Mohammad Kaif Birthday: भारतीय संघाच्या फिल्डिंगमध्ये क्रांती घडवून आणणारा मोहम्मद कैफ!! युवराज सोबत आहे खास नातं..
भारतीय संघातील माजी फलंदाज मोहम्मद कैफचा (Mohammad Kaif ) उल्लेख हा जगातील सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षकांमध्ये केला जातो. त्याने आपल्या क्रिकेट कारकिर्दीची सुरुवात फलंदाज म्हणून केली होती. मात्र एक क्षेत्ररक्षक म्हणून त्याने आपली वेगळी ओळख निर्माण केली. चेंडू मोहम्मद कैफ कडे गेला की, फलंदाज धाव घेताना थरथर कापायचे. असा हा भारतीय दिग्गज खेळाडू आज(१ डिसेंबर) आपला ४२ वा वाढदिवस साजरा करतोय.
साल २००० मध्ये मोहमद कैफ आणि डाव्या हाताचा अष्टपैलू खेळाडू युवराज सिंग (Yuvraj Singh) यांनी भारतीय क्रिकेटमध्ये क्षेत्ररक्षण विभागात एक नवीन क्रांती घडवून आणली. हे दोघे क्षेत्ररक्षण करताना देखील भागीदारी करायचे. हे दोन्ही खेळाडू आपल्या चपळ क्षेत्ररक्षणाने आपल्या संघासाठी कमीत कमी १५-२० धावा वाचवायचे. तसेच फलंदाजी बद्दल बोलायचं झालं तर, सौरव गांगुलीला लॉर्ड्सच्या बाल्कनीत टी-शर्ट काढण्यासाठी भाग पाडणारा फलंदाज दुसरा तिसरा कोणी नसून मोहम्मद कैफच होता. २००२ नेटवेस्ट मालिकेत मोहम्मद कैफने इंग्लिश गोलंदाजांची धुलाई करत भारतीय संघाला जोरदार विजय मिळवून दिला होता.
६ मार्च २००० साली भारतीय कसोटी संघात पदार्पण करणाऱ्या मोहम्मद कैफचा जन्म १९८० रोजी उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथे झाला होता. त्याने मेवा लाल अयोध्या प्रसाद इंटरमिजिएट कॉलेज सोरावून येथून आपल शिक्षण पूर्ण केले. कैफला लहानपणापासूनच क्रिकेट खेळण्याची आवड होती. क्रिकेट प्रशिक्षणासाठी त्याने प्रयागराज सोडून कानपूरची वाट धरली होती. पुढे तो कानपूरच्या ग्रीन पार्क स्टेडियममध्ये असलेल्या हॉस्टेलमध्ये राहू लागला. इथूनच त्याच्या क्रिकेट कारकिर्दीला सुरुवात झाली.
भारताला जिंकून दिला अंडर-१९ वर्ल्ड कप..
मोहम्मद कैफच्या नेतृत्वाखाली खेळताना भारतीय अंडर-१९ संघाने २००० साली झालेल्या अंडर-१९ वर्ल्ड काप स्पर्धेत जेतेपदाला गवसणी घातली होती. आपल्या संघाला जेतेपद मिळवून दिल्यानंतर याच वर्षी त्याला भारतीय कसोटी संघात पदार्पण करण्याची संधी मिळाली होती. तर कसोटी पदार्पणाच्या २ वर्षांनंतर त्याला वनडे क्रिकेटमध्ये पदार्पण करण्याची संधी मिळाली होती. त्याला २००३ वर्ल्ड काप स्पर्धेत भारतीय संघाचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाली होती.
नेटवेस्ट मालिकेच्या अंतिम सामन्यात केली महत्वपूर्ण खेळी..
इंग्लंड संघाविरुद्ध झालेल्या मालिकेत जेव्हा भारतीय संघ अडचणींचा सामना करत होता, त्यावेळी मोहम्मद कैफने युवराज सिंग सोबत मिळून महत्वपूर्ण भागीदारी केली होती आणि भारतीय संघाला जोरदार विजय मिळवून दिला होता. ३२५ धावांचा पाठलाग करताना युवराज सिंग आणि मोहम्मद कैफ यांनी मिळून १२१ धावांची भागीदारी केली होती.
अशी राहिली मोहम्मद कैफची कारकीर्द..
मोहम्मद कैफने १२५ वनडे सामन्यांमध्ये भारतीय संघाचे प्रतिनिधित्व केले. यादरम्यान त्याने, ३२. ०१ च्या सरासरीने २७५३ धावा केल्या होत्या. त्याने वनडे क्रिकेटमध्ये एकूण १७ अर्धशतके झळकावली होती. तर कसोटी कारकिर्दीबद्दल बोलायचं झालं तर, त्याने १३ कसोटी सामन्यांमध्ये ३२.८४ च्या सरासरीने ६२४ धावा केल्या होत्या.




