ICC वनडे WC स्पर्धेत हे ५ भारतीय खेळाडू ठरू शकतात गेमचेंजर!! भारताचे दुसऱ्यांदा जेतेपद मिळवण्याचे स्वप्न होणार पूर्ण...
भारतीय संघ आता बांगलादेश संघासोबत दोन हात करण्यासाठी सज्ज झाला आहे. ४ डिसेंबर पासून दोन्ही संघांमध्ये वनडे मालिकेला प्रारंभ होणार आहे. ही मालिका आगामी वनडे विश्वचषक २०२३ स्पर्धेच्या सरावाच्या दृष्टीने देखील अतिशय महत्वाची ठरणार आहे. कारण संघातील अनुभवी खेळाडू या मालिकेत सहभाग घेणार आहेत.
आयसीसी वनडे विश्वचषक २०२३ स्पर्धा भारतात पार पडणार आहे. त्यामुळे भारतीय संघाकडून चांगली कामगिरी अपेक्षा असणार आहे. बोभाटाच्या या लेखात आम्ही तुम्हाला अशा ५ भारतीय खेळाडूंबद्दल माहिती देणार आहोत,जे या स्पर्धेत भारतीय संघासाठी गेमचेंजर ठरू शकतात.
१) उमरान मलिक :
जम्मू एक्स्प्रेस म्हणून ओळखला जाणारा गोलंदाज उमरान मलिक याने आपल्या वेगवान गोलंदाजीने अनेकांना आश्चर्यचकित केले आहे. सलग ताशी १४५ किमी गतीने गोलंदाजी करणाऱ्या उमरानने अखेर भारतीय संघासाठी वनडे क्रिकेटमध्ये पदार्पण केले आहे. मात्र त्याला जास्त सामने खेळण्याची संधी मिळाली नाहीये. उमरानला आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा दबाव सहन करण्यासाठी जास्तीत जास्त सामन्यांमध्ये संधी देण्याची गरज आहे. तरच तो आयसीसी वनडे विश्वचषक २०२३ स्पर्धेत विरोधी संघातील फलंदाजांच्या अडचणीत वाढ करू शकतो.
२) सूर्यकुमार यादव :
भारतीय संघातील मध्यक्रमातील फलंदाज सूर्यकुमार यादव याने टी -२० क्रिकेटमध्ये आपल्या फलंदाजीची जादू दाखवली आहे. मात्र वनडे क्रिकेटमध्ये त्याला अजूनही हवी तशी कामगिरी करता आली नाहीये. मात्र संधी मिळाली तर तो भारतीय संघासाठी गेम चेंजरची भूमिका पार पाडू शकतो. तो पाचव्या क्रमांकावर फलंदाजीला येऊन जलद गतीने धावा करू शकतो. काही वर्षांपूर्वी जी भूमिका सुरेश रैना पार पाडायचा, तीच भूमिका सूर्यकुमार यादव भारतीय संघासाठी पार पाडू शकतो.
३) पृथ्वी शॉ:
आक्रमक सलामीवीर फलंदाज म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पृथ्वी शॉला सतत दुर्लक्ष केलं जात आहे. मात्र देशांतर्गत क्रिकेट स्पर्धांमध्ये या फलंदाजाने धावांचा पाऊस पाडण्यात कुठलीच कसर सोडली नाहीये. आगामी बांगलादेश विरुध्द होणाऱ्या मालिकेत देखील त्याला संधी दिली गेली नाहीये. अनेक दिग्गजांच्या मते, पृथ्वी शॉ हा भविष्यात भारतीय संघासाठी मोलाची भूमिका बजावू शकतो. टॉप ऑर्डरमध्ये तो वेगवान गतीने धावा करू शकतो.
४) श्रेयस अय्यर:
भारतीय संघाच्या टॉप ऑर्डरमध्ये रोहित शर्मा, विराट कोहली आणि केएल राहुल सारखे दिग्गज खेळाडू आहेत. मात्र मिडल ऑर्डर मधील फलंदाज मोक्याच्या क्षणी फ्लॉप ठरले आहेत. अशा परिस्थितीत श्रेयस अय्यरला जेव्हा जेव्हा संधी मिळाली आहे, तेव्हा त्याने संधीचा लाभ घेत महत्वपूर्ण योगदान दिले आहे. आतापर्यंत खेळलेल्या ३६ सामन्यांमध्ये श्रेयस अय्यरने १४२८ धावा केल्या आहेत. यादरम्यान त्याने २ शतके आणि १३ अर्धशतके झळकावली आहेत.
५) वॉशिंग्टन सुंदर:
भारतीय संघ गेल्या काही वर्षांपासून अष्टपैलू खेळाडूच्या शोधात आहे. वेगवान गोलंदाजी करणाऱ्या अष्टपैलू खेळाडूचा शोध आता संपला आहे. मात्र अजूनही भारतीय संघ फिरकी गोलंदाजी करणाऱ्या अष्टपैलू खेळाडूच्या शोधात आहे. मात्र वॉशिंग्टन सुंदरने न्यूझीलंड दौऱ्यावर चांगली कामगिरी करून, हा शोध देखील लवकरच संपेल असे संकेत दिले आहेत. २३ वर्षीय वॉशिंग्टन सुदंर अनेकदा दुखापतीमुळे संघाबाहेर झाला आहे. जर त्याने आपल्या फिटनेसवर मेहनत घेतली तर, तो नक्कीच भारतीय वनडे संघात गेमचेंजर खेळाडू ठरू शकतो.




