अरब -इस्राएल संघर्ष म्हणजे अनेक युध्दांचा इतिहास -भाग ३
१९६७ सहा दिवसांचे युद्ध:
इस्राएलने आजूबाजूच्या अरब देशांवर सैन्य वापरून विजय मिळवलेला असला तरीही शेजारी राष्ट्रांचे संबंध इस्राएलशी कधीही सुधारले नाहीत. १९६७ मध्ये इजिप्तने सुवेझ कालव्यातून इस्रायली जहाजांना पाठवण्याची परवानगी नाकारली तेव्हा युद्धाचे वारे पुन्हा वाहू लागले.इस्राएल भोवती शेजारी राष्ट्रांच्या सैन्याची हालचाल वाढू लागताच इस्राएलने तातडीने इजिप्त वर हल्ला केला. या हल्ल्यात लवकरच इजिप्त बरोबर जॉर्डन, सीरिया, इराक, सौदी, कुवेत, लेबनॉन हे देश ही सामील झाले. या सर्वांनी आपापल्या देशाला लागून असलेला इस्राएल चा भाग ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला,पण तो प्रयत्न यशस्वी झाला नाही. या प्रयत्नात जवळ जवळ वीस हजार अरब सैनिकांचा मृत्यू झाला.अवघ्या सहा दिवसात या देशांनी आपापले सैन्य मागे घेऊन शांतता प्रस्तावाला मान्यता दिली. इस्राएलने गाझा-पट्टी आणि वेस्टर्न बँक पुन्हा स्वतः च्या ताब्यात घेतला.
या युद्धामध्ये आणि नंतर २ ते ३ लाख पॅलेस्टिनी लोकांना गाझा-पट्टी आणि वेस्टर्न बँक सोडून पलायन करावे लागले. त्यांचे वंशज आज लेबनॉन आणि इजिप्त मध्ये निर्वासित छावण्या मध्ये राहतात. या निर्वासित छावण्यां मधून राहणाऱ्यां कडून इस्राएल वर पुन्हा पुन्हा हल्ले होत असतात. आमच्या मातृभूमीतून आम्हाला हाकलून लावले आहे, अशी या निर्वासितांची भावना आहे. काहींना इस्राएल वर सूड घेण्याची इच्छा आहे. त्यांना शस्त्रास्त्र वगैरे पुरवण्यास आजूबाजूच्या अतिरेकी संघटना तयार असतात.
१९९० च्या दशकात अमेरिका आणि संयुक्तराष्ट्रानी या प्रश्नाचा निर्णायक तोडगा काढण्यासाठी बैठक बोलावली. त्यात पॅलेस्टाईनि नेत्यांना बोलावून त्यांना गाझा पट्टी आणि वेस्ट बँक इथे पॅलेस्टिनी वस्ती करण्याची अनुमती दिली गेली.पण या तोडग्याला पॅलेस्टिनी इस्लामिक जिहाद आणि हमास या कट्टरपंथीय संघटनांचा विरोध होता. त्यामुळे पुन्हा जो हिंसाचार सुरु झाला त्यात तत्कालीन इस्रायली पंतप्रधान मारले गेले आणि या प्रश्नाचा शांतता पूर्ण तोडगा काढणे अशक्यच होऊन बसले.
सप्टेंबर २००० मध्ये गाझा पट्टी मधून इस्राएल वर पुन्हा सशस्त्र हल्ले सुरु झाले. हा हल्ला परतून लावतानाच तत्कालीन इस्रायली पंतप्रधानांनी गाझा पट्टी वरचा पूर्ण हक्क सोडन त्यांना स्वातंत्र्य दिले , आणि तेथील सैन्य माघारी घेतले. जरी गाझा पट्टीत इस्रायली सैन्य नसले, तरीही तिथून उडणारी विमाने, समुद्रकिनाऱ्या वरून येणार जाणार वाहतूक, तेथील अन्नधान्य, वीज व पाणीपुरवठा इस्राएल च्या ताब्यात आहे.त्यामुळे प्रत्यक्षात या स्वातंत्र्याला फारसा अर्थ नव्हता. २००६ मध्ये झालेल्या निवडणुकां मध्ये गाझापट्टीत कट्टरपंथीय इस्लामिक संघटना हमास ची सत्ता प्रस्थापित झाली. स्वसंरक्षणाच्या दृष्टीने इस्राएलने गाझा पट्टीभोवती आपल्या सैन्याचा विळखा घट्ट केला. त्यानंतर आजही हमास आणि इस्राएलमध्ये सशस्त्र चकमकी सतत चालू राहिल्या.
त्याचेच पुढचे सत्र म्हणजे सध्या चालू असलेले युद्ध बघितले की असे वाटते की या ऐतिहासिक संस्कृतीला सततच्या हिंसाचाराचा शाप आहे की काय ?
गाझा पट्टी मधील सामान्य पॅलेस्टिनी मुस्लिम नागरिकाचे आयुष्य सोपे नाही. सतत चा हिंसाचार, निर्वासित होण्याची भीती , भविष्याच्या दृष्टीने कोणतीही स्थैर्य नाही , अशा अनिश्चिततेच्या सावटाखाली पिढ्या ना पिढ्या हे लोक जगत आहेत. सध्या चालू असलेल्या युद्धामध्ये एकीकडे इस्राएल ने पाणी , अन्न आणि वीजपुरवठा मर्यादित केला आहे. शेजारी राष्ट्रे यांना निर्वासित म्हणून घ्यायला तयार नाहीत. १७ वर्षाखाली निवडून दिलेल्या हमास गटाने आता पूर्ण हुकूमशाही पद्धतीने यांच्या मातृभूमी चा ताबा घेतला आहे. त्यांना आपल्या नागरिकांच्या सुरक्षा आणि भविष्य पेक्षा इस्राएल वर सूड घेण्या च्या वेडाने जास्त पछाडले आहे.
सर्वसामान्य इस्रायलीही भयाच्या वातावरणाने घेरलेला आहे. हमास,हिझबुल्ला किंवा इतर कोणी कट्टरपंथी येऊन कधी हिंसाचार घडवून आणेल याची शाश्वती नाही. माणुसकीच्या नात्याने आपल्या शत्रूशी वागावे तर त्याने दर वेळेस दगाफटका केल्या इतिहास आहे..तुमच्या शत्रूचा इतिहास जेव्हा आजपर्यंत संधी मिळताच निष्पापांची हत्या, बलात्कार आणि जबरदस्तीने धर्मांतर करून जागा बळकावण्याचा असेल तर त्यांना मानवी हक्क देण्याची दया तुम्हाला परवडणारी नसते.
अत्यंत गुंतागुंतीचा होऊन बसलेला हा प्रश्न नजीकच्या काळात सुटणे तर जवळ जवळ अशक्य वाटते. शतकानुशतके हा प्रश्न यध्दाच्या मार्गाने सोडविण्याचा प्रयत्न झालेला आहे आणि प्रत्येकवेळी त्यातून पुन्हा हिंसाचार सुरु झालेला आहे. या वेळेसच्या युद्धातूनही शांतता मिळेल याची काही शाश्वती नाही. आपण फक्त अपेक्षा करू शकतो की हे युद्ध नव्या वैश्विक महायुद्धाला तोंड फोडणार नाही. कारण या हिंसाचारात सर्वसामान्य नागरिक, मग तो कोणत्याही बाजू चा असो, तो सर्वात जास्त भरडला जातो.
In the end, the war doesn’t tell who is right, it only determines who is left.
- डॉ.अवनी पाध्ये बारबिंड