मेष(Aries) राशीला मेष म्हणजे मेंढ्याचं नाव कसं मिळालं ?

आपलं अवकाश बारा राशींमध्ये वाटलं गेलं आहे. आता राशी म्हटलं की आपण ज्योतिषशास्त्राकडे वळतो आहे असं तुम्हाला वाटेलही, तर ते तसं नाही. आपण अॅस्ट्रॉनॉमी म्हणजे खगोलशास्त्राचा विचार करतो आहे.
अवकाशाचे एकूण ३६०अंश बारा भागात विभागले तर प्रत्येक राशीचे ३० अंश होतात. या ३० अंशाच्या तुकड्यामध्ये जे तारे -ग्रह नजरेस येतात, त्यांना काल्पनिक रेषांनी जोडून सहज ओळखू येईल अशी आकृती दिसते. त्यानुसार राशीला नाव दिलं गेलं आहे. प्रत्येक राशीसोबत काही कथा पुराणकथा- दंतकथा जोडल्या गेल्या आहेत. या कथांना ऐतिहासिक किंवा शास्त्रीय आधार आहे अथवा नाही याचा विचार न करता रंजक कथा म्हणून आपण त्याचा आस्वाद घेऊ शकतो.
मेष(Aries) ही या यादीतली पहिली राशी! मेष म्हणजे मेंढा किंवा इंग्रजीत Ram (रॅम)- या राशीसोबत जी ग्रीक पुराणातली कथा आहे आहे ती अशी - अगदी प्राचीनकाळी बॉयोटिया या राज्याचा अथामस नावाचा राजा होता. त्याला दोन बायका, एकीचं नाव नेफेले तर दुसरीचं नाव इनो. नेफेलेलीला दोन अपत्यं होती- एक मुलगा आणि एक मुलगी. मुलाचं नाव फ्रिक्सस आणि मुलीचं नाव हेली. अथामसची दुसरी बायको इनोफारच कपटी आणि ईर्ष्येखोर होती. तिला नेफेलेच्या मुलांपासून धोका वाटत असे म्हणून तिने एक कट रचला. एकदा राज्यात दुष्काळाची चिन्हं दिसायला लागली तेव्हा इनोने लोकांना सांगितलं की, झ्यूस हा देव रागावल्यानं दुष्काळ पडणार आहे. आपल्याला या आपत्तीपासून वाचायचं असेल तर फ्रिक्ससचा बळी द्यावा लागेल. हे ऐकून मुलांची आई नेफेले फार व्याकुळ झाली. तिने देवाची प्रार्थना केली. देवांनी तिच्याकडे एक सोनेरी केसांचा,पंख असलेला सोनेरी मेंढा (Golden Ram) पाठवला. या मेंढ्यावर फ्रिक्सस आणि हेली बसले आणि आकाशात उडू लागले. पण मेंढा दोघांना घेऊन जात असताना, हेलीचा अचानक खाली समुद्रात पडून मृत्यू झाला. त्या समुद्राला नंतर "हेलेस्पॉन्ट" (Hellespont — आजची Dardanelles सामुद्रधुनी) असे नाव मिळाले. फ्रिक्सस मात्र सुरक्षित कोल्चिस (आजच्या जॉर्जिया देशात) या प्रदेशात पोहोचला. तिथल्या राजाने त्याचं स्वागत केलं. फ्रिक्ससने आभार म्हणून त्या सोनेरी मेंढ्याचा देवांना बलिदान दिला. या सोनेरी मेंढ्याला मरणोत्तर सन्मान म्हणून देवांनी त्याला आकाशात Aries नावाने तारकासमूहात स्थान दिलं. म्हणून आज Aries हे राशिचक्रातलं पहिलं चिन्ह आहे.