computer

झाडांना नवजीवन देणारे सैनिकपिता चंद्रदेव सिंग!!

भारतातील अनेक खेड्यांमध्ये घरी वडील शेती करतात, तर मुलगा सैन्यात जाऊन देशसेवा करत असतो. 'जय जवान जय किसान'चा नारा सार्थ करणारे असे अनेक लोक दिसतात. मुलगा देशसेवा करत असताना आर्थिक मदत करतो म्हणून घरी वडीलही समाधानी राहून शेती करतानाचे चित्र अनेक ठिकाणी पाहायला मिळते. आज मात्र अशा अवलिया व्यक्तीची ओळख आम्ही करून देणार आहोत ज्यांची दोन्ही मुले सैन्यात आहेत आणि ते पर्यावरण संवर्धनासाठी आयुष्य वेचत आहेत.

उत्तरप्रदेशातल्या आझमगड जिल्ह्यात कमालपूर नावाचं एक छोटं गाव आहे. या गावात राहणारे चंद्रदेव सिंग हे आपली दोन्ही मुले सैन्यात भरती झाल्यावर आपणही समाजासाठी काहीतरी करावे या भावनेने काम करावे यासाठी अहोरात्र मेहनत करत आहेत. छोट्या छोट्या गोष्टी जर सातत्यपूर्ण पध्दतीने केल्या तर किती मोठा बदल घडू शकतो याचे चंद्रदेव सिंग हे उत्तम उदाहरण आहेत.

चंद्रदेव सिंग यांचा रोजचा दिनक्रम म्हणजे सकाळी आपली मोटारसायकल काढायची आणि परिसरात वाईट अवस्थेत असणाऱ्या लहान झाडांना एकतर चांगल्या अवस्थेत आणणे किंवा त्यांना घरी आणून त्यांचे पालनपोषण करणे. एकेक करत त्यांनी गेल्या १५ वर्षात तब्बल २० हजार झाडांना जीवदान दिले आहे.

त्यांचा हा प्रवास २००७ च्या आसपास सुरू झाला. चंद्रदेव सिंग यांची दोन्ही मुले सैन्यात भरती झाल्यावर, या मुलांनी सिंग यांनी आता आराम करावा असे सांगितले. पण चंद्रदेव सिंग काय स्वस्थ बसणाऱ्यातले नव्हते. ते शेतात फेरफटका मारायला जात, तसेच झाडांची काळजी घेत. यातच त्यांनी याला जीवनाचे ध्येयच बनवून टाकले. त्यांना कुठलेही झाड वाईटअवस्थेत दिसले की त्याला ते घरी घेऊन येत. अशाप्रकारे त्यांची घरीच नर्सरी तयार झाली.

हळूहळू त्यांचे हे काम लोकांना माहीत झाले. त्यांचे काम हीच त्यांची आता ओळख झाली होती. वनप्रेमी म्हणूनच ते ओळखले जाऊ लागले. अशात मग इतरही वनस्पतीप्रेमी त्यांच्याकडून झाडे घेऊन जाऊ लागले. चंद्रदेव सिंग मात्र एकही रुपया या झाडांच्या बदल्यात कुणाकडून घेत नाहीत. झाडांची काळजी पुरेपूर घेतली जाईल हा शब्द मात्र घ्यायला ते विसरत नाहीत.

गावात अनेक ठिकाणी त्यांनी लावलेली झाडे आता मोठे वृक्ष झाले आहेत. त्याठिकाणी सावली मिळते म्हणून अनेक लोक बसतात. आपल्याला हेच समाधान असल्याचे ते नमूद करतात. चंद्रदेव सिंग यांनी आपल्या छोट्या प्रयत्नांद्वारे मोठा बदल घडवून दाखवला आहे. हे खऱ्या अर्थाने प्रत्येकाने अनुकरण करावे असेच आहे.

उदय पाटील

सबस्क्राईब करा

* indicates required