आयुर्वेद सांगतो ’गोमांसा’चे औषधीय गुणधर्म

विविध परंपरांचा सन्मान करणारा प्राचीन भारतीय समाज कधीच आपली मतं दुस-यांवर लादणारा नव्हता. याचंच प्रतिबिंब आपल्याला प्राचीन शास्त्र ग्रंथांमध्ये दिसतं. विशेषतः आयुर्वेदासारख्या समाजाभिमुख शास्त्रामध्ये हा गुण प्रकर्षाने दिसतो. समाजातील रूढी-परंपरा चूक की बरोबर या फंदात न पडता, आयुर्वेदाच्या ग्रंथांमध्ये आहार-विहाराची परिणामानुरूप माहिती देण्यात आली आहे.

सध्या आपल्या देशात गोमांस हा सध्या अत्यंत ज्वलंत प्रश्न झालेला आहे. गोमांस खाणं योग्य की अयोग्य हे ज्याच्यात्याच्या मनावर सोडून आयुर्वेदाच्या ग्रंथांमध्ये गोमांसाचे गुणधर्म सांगण्यात आले आहेत, ते अशाप्रकारे -

१. गोमांसाचा अन्तर्भाव ’प्रसह’ प्राण्यांच्या मांसाच्या गटात करतात. या गटातील प्राणी आपलं अन्न ओरबाडून मिळवतात.

२. गोमांस हे पचण्यासाठी जड असतं. ते खायची सवय नसल्यास युक्तीने खावं लागतं, ज्यामुळे ते पचनास सुलभ होईल.

३. गोमांस म्हणजे गो जातीचे मांस असं गृहित धरून मादीचे मांस नरापेक्षा पचनास हलकं असतं. त्यातही नराचं पुढच्या भागातील आणि मादीचं मागच्या भागातील मांस पचण्यास तुलनेने अधिक जड मानलं जातं.

४. गो जातीच्या प्राण्यांच्या पोट-या, कंबर, पाठ, मांड्या, खांदे आणि शिर हे अनुक्रमे एकाहून एक जड असतात.

५. गोमांसाचा अतिक्षुधावस्थेत (भस्म्या रोग) उपयोग करतात.

६. कोरडा खोकला, श्रम, अतिकृशता आणि शुद्ध वातविकारांवर गोमांस अौषधाचंच काम करते.

७. विषमज्वरासाठी गोमांस उपयुक्त सांगितले आहे.

आयुर्वेदात आणखी एक तत्त्व सांगितले आहे. त्यानुसार सृष्टीतील प्रत्येक पदार्थ हे अौषध आहे. कोणत्या वेळी कशाचा उपयोग करायचा हे वैद्याने तारतम्याने ठरवायचे असते. त्यासाठीच आहारीय अशा प्रत्येक घटकाचे गुणधर्म विशद केले आहेत. त्यानुसारच गोमांस खायचे की न खायचे, हे संबंधितांवर सोडून गोमांसाच्या गुणधर्माचा माहिती-प्रपंच केला आहे.

सबस्क्राईब करा

* indicates required