BrExit म्हणजे काय रे भाऊ?

हे BrExit रेफरेन्डम काय आहे?

ग्रेट ब्रिटन हा युरोपिय युनियनचा सदस्य आहे. आता अनेक कारणांमुळे गेले कित्येक वर्षे ब्रिटनने युनियनमध्ये राहावे की नाही यावर त्या देशांत वाद चालू होता. यंदा ब्रिटिश पंतप्रधानांनी याविषयावर जनमत घेण्याचे ठरवले. हे जनमत 'ब्रिटन + एग्झिट' यामुळे 'ब्रेग्झिट' असे प्रसिद्ध झाले. 

 

हे सारे आले कुठून?

ब्रिटन आणि युनियन यांचं लग्न तसं धुसफुसीनेच भरलेलं आहे. ब्रिटिशांना युनियन सासुरवासच वाटे. अशाच १९७५च्या जनमतात मात्र ब्रिटनने युनियनसोबत रहाण्यासाठी मतदान केले होते - मात्र तेव्हा युनियनचे चलन (युरो) एक नव्हते. आताही ब्रिटनमध्ये युरो नाही तर त्यांचा पौंडच चालतो. सध्याही ब्रिटनमध्ये यायला इतर अनेक युरोपियन देशांसारखा 'शेंगेन' व्हिजा चालत नाही. गेल्या चार-पाच वर्षात मध्यपूर्वेतून वाढलेले स्थलांतर, फ्रान्स व लंडनमधील बॉम्बस्फोट व एकुणच ब्रिटनमधील वाढते परकीयांचे प्रमाण बघता तेथील लोक अस्वस्थ होते. त्याची परिणिती यावर्षीच्या नव्या जनमतात झाली.

 

कधी झाले जनमत आणि निकाल काय?

२३ जून २०१६ला हे जनमत झाले आणि आज २४ जून रोजी मतमोजणी आहे. सध्या तरी जनमताचा कल ब्रिटनने युरोपिय युनियन सोडावे असा आहे. तेव्हा आता ब्रिटन युनियनमधून बाहेर पडेलसे दिसते.

 

त्यांनी युनियन सोडले तर भारतावर काय परिणाम होईल?

१. भारत आणि ब्रिटनचे संबंध खूप जुने आहेत. स्वातंत्र्यपूर्व काळापासून अनेक कंपन्यांची ऑफिसेस ब्रिटनमध्येही आहेत. भारतासाठी ब्रिटन हे युरोपचे प्रवेशद्वार आहे. जवळजवळ ८०० भारतीय कंपन्यांची युरोपियन हेडक्वार्टर्स ब्रिटनमध्ये आहेत. ब्रिटन वेगळा झाल्यावर ही स्थिती रहाणार नाही. सुरूवातीच्या काळात या कंपन्यांवर त्याचा परिणाम होईल.

२. भारताचे युरोपियन युनियन सोबत 'फ्री ट्रेड अग्रीमेंट' आहे. ब्रिटन वेगळा झाल्यावर त्यासोबत व्यापाराचा भारताला नव्याने विचार करावा लागेल. नवे करार होऊ शकतील. यामुळे ब्रिटनमधून अधिक सुविधा मिळण्याची शक्यता आहे .या बदलाचा भारत संधी म्हणून कसा व कितपत उपयोग करतो हे बघायचे. 

३. भारतातील आयटी क्षेत्रावरही याचा दुतर्फी परिणाम होईल. एक तर युरोपिय युनियनमधील ऑफिसेससाठी इन्फ्रास्ट्रक्चर कॉस्ट त्यांना लागेल. मात्र दुसरीकडे या दुभंगामुळे त्यांच्या प्रणाल्यांमध्ये जे बदल लागतील ते बदल करण्याची कामे भारतीय आयटी कंपन्यांना मिळून त्यांच्या मिळकतीत वाढ होऊ शकते.

४. BrExitनंतर ब्रिटनचे इमिग्रेशन रुल्स खडतर होतील असा अंदाज आहे, तसे झाल्यास तेथील भारतीयांना उपलब्ध नोकर्‍यांत घट होऊ शकते. मात्र स्किल्ड वर्कर्स - म्हणजे प्रशिक्षित कर्मचार्‍यांना युरोपिय युनियनमधील नोकर्‍यांमध्ये वाढ होऊ शकते.

५. या BrExitमुळे पौंडाच्या चलनवाढीवर व एकूणच ब्रिटनच्या अर्थव्यवस्थेवर मोठा परिणाम होणार आहे. तो नक्की कसा होईल याबद्दल मोठा गोंधळ  आहे. जोवर युनियनमुक्त ब्रिटन आपली नवी धोरणे ठरवत नाही तोवर त्यावर ठाम काही बोलणे घाईचे होईल. मात्र तोवर जगभरात अनिश्चिततेमुळे होणारे परिणाम भारतालाही "स्नोबॉल'इफेक्टमुळे भोगावे लागतील हे स्पष्ट आहे.

 

अजून एक शक्यता अशी आहे की युनियन फुटण्याची ही नांदी असेल आणि आता हळूहळू येत्या ५-१० वर्षात पुन्हा युरोपचे बाल्कनायझेशन होईल. तसे झाल्यास जगाच्या आर्थिक अस्थैर्यात भर पडेल आणि आर्थिक अस्थैर्य ही तिसर्‍या महायुद्धाची पूर्वपायरी ठरू शकते. परंतु हे सगळे अंदाज आहेत, याची खरी उत्तरे काळाच्या पोटात दडलेली आहेत. 

सबस्क्राईब करा

* indicates required