या ३ क्रिकेटपटूंचा जर्सी क्रमांक कोणीही वापरू शकत नाही, जाणून घ्या काय आहे कारण...

क्रिकेट हा असा खेळ आहे जो चाहत्यांच्या ह्रदयाच्या अगदी जवळ आहे. क्रिकेटच्या मैदानावर अनेक असे खेळाडू होऊन गेले, ज्यांनी आपल्या संघाला विजय मिळवून देण्यात मोलाचं योगदान दिलं. त्यामुळे क्रिकेट चाहते त्यांना दिग्गज, देव अशी उपाधी देखील देतात. क्रिकेटपटूंसह त्यांच्या जर्सीचा नंबर देखील चाहत्यांसाठी तितकाच खास असतो. बोभाटाच्या या लेखात आम्ही तुम्हाला अशा ३ खेळाडूंबद्दल माहिती देणार आहोत, जे निवृत्त झाल्यानंतर त्यांच्या जर्सी नंबरला देखील निवृत्त करण्यात आले.

) फिलिप ह्यूज:

ऑस्ट्रेलिया संघाचा सलामीवीर फलंदाज फिलिप ह्यूजचा २०१४ मध्ये बॉल लागल्यामुळे मृत्यू झाला होता. फिलिप ह्यूज हा ६४ नंबरची जर्सी घालून मैदानावर उतरायचा. साऊथ ऑस्ट्रेलिया आणि न्यू साऊथ वेल्स यांच्यादरम्यान पार पडलेल्या सामन्यात, शॉन अबॉटचा बॉल फिलिप ह्यूजच्या हेल्मेटला जाऊन लागला होता. त्यामुळे तो मैदानावर चक्कर येऊन पडला होता. दोन दिवस त्याने मृत्यूशी झुंज दिली. मात्र त्याची झुंज अपयशी ठरली. त्याच्या मृत्यूनंतर ६४ नंबरची जर्सी त्याच्या स्मरणार्थ निवृत्त करण्यात आली. यापुढे कुठलाही ऑस्ट्रेलियन खेळाडू ६४ नंबरची जर्सी घालून मैदानात उतरणार नाही.(Phillip hughes)

)पारस खडका

नेपाळ संघातील दिग्गज क्रिकेटपटू आणि माजी कर्णधार पारस खडकाने २०२१ मध्ये निवृत्तीची घोषणा केली होती. पारस खडका हा ७७ नंबरची जर्सी घालून मैदानात उतरायचा. त्याने निवृत्ती जाहीर केल्यानंतर नेपाळ क्रिकेट बोर्डने ७७ नंबरची जर्सी देखील निवृत्त करण्याची घोषणा केली. त्यामुळे यापुढे नेपाळ क्रिकेट संघातील कुठलाही खेळाडू ७७ नंबरची जर्सी घालून मैदानात उतरणार नाही.

) सचिन तेंडुलकर

भारतीय संघाचा मास्टर ब्लास्टर म्हणून ओळखला जाणारा सचिन तेंडुलकर १० नंबरची जर्सी घालून मैदानात उतरायचा. तब्बल २४ वर्षे आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळल्यानंतर २०१३ मध्ये त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटला राम राम केले होते. सचिनच्या निवृत्तीनंतर शार्दुल ठाकूर १० नंबरची जर्सी घालून मैदानात उतरला होता. मात्र त्यानंतर शार्दुल ठाकूरला आणि बीसीसीआयला ट्रोल करण्यात आले होते. त्यानंतर बीसीसीआयने १० नंबरची जर्सी निवृत्त करण्याचा निर्णय घेतला होता.

सबस्क्राईब करा

* indicates required