मराठमोळ्या ऋतुराजची विक्रमी कामगिरी!!द्विशतकी खेळी करत मोडले ५ मोठे विक्रम....

सध्या सर्वत्र एकाच खेळाडूची चर्चा सुरु आहे, तो खेळाडू म्हणजे मराठमोळा ऋतुराज गायकवाड. होय, पट्ठ्यानं पराक्रम असा केलाय की, अनेक दिग्गज क्रिकेटपटू त्याचे तोंडभरून कौतुक करताना दिसून येत आहे. सुरु असलेल्या विजय हजारे ट्रॉफी २०२२ स्पर्धेतील उपांत्यपूर्व फेरीतील सामन्यात ऋतुराज गायकवाडने ऐतिहासिक खेळी केली आहे. महाराष्ट्र संघाचे नेतृत्व करताना उत्तर प्रदेश विरुद्व झालेल्या सामन्यात  ऋतुराज गायकवाडने २२० धावांची नाबाद खेळी केली आहे. या खेळी दरम्यान त्याने १५९ चेंडूंमध्ये १० चौकार आणि १६ गगनचुंबी षटकार मारले आहेत.(Ruturaj Gaikwad) 

विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेतील या सामन्यात ऋतुराज गायकवाडने एक, दोन नव्हे तर तब्बल ५ मोठे विक्रम मोडून काढले आहेत. ऋतुराज गायकवाडने या सामन्यात षटकारांचा पाऊस पाडला. यासह तो लिस्ट ए क्रिकेटमध्ये संयुक्तरित्या सर्वाधिक षटकार मारणारा पहिला भारतीय फलंदाज ठरला आहे. यापूर्वी भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा याने देखील आपल्या खेळी दरम्यान १६ गगनचुंबी षटकार मारले होते. 

इतकेच नव्हे तर ऋतुराज गायकवाडने या खेळी दरम्यान आणखी एक मोठा पराक्रम केला आहे. या सामन्यातील ४९ वे षटक टाकण्यासाठी शिवा सिंग गोलंदाजीला आला होता. शिवा सिंगच्या षटकात ऋतुराज गायकवाडचे रौद्ररूप पाहायला मिळाले. त्याने या षटकात एकूण ४३ धावा गोळा केल्या. या षटकात  त्याने सलग ७ षटकार मारले. क्रिकेट इतिहासात असे पहिल्यांदाच घडले आहे, जेव्हा एका फलंदाजाने एकाच षटकात सलग ७ षटकार मारले आहेत. तसेच मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये एकाच षटकात सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम देखील ऋतुराज गायकवाडच्या नावावर नोंदवला गेला आहे. त्याने या षटकात ४३ धावा केल्या. यापूर्वी कुठल्याही फलंदाजाला ४० धावा देखील करता आल्या नव्हत्या.  

तसेच तो एकाच षटकात सर्वाधिक षटकार मारणारा फलंदाज ठरला आहे. यापूर्वी  सोबर्स, रवि शास्त्री, हर्षल गिब्स, युवराज सिंग, कायरन पोलार्ड, थिसारा परेरा, रॉस व्हाइटले, जजाई यांनी क्रिकेटच्या वेगवेगळ्या फॉरमॅटमध्ये ६-६ षटकार मारण्याचा विक्रम केला होता. मात्र मराठमोळा ऋतुराज गायकवाड एक पाऊल पुढे निघाला आहे. त्याने ७ षटकार मारले आहेत. 

तसेच विजय हजारे ट्रॉफीमध्ये द्विशतक झळकावणारा गायकवाड हा महाराष्ट्र संघातील पहिला फलंदाज ठरला आहे. 

सबस्क्राईब करा

* indicates required