computer

आर्टिफिशियल इंटेलिजन्स : देवदूत का भूत?

काल एका ट्विटर यूजरने आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) अर्थात कृत्रिम बुद्धिमत्तेच्या मदतीने एलॉन मस्कचा एक फोटो तयार केला आणि तो शेअर केला. हजारो यूजर्सनी त्याला प्रतिसाद दिला. स्वत: मस्कने
देखील त्याचा आनंद लुटला. हा फोटो आर्टिफिशियल इंटेलिजन्स काय करू शकतो ही फक्त एक झलक आहे.ज्या वेगाने आर्टिफिशियल इंटेलिजन्सची प्रगत व्हर्शन सामान्य यूजर्ससाठी तयार केली जात आहेत, तो वेग बघता मानवाचे पुढचे आयुष्य ह्या आर्टिफिशियल इंटेलिजन्सने व्यापलेले असणार आहे याबद्दल शंका नाही.मात्र एका बाजूने मानवी जीवनाला सुसह्य बनवणारे, कष्ट कमी करणारे, आगकाडी निर्मितीपासून ते
आगगाडी निर्मितीपर्यंतच्या सर्व क्षेत्रात अत्यंत उपयोगी ठरणारे हे तंत्रज्ञान खरंच मानवासाठी एक देणगी
आहे का, त्याची एक दुसरी काळी बाजू देखील आहे?

नव्या आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या मदतीने शोधकाम अर्थात सर्च हा प्रकार प्रचंड सुलभ, वेगवान आणि अधिक माहितीपूर्ण झाला आहे. या तंत्रज्ञानाच्या मदतीने कथा, कविता अगदी निबंध, भाषणं सुद्धा ’ओरिजनल’ फॉर्ममध्ये तयार करून मिळतात. आभासी चित्रं, फोटोग्राफ्स तयार करून मिळत आहेत.कोरोना काळात ह्या आर्टिफिशियल इंटेलिजन्समुळे कोरोनावर मात करण्याच्या लढाईत किती मदत झाली हे आपण जाणतोच. रोबोट्सच्या मदतीनं रुग्णांची तपासणी करणे, त्यावर उपचार सुचवणे ही कार्य ह्यातंत्रज्ञानाचा मदतीने पार पडलीच, पण मुख्य म्हणजे कोरोनावर लस शोधत असताना प्रचंड मोठ्या अशा डाटाची तपासणी करणे, त्यातून योग्य ते निष्कर्ष काढणे असे महत्त्वाचे कार्य देखील करण्यात आले.ही सुखकर बाजू एकीकडे असताना, दुसरीकडे गुन्हेगारी वृत्तीच्या लोकांनी ह्या तंत्रज्ञानाचा गैरवापर कसाचालू केला आहे हे आता सामोरे यायला लागले आहे.

काही दिवसांपूर्वी एका फोटो स्पर्धेत विजेत्या ठरलेल्या छायाचित्रकाराने नंतर ते छायाचित्र आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या मदतीने तयार केल्याची कबुली दिली.चायनामध्ये डीप फेक तंत्रज्ञानाचा वापर करून एका व्यक्तीला त्याच्या मित्राचा चेहरा आणि आवाज वापरून ४.५ मिलियन युआनचा (आपले पाच करोड रुपये) गंडा घालण्यात आला. अमेरिकेत तर आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या मदतीने व्हाईट हाउसमध्ये बॉम्बस्फोट झाल्याची अफवा पसरवण्यात आली.ही अफवा आटोक्यात येत नाही तोवर ह्याच तंत्रज्ञानाच्या मदतीने डोनाल्ड ट्रम्प यांना अटक केल्याचे,कैद्याच्या गुलाबी वेषात ते बराकीमध्ये फेर्‍या मारत असल्याचे खोटे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियाच्या माध्यमातून पसरवल्याचे समोर आले. येवढेच नाही तर ह्या अटकेच्या आनंदात जो बायडेन
आणि कमला हॅरिस व्हाईट हाउसमध्ये पार्टी साजरे करत असल्याचे खोटे फोटो देखील प्रचंड वेगाने व्हायरल झाले.

विविध वयोगटातील विद्यार्थी ह्या तंत्रज्ञानाचा वापर करून घरचा अभ्यास, असाईनमेंट्स, प्रोजेक्ट्सकुठलेही कष्ट न घेता चुटकीसरशी पूर्ण करत आहेत. विद्यार्थ्यांची ही चलाखी लक्षात आल्यानंतर अमेरिकाआणि युरोपमधील अनेक शाळा, महाविद्यालयांनी ह्या तंत्रज्ञानावर थेट बंदी घातली आहे. काही शैक्षणिकसंस्थांनी तर, कोणी विद्यार्थी Microsoft Bing आणि ChatGPT अशा प्रकारचे तंत्रज्ञान वापरताना आढळल्यास थेट कारवाईचा इशारा देखील दिला आहे. दुसरीकडे अमेरिकेसारख्या महासत्तेत तिथल्याअनेक राजकीय विश्लेषकांना, तज्ज्ञांना आणि या क्षेत्रातील संशोधकांना येणार्‍या निवडणुकीत ह्या आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर मतदारांमध्ये भ्रम निर्माण करण्यासाठी, त्यांना आपल्याला हवा तो कौल देण्यास तयार करणारी मानसिकता निर्माण करण्यासाठी, अफवा पसरवण्यासाठी,विशिष्ट विचारसरणीला हवा देण्यासाठी केला जाऊ शकतो ही भीती सतावायला लागली आहे. ह्या विषयावर काही जण थेट तर काही अडून आडून आपले विचार व्यक्त देखील करत आहेत.

 

आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या मदतीने तयार केलेल्या व्हिडिओ, फोटोंची सत्यता तपासण्यासाठी ह्या विषयातील तज्ज्ञांना देखील अनेक चाचण्या कराव्या लागतात, खूपसा वेळ द्यावा लागतो. अशावेळी
सामान्य माणूस ह्या मायाजालात फसला नाही तर नवलच! अशा तंत्रज्ञानाची मदत घेऊन सोशल मीडियावर टाकण्यात आलेल्या एखाद्या विद्वेषी पोस्टने, अथवा एखाद्या धर्माची, जातीची खिल्ली उडवणार्‍याखोट्या चित्रांमुळे दंगल उसळल्याचे आपण आपल्या देशात देखील सध्या सर्रास अनुभवतो आहोत. एका बाजूला हे तंत्रज्ञान लाखो लोकांचा रोजगार गिळंकृत करणार ही भीती सतावत असताना,त्याच्या गैरवापराचे प्रकार देखील अस्वस्थ करणारे आहेत. अशावेळी सावध राहणे, आपल्याला मिळालेला प्रत्येक संदेश, प्रत्येक फोटो, व्हिडिओ ह्याची स्वत: खात्री करून घेणे (ज्या साठी सोशल मीडियावर अनेक फॅक्टचेक वेबसाइट्स उपलब्ध आहेत.) आणि मुख्य म्हणजे स्वत: ह्या तंत्रज्ञानाचा वापर सुयोग्य कारणांसाठी करणे, ही आपली प्रत्येकाची जबाबदारी असणार आहे!

लेखक : प्रसाद ताम्हनकर

सबस्क्राईब करा

* indicates required