computer

२०० पेक्षा जास्त अत्यंत जहाल विषारी सापांचे विष पचवणारा टीम फ्रेड आहे तरी कोण ?

अचानक साप समोर आल्यावर आपण काय करतो? तुम्ही म्हणाल,हे काय विचारणं झालं? साप समोर आला की आपण आधी तिथून पळ काढतो. (आता नेमक्या त्याच वेळी काही जणांच्या चड्ड्या पण ओल्या होतात हा भाग वेगळा)  सर्पमित्र आणि सर्प अभ्यासक सोडले तर आपल्यासारखी सर्वसामान्य माणसे सापांना टरकूनच असतात. पण आज आपण एका अजब गजब माणसाबद्दल जाणून घेणार आहोत ज्याने स्वतःच्या शरीराचीच प्रयोगशाळा करून तब्बल २०० पेक्षा जास्त अत्यंत जहाल विषारी सापांचे विष पचवले आहे.आणि एवढ्यावर न थांबता आपल्या रक्तापासून विषरोधक (अँटी व्हेनम) औषध बनवण्यासाठी शास्त्रज्ञांची मदत सुद्धा केली आहे. चला तर मग या अवलियाबाबत जाणून घेऊया…

 

या सुपरहिरोचे नाव आहे टीम फ्रेड. हे टीम भाऊ मागच्या वीस वर्षांपासून सापांचे विष आपल्या शरीरात टोचवून घेत आहेत.आता प्रश्न पडतो की हा उद्योग का व कशासाठी करायचा? तर आपल्याला माहित आहे की एखादा रोग होऊ नये म्हणून आपण त्या रोगाची लस अगदी लहानपणापासून घेत असतो.अगदी आत्ताचे उदाहरण सांगायचे झाले तर कोविड होऊ नये म्हणून आपण कोव्हॅक्सिन, कोविशिल्ड वगैरे लस घेतल्या आहेत. या लस म्हणजे दुसरे तिसरे काही नसून त्याच रोगाचे मृत किंवा कमजोर जंतू असतात ज्यांच्याशी आपले शरीर लढा देऊन त्या रोगापासून वाचण्यासाठी सक्षम बनते.अगदी त्याच प्रकारे टीमने कधी साप चावला तर आपले शरीर आधीच तयार असावे म्हणून विविध सापांच्या विषाचा डोस सौम्य स्वरूपात आपल्या शरीरात वेळोवेळी टोचवून घेतला.असे करता करता टीम फ्रेडचे शरीर एवढे सक्षम झाले की जगातला कुठलाही महाभयंकर विषारी साप त्याला चावला तर टीमला काहीही होणार नाही. मग तो कोब्रा असो, ब्लॅक मांबा असो, घोणस, ताईपान, रॅटल स्नेक असो की आणखी कुठलाही असो.

 

 या जगात आजपर्यंत विषारी सर्पाच्या ६०० विविध प्रजाती आढळून आल्या आहेत. यातील ८७ प्रजातींचा मनुष्य प्राण्यासोबत सरळ संबंध येऊ शकतो. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनने ८७ पैकी ३१ प्रजाती वर्गवारी १ आणि ५४ प्रजाती वर्गवारी २ अशा जाहीर केल्या आहेत. या सर्वांचे विष मनुष्यांसाठी अत्यंत धोकादायक समजले जाते.आता राहिलेल्या इतर प्रजातींसोबत एकतर मनुष्याचा तितकासा संबंध येत नाही किंवा त्यांचे विष मनुष्यासाठी फार धोकादायक वगैरे नसते. मग आता प्रश्न येतो की ज्या विषारी सापांचा मनुष्यासोबत आमना सामना होऊ शकतो त्यांच्या विषावर तोडगा काय? तर त्यासाठी विष रोधक औषध गरजेचे असते जेणेकरून मनुष्याचे प्राण वाचले जावे. पण यात एक अडचण अशी की एवढी विष रोधक (अँटी व्हेनम) औषधे तयार करणार कशी? तर इथेच आपले टीम भाऊ मानवजातीसाठी अत्यंत महत्वाचे ठरतात. ते कसे? तर पाहूया…

 

सर्व प्रकारच्या विषारी सापांचा सौम्य डोस घेतल्याने टीम फ्रेडचे शरीर अतिप्रतिकारक्षम (हायपर इम्यून) झाले आहे. म्हणजेच टीमच्या रक्तात प्रचंड प्रमाणात अँटिबॉडिजचा साठा आहे.या अँटीबॉडी काय करतात? तर शरीराच्या बाहेरून येणाऱ्या व शरीराला धोकादायक ठरणाऱ्या जिवाणू, विषाणू किंवा इतर परदेशी घटकांसोबत (फॉरेन बॉडीज) लढा देतात आणि त्यांना निष्क्रिय करून टाकतात. अशा प्रकारे आरोग्याला होणारा धोका टाळला जाऊ शकतो. टीम फ्रेडच्या शरीरातून शास्त्रज्ञांनी फक्त ४०० मिलिलीटर रक्त काढले आणि फ्रेडच्या प्रतिकार क्षमतेचा वापर करून त्या रक्तापासून मोठ्या प्रमाणात अँटीबॉडी तयार केल्या. यातील वेगवेगळ्या प्रकारच्या अँटीबॉडीजवर प्रयोग करून त्यातील सर्वात सक्षम दोन अँटीबॉडीज वेगळ्या काढल्या ज्यांची LNX-D09 आणि SNX-B03 अशी नावे आहेत. या दोन्हीच्या एकत्रीकरणातून असे औषध तयार केले गेले ते कुठल्याही प्रकारच्या सर्प विषापासून संरक्षण देऊ शकते. या रसायनाला Varespladib असे नाव दिले गेले आहे.

 

या रासायनिक औषधाचा उंदरांवर प्रयोग केला असता तो प्रयोग प्रचंड यशस्वी ठरला आहे. अगदी जहाल विषारी वेगवेगळ्या १३ सापांच्या चाव्यानेही उंदरांना काही झाले नाही. सध्या पुढील प्रयोग इतर प्राण्यांवर केले जात असून ते सुद्धा यशस्वी ठरले तर या औषधाला सर्व प्रकारच्या सर्पविषावर रामबाण औषध म्हणून मान्यता मिळेल. हा शोध एवढा महत्वाचा का आहे माहित आहे? सापांच्या विविध प्रजाती, त्यांच्या विषाचे विविध प्रकार, त्या विषाचे मानवी शरीरावर होणारे वेगवेगळे दुष्परिणाम हा फार जटिल विषय होता. सापाचा आणि विषाचा प्रकार बघून डॉक्टरांना कोणते औषध द्यावे ते ठरवता येते. बऱ्याचदा असं घडतं की नेमका कोणता साप चावला तेच रुग्णाला माहित नसते. परंतु आता सर्व सर्पाविषावर एकच युनिव्हर्सल औषध मोठ्या प्रमाणात उपलब्ध असेल तर ही गोष्ट किती मोठी आणि महत्वाची आहे याची कल्पना करू शकता मंडळी. आपण टीम फ्रेडला आणि शास्त्रज्ञांना धन्यवाद देऊया व यापुढे सर्पदंशाने होणारे मृत्यू कमी होतील अशी आशा बाळगूया.
लेख कसा वाटला ते आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि शेअर करायला विसरू नका…

-अनुप कुलकर्णी

सबस्क्राईब करा

* indicates required