कॅलेंडरमधला एक दिवसच गाळल्याने या देशाच्या अर्थकारणात आणि व्यापारात फायदा झाला!! हे का आणि कसे साध्य झाले?
एखाद्या दिवशी तुम्ही झोपलात आणि थेट परवा दिवशी उठलात असे कधी तुमच्या आयुष्यात घडले आहे का? तुमच्या आयुष्यात असे काही चमत्कारिक प्रसंग घडण्याची शक्यता नसेल, पण एका देशाच्या बाबतीत मात्र हे घडले आहे. आता हा देश कोणता आणि हे कसे घडले हे जाणून घेण्यासाठी हा लेख पूर्ण वाचा.
समोआ हे एक छोटेसे समुद्री बेट आहे. हे पूर्वी जर्मनीच्या ताब्यात होते, नंतर ते न्युझीलंडच्या ताब्यात गेले. १९६२ पासून हा देश न्यूझीलंडच्या ताब्यातूनही मुक्त झाला आणि त्याला स्वातंत्र्य मिळाले. हे बेट अमेरिकन समोआ बेटापासून फक्त १८० मैल अंतरावर आहे, मात्र जेव्हा समोआ बेटावर सोमवार असेल तेव्हा अमेरिकन समोआ बेटावर मंगळवार असतो.
हा देश जेव्हा जर्मनीच्या ताब्यात होता तेव्हा व्यापार उदिमाच्या बाबतीत या बेटाची चांगलीच भरभराट झाली होती. नंतर साम्राज्यवादी विस्ताराच्या लालसेने न्युझीलंडने हे बेट जर्मनीकडून हिसकावून घेतले. अर्थात या बेटाची सत्ता बदलली असली तरी या बेटाच्या अंतर्गत कारभारात फारसा फरक पडला नव्हता. हा झाला हा बेटाचा इतिहास. आता याचा आणि या देशात एक दिवस न उगवल्याचा काय संबंध असा प्रश्न तुम्हाला पडलाच असेल? तर तसा वरवर याचा काहीच संबंध नाही असे जरी वाटत असले तरी याची खरी गोम यातच दडली आहे.
आपली पृथ्वी गोल आहे, त्यामुळे प्रत्येक देशात सूर्योदय होण्याची वेळ वेगवेगळी असते. म्हणजे कधी कुठल्या देशात रात्र असेल तर कुठे दिवस. आता सूर्यावर कुठल्या देशाचे नियंत्रण नसले तरी आपआपल्या देशातील घड्याळाचे नियंत्रण मात्र या देशांकडेच आहे. सर्व देश आंतरराष्ट्रीय दिनांक रेषेनुसार आपली वेळ ठरवतात.
ही आंतरराष्ट्रीय दिनांक रेषा पृथ्वीच्या मध्यातून जाते असे मानले जाते. समोआ आतापर्यंत या रेषेच्या पूर्वेकडे होता, तो २९ डिसेंबर २०११ नंतर रेषेच्या पश्चिमेकडे सरकला. हे कसे केले गेले? तर २९ डिसेंबर २०११ रोजी जेव्हा घड्याळात रात्रीचे बारा वाजले तेव्हा सुमोआने आपले कॅलेंडर बदलले. दुसरा दिवस ३० डिसेंबर घेण्याऐवजी थेट ३१ डिसेंबर घेतला आणि २३ तासांनी आपले घड्याळ पुढे घेतले. आता प्रश्न उरतो सुमोआने असे का केले? सुमोआला भविष्यात जाण्याची इतकी घाई का होती?
न्यूझीलंड, ऑस्ट्रेलिया, चीन या देशांशी सुमोआचा व्यापार चालतो, ज्या दिवशी सुमोआमध्ये रविवार असेल आणि सार्वजनिक सुट्टी असेल त्या दिवशी न्युझीलंडमधील सार्वजनिक सुट्टी संपून कामकाम सुरु झालेले असे. न्यूझीलंड, ऑस्ट्रेलिया, चीन हे देश आंतरराष्ट्रीय दिनांक रेषेच्या त्या बाजूला, तर सुमोआ आंतरराष्ट्रीय दिनांक रेषेच्या या बाजूला असल्याने त्यांच्या घड्याळात तब्बल २३ तासांचे अंतर पडत होते. यामुळे त्यांच्या व्यापारात आणि व्यवहारातही खूप मोठा गोंधळ उडत असे. यावर उपाय म्हणून सुमोआचे तत्कालीन पंतप्रधान टुएलिपा मॅलील्गोई यांनी आपले कॅलेंडर एक दिवसांनी पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला.
मागे सांगितल्याप्रमाणे कधी काळी या बेटावर जर्मनीची सत्ता होती आणि जर्मनी आंतरराष्ट्रीय दिनांक रेषेच्या पूर्वेला आहे. त्यानुसार त्यांनी समोआची वेळ निश्चित केली होती. पुढे समोआ न्यूझीलंडच्या ताब्यात गेला. न्यूझीलंडपासून त्याला स्वातंत्र्यही मिळाले. पण न्यूझीलंड, ऑस्ट्रेलिया या देशांशी त्यांचे व्यापारी संबंध वाढत गेले.
गंमत म्हणजे ३० डिसेंबर २०११ हा दिवस समोआ बेटावर उगवला नसला तरी, तिथल्या कामगारांना नेहमीप्रमाणे त्या दिवसाचा पूर्ण पगार मिळाला. पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी आणि आपल्या या मोठ्या निर्णयाचा जल्लोष म्हणून सुमोआने अमेरिकन सुमोआ बेटाच्या एक दिवस आधीच आमच्याकडे ३१ डिसेंबर साजरा करायला या असे आवाहन ही केले होते. दिनांक रेषेवरील स्थान बदलल्याने अमेरिकन सुमोआ बेत अवघ्या १०० मैलांवर असूनही त्याच्या कॅलेंडरमध्ये एक दिवसाचा फरक आहे. म्हणजे सुमोआ मध्ये शनिवार असेल त्या दिवशी अमेरिकन सुमोआ बेटावर शुक्रवार असतो.
याच दिवशी आणखी एक मोठा बदल या बेटाने स्वीकारला तो म्हणजे रस्त्याच्या डाव्याबाजूने कार चालवण्याऐवजी रस्त्याचा उजव्या बाजूने कार चालवण्याचा. कारण न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलियामध्ये याच बाजूने वाहने चालवली जातात. तेव्हा तिथून येणाऱ्या पर्यटकांना, व्यापाऱ्यांना अडचण होऊ नये म्हणन सुमोआने आपल्या वाहतूक नियमावलीतही मोठा बदल केला.
तर अशा पद्धतीने दिनांक रेषेवरील आपले स्थान बदलून सुमोआ आता जगातील सर्वात पुढे असणारा देश बनला आहे कारण, त्यांनी निवडलेल्या वेळेनुसार सुमोआ हे असे बेट आहे जिथे सर्वात आधी सूर्य उगवतो. इतर देशांशी तुमचे व्यापारी संबंध तुमच्या देशातील व्यवहारावर कितपत प्रभाव पाडू शकतात, हे यावरून लक्षात येते.
मेघश्री श्रेष्ठी




