Virender Sehwag Birthday: अवघ्या ४७ चेंडूंमध्ये ठोकल्या १९८ धावा! विश्वविक्रम करत केला लारा अन् ब्रॅडमन यांच्या यादीत प्रवेश...
क्रिकेटच्या इतिहासात अनेक असे खेळाडू होऊन गेले ज्यांनी आपल्या फलंदाजी आणि गोलंदाजी शैलीने आपली वेगळी ओळख निर्माण केली. जेव्हा क्रिकेटचा देव म्हणून ओळखला जाणारा सचिन तेंडुलकर जोरदार फॉर्ममध्ये होता. त्यावेळी इतर कुठलाही असा फलंदाज नव्हता ज्याला गोलंदाज घाबरायचे. मात्र अशा परिस्थितीत संघात येऊन गोलंदाजांची चिंता वाढवणारा फलंदाज म्हणजे मुलतानचा सुलतान वीरेंद्र सेहवाग (Virender Sehwag).
कसोटी क्रिकेट म्हणजे फलंदाजांची आणि गोलंदाजांची कसोटी घेणारा फॉरमॅट. अशात ओपनिंगला फलंदाजीला येऊन गोलंदाजांवर आक्रमण करणारा वीरेंद्र सेहवाग पहिलाच फलंदाज असावा. वीरेंद्र सेहवाग (Virender Sehwag Birthday) आज (२० ऑक्टोबर) आपला ४४ वा वाढदिवस साजरा करतोय. टी -२० क्रिकेटसह वनडे आणि कसोटी क्रिकेटमध्ये देखील वीरेंद्र सेहवाग पहिल्याच चेंडूवर चौकार मारण्यासाठी प्रसिद्ध होता.(Virender Sehwag records)
आक्रमक भूमिका घेणाऱ्या वीरेंद्र सेहवागने क्रिकेटच्या तीनही फॉरमॅटमध्ये भारतीय संघाच्या विजयात अनेकदा महत्वाची भूमिका बजावली आहे. क्रिकेटमध्ये नव्या चेंडूचा सामना करणं खूप कठीण असतं. कारण नवीन चेंडू गोलंदाजांसाठी फायदेशीर असतो. या चेंडूचा सामना करण्यासाठी फलंदाजाकडे दोन पर्याय असतात. चेंडू सोडून द्या नाहीतर मिळेल त्या चेंडूवर आक्रमण करा. वीरेंद्र सेहवागला दुसरा पर्याय सोईस्कर वाटायचा.
मुलतानचा सुलतान वीरेंद्र सेहवाग..
वीरेंद्र सेहवागच्या विक्रमांचा जेव्हा जेव्हा उल्लेख केला जाईल, तेव्हा त्याने मुलतानच्या मैदानावर केलेल्या खेळीचा नक्कीच उल्लेख केला जाईल. २००४ पाकिस्तान दौऱ्यावर वीरेंद्र सेहवागने ३०९ धावांची तुफानी खेळी केली होती. या खेळीसह तो भारतीय संघासाठी कसोटी क्रिकेटमध्ये तिहेरी शतकी खेळी करणारा पहिला फलंदाज ठरला होता.
मुलतानच्या मैदानावर केलेली खेळी तिहेरी शतकी खेळी त्याने ३६४ चेंडूंमध्ये केली होती. त्यानंतर ४ वर्षानंतर त्याने सर्वात जलद तिहेरी शतक झळकावण्याचा विक्रम आपल्या नावावर केला. त्याने दक्षिण आफ्रिकाविरुध्द झालेल्या सामन्यात त्याने २७८ चेंडूंमध्ये ३१९ धावांची खेळी केली होती. या खेळी दरम्यान त्याने ४२ चौकार आणि ५ षटकारांचा साहाय्याने केवळ ४७ चेंडूंमध्ये १९८ धावा केल्या होत्या.
या खेळीसह तो कसोटी क्रिकेटमध्ये दोन तिहेरी शतके झळकावणारा तिसरा फलंदाज ठरला होता. यापूर्वी केवळ डॉन ब्रॅडमन आणि ब्रायन लाराला हा पराक्रम करता आला होता. त्यानंतर ख्रिस गेलचा या यादीत समावेश झाला होता.




