कामाची सुरुवात AI ने करू नका- मेंदूला त्याचे काम करू द्या.
MIT या अमेरिकन शिक्षण संस्थेच्या मिडिया लॅबने कृत्रिम बुध्दीमतेचा म्हणजे 'AI चा सहज आणि सतत वापर करण्याचा मेंदूवर होणारा परिणाम' या विषयावर काही अभ्यास केला.यासाठी त्यांनी कन्टेन्ट लिहिणार्या तीन वेगवेगळ्या टीम बनवल्या.त्यानंतर AI मुळे त्यांच्या कामात झालेल्या बदलांचा अभ्यास केल्यावर जे फरक लक्षात आले ते असे आहेत.
१.स्मरणशक्तीचा र्हास: ChatGPT वापरणार्या ८३% लोकांना काही मिनिटांपूर्वी जे लिहिलं त्यातलं एकही वाक्य आठवत नव्हतं. ज्यांनी AI वापर केला नव्हता त्यांची स्मरणशक्ती पूर्ववत होती.
२. एखाद्या विषयावर आपण लिहायला सुरुवात केली की मेंदूची विविध वेगवेगळी केंद्र स्वतःच एकमेकांना जोडतात आणि कन्टेन्ट तयार करतात.थोडक्यात संपूर्ण मेंदू सजग राहतो.सतत ChatGPT वापरणार्यांना ४७ % लोकांमध्ये ही मेंदूची कार्यक्षमता कमी होत गेली. ChatGPT वापरणं थांबवल्यावरही हा परिणाम आहे तसाच राहिला.
३. शिकण्याची इच्छा कमी होत जाणे : एखादे काम हातात घेतल्यावर मेंदू त्यावर विचार करतो,अनेक पर्याय वापरतो, नव्या कल्पना पुढे आणतो. अर्थातच कामाला लागणारा वेळ वाढतो.ChatGPT वापरणार्या ३३% लोकांची कामं वेगाने झाली पण त्यांच्या मेंदूने शिकण्याचे प्रयत्न थांबवले
****
आता काही सकारात्मक प्रयत्न बघा : AI चा वापर बंद करणे हा उपाय नाही.आवश्यक असेल तेव्हाच ChatGPT वापर केला तर स्मरणशक्ती आहे तशीच कायम राहते .मेंदू आधीसारखाच कार्यरत राहतो आणि AI जोड मिळाल्याने आणखी जोरात कामाला लागतो.
****
आता नक्की काय करायचे ते बघा.
१ कामाची सुरुवात AI वापरून करू नका.तुमच्या मेंदूला नेहेमीप्रमाणेच काम करू द्या. ते झाले की संपादन करणे - अधिक माहितीचा योग्य वापर करून विस्तार करणे - अनावश्यक भाग गाळून टाकणे यासाठी AI चा वापर करा. AI चा वापर मदतनीस म्हणून करा.आपल्याऐवजी काम करणारी व्यक्ती म्हणून AIचा वापर करू नका.
२ आतापर्यंत अशा AI सारख्या साधनांचा वापर कोणत्याही मानवी मेंदूने केला नव्हता.त्यामुळे जुनी कौशल्ये विसरण्याचा धोका वाढतो.
उदाहरणार्थ: आपण की बोर्डचा वापर करून टायपाला सुरुवात केली आणि हातानी लिहिण्याची क्षमता कमी होत गेली. तुमचेच काही वर्षांपूर्वीचे हस्ताक्षर आणि आताचे हस्ताक्षर या दोन्हींची तुलना करून बघा.फरक तुमच्या लक्षात येईल.फोटोचा वापर वाढल्यावर निरिक्षण करण्याची नैसर्गिक प्रवृत्ती कमी झाली.आधी एखादा पत्ता लक्षात ठेवण्यासाठी आपण म्हणजे आपला मेंदू वेगवेगळ्या खूणा आपोआप लक्षात ठेवायचा.GPS वापरायची सवय झाल्यावर खूणांसकट रस्ता लक्षात ठेवण्याची क्षमता कमी झाली. सांगायचा मुद्दा असा आहे की कामासाठी फक्त AI चाच वापर केला तर मेंदू त्याच्याच आधीन जाण्याची शक्यता आहे.
३ थोडक्यात कामाची सुरुवात AI ने करू नका- मेंदूला त्याचे काम करू द्या. AI चा उपयोग जाणिवपूर्वकच करा.केलेल्या कामावर शेवटचा हात फिरवण्याची जबाबदारी AI ला द्या.
थोडक्यात आवश्यकता नसेल तेव्हा केवळ वेळ वाचावा म्हणून AI चा वापर केला तर नैसर्गिकरित्या काम करण्याची क्षमता घटत जाण्याची शक्यता आहे.
****
आता बोभाटाचे मुख्य काम कन्टेन्ट तयार करण्याचेच आहे म्हणून आम्हीही काही उपक्रम सुरु केले आहेत ते असे :
१ मराठी - इंग्रजी- हिंदी या भाषा वगळता इतर भाषेतला काही मजकूर असेल तर फक्त भाषांतरासाठी AI चा वापर करतो.
२ बोभाटाच्या संग्रहात असलेल्या ३०००+ पुस्तकांतून संदर्भ शोधून काढण्यावर भर देतो.
३ स्मरणशक्तीचा र्हास होऊ नये म्हणून रोज एखादी कविता -गाणे पाठ करून बघतो.
४ मिटिंग सुरु असताना पेन- कागद वापरून नोट्स लिहून घेतो.
५ दिवसभरात कधीही एखादी रँडम गोष्ट- घटना -शब्द आठवण्याचा प्रयत्न करतो.
तुम्ही असे काही प्रयोग करता का ? आम्हाला नक्की सांगा



