टेस्ट मॅचच्या पहिल्याच षटकात हॅट्ट्रिक ते वर्ल्ड कप फायनलमध्ये मॅन ऑफ द मॅच, अशी राहिलीय इरफान पठाणची कारकीर्द..

भारतीय संघाने आयसीसी टी -२० विश्वचषक २००७ (Icc T20 world cup) स्पर्धेत पाकिस्तानला धूळ चारत अंतिम सामन्यात जेतेपद पटकावले होते. या सामन्यात प्लेअर ऑफ द मॅचचा पुरस्कार पटकावणारा इरफान पठाण (Irfan Pathan) आज (२७ ऑक्टोबर) आपला ३९ वा वाढदिवस साजरा करतोय. इरफान पठाणने भारतीय संघासाठी अनेकदा मोलाची खेळी केली आहे. फलंदाजी असो किंवा गोलंदाजी,तो आपल्या कर्णधाराला कधीच निराश करत नव्हता. अशीच काहीशी कामगिरी त्याने २००६ मध्ये पाकिस्तान विरुध्द झालेल्या कसोटी सामन्यात केली होती.

इरफान पठाणचा जन्म बडोदामध्ये झाला आहे. त्याला लहानपणापासुनच क्रिकेटची खूप आवड होती. पठाण ब्रदर्स युसुफ पठाण आणि इरफान पठाण दोघेही एकत्र गल्ली क्रिकेट खेळायचे. गल्ली पासून ते आंतरराष्ट्रीय क्रिकेट पर्यंतचा प्रवास दोन्ही भावांनी एकत्र मिळून केला. 

वयाच्या १९ व्या वर्षी केले भारतीय संघासाठी पदार्पण...

इरफान पठाणची खेळी पाहून सर्वच आश्चर्यचकीत झाले होते. जेव्हा इरफान पठाण पाकिस्तान संघाविरुद्ध अंडर -१९ क्रिकेट खेळत होता, त्यावेळी सौरव गांगुलीची नजर इरफान पठाणवर पडली होती. त्यावेळी सौरव गांगुली भारतीय संघाचा कर्णधार होता. त्याने इरफान पठाणची खेळी पाहून, निवडकर्त्यांसोबत चर्चा केली. त्यानंतर अवघ्या काही महिन्यांमध्ये इरफान पठाणला भारतीय संघात स्थान मिळाले.

पाकिस्तानविरुध्द हॅट्ट्रिक घेत रचला इतिहास...

पाकिस्तान संघाविरुद्ध सामना असला की, इरफान पठाणचा आत्मविश्वास उंचावलेला असायचा. तो नेहमीच पाकिस्तान संघाविरुद्ध जोरदार कामगिरी करायचा. २००६ मध्ये कराचीच्या मैदानावर पाकिस्तान संघाविरुद्ध झालेल्या सामन्यात तर इरफान पठाणने इतिहासाला गवसणी घातली होती. त्याने कसोटी सामन्यातील पहिल्याच डावातील पहिल्याच षटकात हॅट्ट्रिक घेण्याचा पराक्रम केला होता.

त्याने सलमान बट्ट, मोहम्मद युसुफ आणि युनिस खानला बाद करत माघारी धाडले होते. या षटकात त्याने स्विंग गोलंदाजीने पाकिस्तानच्या फलंदाजी आक्रमणाचे कंबरडे मोडले होते. या कामगिरी नंतर त्याला वसीम अक्रम नंतर दुसरा स्विंगचा सुलतान म्हटले जाऊ लागले होते. तो कसोटी सामन्यातील पहिल्याच षटकात हॅट्ट्रिक घेणारा पहिलाच गोलंदाज ठरला होता. 

 इरफान पठाणने आपल्या क्रिकेट कारकिर्दीत एकूण २९ सामने खेळले. यादरम्यान त्याला १०० गडी बाद करण्यात यश आले होते. तर वनडे क्रिकेटमध्ये त्याला भारतीय संघासाठी एकूण १२० सामने खेळण्याची संधी मिळाली. ज्यामध्ये त्याने १७३ गडी बाद केले होते. तर २४ टी -२० आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये त्याला २८ गडी बाद करण्यात यश आले होते. सध्या तो समालोचकाची भूमिका बजावताना दिसून येत असतो.

सबस्क्राईब करा

* indicates required