भारत - पाकिस्तान सामन्यात पाऊस पडला तर काय होणार? काय सांगतो नियम? वाचा...
आयसीसी टी -२० विश्वचषक २०२२ स्पर्धेतील सुपर -१२ फेरीतील सामन्यांना २२ ऑक्टोबर पासून सुरुवात होणार आहे. भारतीय संघ या स्पर्धेची सुरुवात पाकिस्तान संघाविरुद्ध होणाऱ्या सामन्यातून करणार आहे. आता पाकिस्तान विरुध्द सामना असला तर हाय व्होल्टेज होणार यात काही शंका नाही. जेव्हा जेव्हा हे दोन्ही संघ आमने सामने येतात त्यावेळी दोन्ही संघांच्या चाहत्यांचा देखील उत्साह वाढलेला असतो. मात्र यावेळी पाऊस सामन्यात व्यत्यय आणू शकतो. आता तुम्हालाही प्रश्न पडला असेल की, जर पाऊस पडला तर सामन्याचा निकाल कसा लागेल? चला तर मग घ्या समजून.
भारत - पाकिस्तान सामन्यात पाऊस पडणार हे तर फिक्स आहे. कारण हवामान खात्याने असा अंदाज व्यक्त केला आहे की, रविवारी मेलबर्नमध्ये पाऊस पडण्याची शक्यता ९० टक्के आहे. ही बातमी क्रिकेट चाहत्यांसाठी खूप वाईट बातमी आहे.
सामना सुरू होण्यापूर्वी पाऊस पडला तर काय?
भारत - पाकिस्तान यांच्यातील सामना सुरू होण्याच्या आधी पाऊस पडला तर, नक्कीच वातावरण पुन्हा सुरळीत होण्याची वाट पाहिली जाईल. मात्र सामना सुरू झाल्यानंतर ओव्हर्स कमी केल्या जातील. त्यानंतरही सामना उशिरा सुरू झाला तर, पुन्हा ओव्हर्स कमी केल्या जातील. भारतीय वेळेनुसार ४:३० वाजेपर्यंत हा सामना सुरू होण्याची वाट पाहिली जाईल. हा सामना दुपारी दिडला सुरू होणार आहे. ३ तास जर पाऊस पडला. तर शेवटी दोन्ही संघांमध्ये ५-५ षटकांचा सामना खेळवला जाईल. जर परिस्थिती हाताबाहेर गेली असेल तर, सामना रद्द केला जाईल.
सामना रद्द झाल्यास कशी होणार गुणांची विभागणी..
आयसीसी टी -२० विश्वचषक स्पर्धेतील सामन्यांमध्ये राखीव दिवस दिला जाणार नाहीये. त्यामुळे भारत - पाकिस्तान सामना रद्द झाल्यास, दोन्ही संघांना प्रत्येकी १-१ गुण दिला जाईल. याचा परिणाम येणाऱ्या सामन्यांवर पाहायला मिळू शकतो. कारण गुण सारखे असल्यास नेट रनरेट महत्वाची भूमिका बजावतो.
रविवारी कसे असेल मेलबर्नचे वातावरण?
रविवारी मेलबर्नमध्ये पाऊस पडू शकतो. सकाळ पासून ते रात्रीपर्यंत पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली गेली आहे. मात्र काही वेळ जरी पाऊस थांबला तर दोन्ही संघांमधील रोमांचक सामना पाहायची संधी क्रिकेट चाहत्यांना मिळू शकते. कारण ऑस्ट्रेलियाकडे उच्च दर्जाचे ड्रेनेज सिस्टीम आहे.




