबद्दल माहिती देणार आहोत ज्यांनी वनडे क्रिकेटमध्ये सर्वाधिक वेळेस अर्धशतक झळकावले आहे.
५) इंजमाम उल हक (Inzamam-ul-haq) :
वनडे क्रिकेटमध्ये सर्वाधिक अर्धशतक झळकावणाऱ्या फलंदाजांच्या यादीत इंजमाम उल हक (Inzamam -ul -haq) पाचव्या स्थानी आहे. इंजमाम उल हकने पाकिस्तान संघासाठी एकूण ३७८ वनडे सामने खेळले आहेत. यादरम्यान त्याने फलंदाजी करताना ११७३९ धावा केल्या आहेत. तसेच त्याने ८३ अर्धशतक झळकावले आहेत.
४) राहुल द्रविड (Rahul Dravid) :
भारतीय संघाची भिंत म्हणून ओळखल्या जाणाऱ्या राहुल द्रविडने देखील वनडे क्रिकेटमध्ये ८३ अर्धशतक झळकावले आहेत. १६ वर्षाच्या कारकिर्दीत त्याने भारतीय संघासाठी एकूण ३४४ सामने खेळले, ज्यात त्याने ३९.१७ च्या सरासरीने १०८८९ धावा केल्या.
३) जॅक कॅलिस (Jacques Kallis) :
दक्षिण आफ्रिकेचा माजी अष्टपैलू खेळाडू जॅक कॅलिस याने वनडे क्रिकेटमध्ये एकूण ८६ अर्धशतक झळकावले आहेत. त्याने दक्षिण आफ्रिका संघाचे प्रतिनिधित्व करताना एकूण ३८८ वनडे सामने खेळले आहेत. ज्यात त्याने ४४.३६ च्या सरासरीने ११५७९ धावा केल्या आहेत.
२) कुमार संगकारा (Kumar Sangakkara)
श्रीलंका संघाचा दिग्गज फलंदाज कुमार संगकारा हा आपल्या काळातील सर्वोत्तम फलंदाजांपैकी एक होता. त्याने आपल्या संघासाठी फलंदाजी करताना धावांचा पाऊस पाडला होता. श्रीलंका संघाचे प्रतिनिधित्व करताना त्याने ४०४ सामने खेळले होते. १४२३४ धावा केल्या होत्या. यादरम्यान त्याने ९३ अर्धशतक झळकावले होते.
१) सचिन तेंडुलकर ( sachin tendulkar) :
भारतीय संघाचा मास्टर ब्लास्टर फलंदाज सचिन तेंडुलकर याने अनेक विक्रम आपल्या नावावर केले आहेत. त्याने भारतीय संघासाठी सर्वाधिक ४६३ वनडे सामने खेळले होते. त्याने वनडे क्रिकेटमध्ये ४४.८३ च्या सरारारीने १८४२६ धावा केल्या होत्या. या दरम्यान त्याने ९६ अर्धशतक झळकावले होते.
काय वाटतं? कोण असेल तो भारतीय फलंदाज जो सचिन तेंडुलकरचा सर्वाधिक अर्धशतक झळकावण्याचा विक्रम मोडून काढेल? कमेंट करून नक्की सांगा..




