संघ सहकाऱ्यासोबत वाद, ड्रेसिंग रुमची फोडली काच!! ही आहे सूर्याच्या संघर्षांची दुसरी बाजू..
सूर्यकुमार यादव, हे नाव सध्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये जोरदार गाजताना दिसतंय. कारण जेव्हा जेव्हा भारतीय संघ अडचणीत असतो, त्यावेळी सूर्यकुमार यादव फलंदाजीला तुफान फटकेबाजी करतो आणि भारतीय संघाला अडचणीतून बाहेर काढतो. त्याच्याकडे असे काही शॉट्स आहेत, जे गोलंदाजांच्या विचार करण्यापलीकडचे आहेत. आयसीसी टी -२० विश्वचषक २०२२ स्पर्धेत तो गोलंदाजांचा चांगलाच समाचार घेतोय. त्याने या स्पर्धेत आतापर्यंत ७५ च्या सरासरीने ३ अर्धशतकांसह २२५ धावा केल्या आहेत. आज त्याच्या फलंदाजीसमोर अनेक दिग्गज गोलंदाज गुडघे टेकताना दिसतात. मात्र हा मान मिळवण्यासाठी त्याला अनेक अडचणींचा सामना करावा लागला आहे.
जेव्हा सूर्यकुमार यादवने फोडला ड्रेसिंग रुमचा आरसा..
१३ मार्च २०१४ रोजी सूर्यकुमार यादव बिपिसीएल संघासाठी टी -२० सामना खेळत होता. या व्यावसायिक सामन्यात सूर्यकुमार यादव स्वस्तात माघारी परतला होता. त्यानंतर त्याने ड्रेसिंग रूममध्ये जाऊन संतापात ड्रेसिंग रूमचा आरसा फोडला होता. त्याने आरश्यावर बॅट मारली. या घटनेनंतर त्याला मुंबई क्रिकेट असोसिएशनला तोंड द्यावे लागले होते.
कर्णधारपद गेलं...
सूर्यकुमार यादवच्या आयुष्यातील वाईट काळ नुकताच सुरू झाला होता. इतक्यात रणजी सामन्याच्या वेळी शार्दुल ठाकूर आणि सूर्यकुमार यादव यांच्यात बाचाबाची झाल्याचे पाहायला मिळाले होते. मैदानामध्ये घडलेल्या या घटनेनंतर सूर्यकुमार यादववर कठोर कारवाई करण्यात आली होती. त्याला तीनही फॉरमॅटमधून कर्णधारपदावरून काढून टाकण्यात आले होते. इतकेच नव्हे तर त्याला स्पर्धेतून देखील बाहेर केलं गेलं होतं. मात्र त्याने कमबॅक केल्यानंतर जे काही केलं, ते एका स्वप्नापेक्षा कमी नाहीये.
असा घडला बदल...
आयुष्यात अडचणी येत राहिल्या की, काही लोक माघार घेतात. तर काही सूर्यकुमार यादव सारखे असतात जे समस्यांना सामोरे जाऊन आणखी मजबूत होतात. त्याने आपल्या विचारात, सरावात आणि डाएटमध्ये हवे तितके सर्व बदल करून पाहिले. त्याने योगा करायला सुरुवात केली. त्याचा फायदा त्याला क्रिकेटच्या मैदानावर देखील झाला.
त्याने आपल्या फलंदाजी शैली मध्ये देखील काही बदल केले आहेत. तो नेहमी धावा करण्याच्या प्रयत्नात असतो. वेगवेगळ्या पद्धतीचे शॉट्स खेळून तो नेहमीच गोलंदाजांवर दबाव टाकत असतो. त्यामुळे तो नेहमीच गोलंदाजांपेक्षा एक पाऊल पुढे दिसून येतो. सध्या तो भारतीय संघातील एक प्रमुख फलंदाज आहे. टी -२० क्रिकेटमध्ये तो अव्वल स्थानी विराजमान आहे. त्याची फलंदाजी अशीच सुरू राहिली तर, भारतीय संघ आयसीसी टी -२० विश्वचषक २०२२ स्पर्धेचे जेतेपद मिळवू शकतो.




