computer

नक्षलवादी संपतील पण नक्षलवाद संपेल का ?

( बोभाटा कोणत्याही राजकीय मताला थारा देत नाही.प्रो किंवा अगेन्स्ट अशा भूमिका घेत नाही. एका त्रयस्थ नजरेतून हा लेख वाचा अशी आमची विनंती आहे)

नक्षलवादी संपतील पण नक्षलवाद संपेल का ? हा आजचा मोठा प्रश्न आहे.मार्च २०२६ पर्यंत नक्षलवाद संपवण्याचे घोषणा तर सरकारने केलीच आहे.गेल्या वर्षभराच्या  बातम्य जर तुम्ही बघत असाल तर सरकार इन्शुरन्स कंपनीचे एजंट ज्या निष्ठेने अमुक इतकी 'लाईफ' करण्याचं चॅलेंज घेतात त्याच स्पिरिटने सरकार 'नक्षलवादी लाईफ' संपवण्याचं टार्गेट पूर्ण करताना दिसत आहे.
**
तरीपण  नक्षलवादी संपतील पण नक्षलवाद संपेल का,हा प्रश्न का पडतो ?

१९७५ साली अनिल बर्वे यांची ‘Thank you, Mr. Glad!’ कादंबरी आली. ही कादंबरी एका डॉक्टर असलेल्या पण आतंकी नक्षलवाद्याच्या संघर्षावर  लिहिली गेली होती.या कथेमागे काही त्या काळच्या सत्यकथेचा आधार होता.आज म्हणजे २०२५ साली  नंबाला केशव राजू - बसव राजू या ७० वर्षाच्या आतंकी नक्षलवाद्याला पोलिसांनी संपवले.काल संपवलेला नक्षलवादी क्वालिफाईड एंजीनियर होता.ही बातमी बघितल्यावर तुम्हाला समजेल की १९७५ ते २०२५ म्हणजे तब्बल ५० वर्षात परिस्थितीत काहीच फरक पडलेला नाही.

नक्षलवाद म्हणजे The privileged  vs  oppressed म्हणजेच शोषक विरुध्द शोषीत असा हिंसक लढा आहे.त्या लढ्याला माओइस्ट -कम्युनिस्ट  अशी अनेक वेगवेगळी लेबलं लावली जातात .पण सत्य हेच आहे.दडपलेल्या लोकांचा अन्यायी भांडवलदारांनी मारलेला हा  Back Hand Stroke आहे.आता पुन्हा विचार करा शोषक-शोषित हा आपल्या जगाचा सगळ्यात जुना आजार आहे.कम्युनिझम हेच त्यावरचे रामबाण औषध आहे असा समज असलेले लोक आणि देशही जगात आहेत.पण प्रश्न असा आहे की भारतासारख्या जगातल्या मोठ्या लोकशाही देशात ही हिंसक चळवळ अजूनही का संपलेली नाही.याला केवळ कम्युनिझम जबाबदार नाहीत. आपल्याकडे 'मॅकार्थिझम' नाही.कम्युनिस्ट राजवट असलेली मोठी राज्ये - केरळ आणि पश्चिम बंगाल आजही कार्यरत आहेत. मुंबईसारख्या देशाच्या आर्थिक राजधानीत पण एकेकाळी  कम्युनिस्टांचे वर्चस्व होते.श्रीपाद अमृत डांगे - कॉ. कुरणे यांच्यासारखे विचारी कम्युनिस्ट नेते होते. कॉ. कृष्णा देसाई यांच्या हत्येसारखी प्रकरणे वगळता फारसे हिंसक अत्याचार मुंबईत घडलेले नाहीत.नक्षलवादींसारखा  हिंसक पंथ अजूनही का जिवंत आहे याचे उत्तर शोधायला आपल्याला भूगोलाकडे वळावे लागेल.

 

मध्य प्रदेश- आंध्र प्रदेश- बिहार- ओरीसा -महाराष्ट्र पाच राज्यांचा भौगोलीक विचार करा.छत्तीसगड राज्य हा एकेकाळच्या मध्यप्रदेशाचा छोटासा तुकडा आहे.झारखंड हे राज्य बिहार राज्यातून वेगळे झालेले छोटेसे राज्य आहे.तेलंगणा हा एकेकाळी आंध्रप्रदेशाचा भाग होता.ओरिसातून वेगळे असे राज्य अजूनही तयार झालेले नाही.महाराष्ट्रातील चांदा -गडचिरोलीचा झाडीपट्टीचा परिसरही यात आलाच.या सर्व राज्यात जनशक्ती आदीवासींची आहे.ही सर्व राज्ये नैसर्गिक संपत्तीने श्रीमंत आहेत. ही नैसर्गिक संपत्तीचा आदिवासींची पिळवणूक करून  भांडवली फायदा शतकानुशतके  इतर म्हणजे बिगर आदिवासींना मिळत होता. आदिवासींनाही हे कळत होते. त्यांची तळमळ सुरुच होती. पण  नेमके काय करावे लागते हे त्यांना माहिती नव्हते- कळत नव्हते. थोडक्यात चळवळींसाठी ही सुपीक जमीन तयारच होती. हाच मोका नक्षलवादींनी साधला.नक्षलावाद्यांनी त्यांना ' प्रोग्रॅम ' दिला आणि स्टँडर्ड ऑपरेटींग प्रोसिजर- मॅन्युअल दिले. त्यानंतर जीव ओवाळून टाकणार्‍या आदीवासींची फौज आणि विशिष्ट गटाचा नक्षली नेता या कॉकटेलने या राज्यातले वातावरण आजही धुंद केलेल्या अवस्थेतच आहे.

आता एक नवा प्रश्न : मुंबईसह इतर राज्यातल्या इंडस्ट्रीअल बेल्टमध्येही हाच सीन होता मग नक्षली इथे का आले नाहीत ? कारण इथल्या कामगारांच्या आणि कम्युनिस्ट युनियनच्या हातात संप- प्रातिनिधिक चर्चा- कायदेशीर करार अशी अहिंसक हत्यारे होती. आणि हर ज़ोर ज़ुल्म की टक्कर में हड़ताल हमारा नारा है! अशी प्रेरणादायी गाणी लिहिणारे कवि होते.पण आदीवासींकडे हत्या आणि हत्यारे हा एकच पर्याय होता जो नक्षलवादी अजूनही वापरत आहेत.

आता एक ऐतिहासिक सत्य ऐका.आपल्याला स्वातंंत्र्य मिळाले. त्या काळात भारत अनेक संस्थानीकांचा देश होता.सगळे संस्थाने विलीन झाली. संस्थानीकांना तनखे सुरु झाले.आणि नव्या भारताचा जन्म झाला.याच काळात वनक्षेत्रात आदिवासी होते ते पण संस्थानीकच होते त्यांना 'तुम्ही आमच्या सोबत या तुम्हालाही तनखे मिळतील' असे कोणीही म्हटले नाही.आदिवासी दुर्लक्षित होते आणि दुर्लक्षितच राहिले.

आता सध्याचा महत्वाचा प्रश्न : या चळवळींना अत्याधुनिक शस्त्रे आणि त्यासाठी लागणारे आर्थिक पाठबळ कसे मिळते ? याला दोन उत्तरे आहेत. 
ज्या शहरी भांडवलदारांचा व्यवसाय वनक्षेत्रावर अवलंबून असेल तर त्यांच्याकडून नियमित खंडणीची वसूली करणे
उदाहरणार्थः तुमचा विडीचा कारखाना आहे.विडीला लागणारी तेंदूची पाने जंगलातूनच म्हणजे नक्षलग्रस्त भागातूनच येणार आहेत.अशावेळी नक्षलींना खंडणी देण्यापलीकडे दुसरा काहीच उपाय नाही. 
दुसरा मार्ग म्हणजे एनजीओ सारख्या छुप्या मार्गाने परदेशातल्या संस्थांकडून येणारे पैसे.हे पैसे फार मोठ्या संख्येने आणण्यासाठी शहरात राहून काम करणारे नक्षलवादी आहेत ज्यांना आपण अर्बन नक्षली या नावाने ओळखतो. हेच अर्बन नक्षली हत्यारांची वाहतूक आणि ट्रेनींग देणारी माणसे यांचेही आयोजन  करतात.
अर्बन नक्षलींचा आणखी एक उद्योग म्हणजे शहरातील कोणत्याही तिढ्याला नक्षली रंग देणे.याचे उदाहरण म्हणजे काही वर्षांपूर्वी भीमा कोरेगावचा हिंसाचार !
**
शेवटचा प्रश्न : भविष्यात काय घडेल ? आदिवासी क्षेत्रांचा काहीच काळात इतका विकास घडून येईल की जनता नक्षलींना निरोप देईल.प्रत्येक चळवळ हळूहळू म्हातारी होत जाते तशी ही चळवळही म्हातारी होईल.

आता सर्वसामान्य नागरिक म्हणून तुम्हीच कमेंट करून सांगा : नक्षलवादींना मारून नक्षलवाद संपेल का ?
 

सबस्क्राईब करा

* indicates required