On This Day: सचिनचे फॅन्स आजचा दिवस कधीच विसरू शकणार नाहीत; पाहा नेमकं काय घडलं होतं...
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतके झळकावणारा फलंदाज कोण? असा प्रश्न विचारला तर, एक नाव समोर येतं ते म्हणजे सचिन रमेश तेंडुलकर. क्रिकेटचा देव म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सचिनने शतकांचे शतक पूर्ण केले होते. मात्र आजचा दिवस सचिनचे फॅन्स कधीही विसरू शकणार नाही. कारण आजच्याच दिवशी (१० ऑक्टोबर, २०१३) तो शेवटचा कसोटी सामना खेळण्यासाठी मैदानात उतरला होता. २०१३ मध्ये वेस्ट इंडिज विरुध्द झालेल्या कसोटी मालिकेत तो सामना सचिनच्या आयुष्यातील शेवटचा कसोटी सामना ठरला.
सचिन तेंडुलकर एक महान क्रिकेटपटू आहे यात काहीच शंका नाहीये. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर १९८९ मध्ये वयाच्या १६ व्या वर्षी पाकिस्तान संघाविरुद्ध कसोटी सामना खेळण्यासाठी मैदानात उतरला होता. तर याच वर्षी डिसेंबर महिन्यात पाकिस्तान संघाविरुद्ध त्याने वनडे क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. ही तर केवळ एक सुरुवात होती. शेवट कसा झाला हे सर्वांना चांगलच माहीत आहे. कसोटी आणि वनडे क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांचा यादीत तो अव्वल स्थानी आहे.
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये १०० शतके झळकावणाऱ्या सचिन तेंडुलकरने कसोटी क्रिकेटमध्ये ५१ शतके झळकावली आहेत. तर वनडे क्रिकेटमध्ये त्याच्या नावे ४९ शतकांची नोंद आहे. १९९० मध्ये इंग्लंड विरुद्ध झालेल्या सामन्यात त्याने कसोटी क्रिकेटमधील पहिले शतक झळकावले होते. २००८ मध्ये त्याने ब्रायन लाराला मागे टाकत कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम आपल्या नावावर केला होता.
ज्यावेळी सचिन तेंडुलकरने निवृत्ती जाहीर केली त्यावेळी १९८ कसोटी सामन्यांमध्ये १५,८३७ धावा केल्या होत्या. त्यानंतर वेस्ट इंडिज विरुध्द २ कसोटी सामने खेळल्यानंतर त्याने २०० कसोटी सामने खेळून १५,९२१ धावा केल्या आणि आपल्या कसोटी कारकीर्दीचा शेवट केला. त्याने रिकी पाँटिंगपेक्षा २००० धावा अधिक केल्या होत्या.
सचिन तेंडुलकरने आपला शेवटचा कसोटी सामना मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर खेळला होता. या सामन्यात भारतीय संघाने एक डाव आणि १२६ धावांनी जोरदार विजय मिळवला होता. या डावात त्याने ७४ धावांची खेळी केली होती. तर मार्च २०१२ मध्ये त्याने वनडे क्रिकेटला राम राम केले होते.
सचिन तेंडुलकर असा एकमेव फलंदाज आहे ज्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये १०० शतके झळकावली आहेत. काय वाटतं? सचिन तेंडुलकरचा हा विक्रम कुठला फलंदाज मोडू शकतो? कमेंट करून नक्की कळवा.




