computer

इस्राएल आणि पॅलेस्टाईन:एक रक्तरंजित इतिहास- भाग -१

७ ऑक्टोबर २०२३ ची सकाळ उजाडली तीच मुळी इस्राईल देशावर हमास या अतिरेकी संघटनेने केलेल्या दहशतवादी हल्ल्याच्या बातमीने! यापूर्वी जवळ जवळ २३ वर्षाखाली या भागात हिंसाचार झाला होता तो सप्टेंबर २००० मध्ये. साधारण दर एक काही दशकांमध्ये एकदा तरी या भागात हिंसाचार होऊन इस्राएल आणि पॅलेस्टाइन मधील नागरिक मृत्युमुखी पडत असतात.दक्षिण  आशियातील हा भाग गेल्या कित्येक शतकांपासून नव्हे,तर हजारो वर्षांपासून धुमसत आहे.

सध्या गाझा पट्टी मध्ये चालू असलेल्या लष्करी कारवाया आणि एकंदरीत युद्ध परिस्थितीच्या लाईव्ह बातम्या तर दररोज आपल्याला पाहायला मिळतच आहेत, पण त्यामागचा इतिहास फार क्वचित चर्चिला जातो. तो इतिहास आपण या लेखात वाचूया. या भू भागाचा पूर्ण इतिहास अत्यंत सुरस आहे. 
इंग्लिश नेते  विन्स्टन चर्चिल म्हणाले त्याप्रमाणे  “Those that fail to learn from history are doomed to repeat it.” म्हणून हा इतिहास माहित करून घेणे  गरजेचे आहे. 

पार्श्वभूमी

जेरुसलेम हे शहर सध्याच्या इस्राएल आणि वेस्ट बँक सेटलमेंट(पॅलेस्टाईन )च्या मध्यावर वसलेले शहर आहे.जगातील ३ मुख्य अब्राहमीक धर्म- जुडाईसम, ख्रिश्चन आणि मुस्लिम- तिन्ही धर्मांसाठी हे महत्वाचे पवित्र स्थळ मानले जाते. हे शहर कमीत कमी २८०० ते ३००० वर्षांपूर्वी वसवले गेले आहे अशा नोंदी  उपलब्ध आहेत.
एकंदरीत वाळवंटी आणि रुक्ष असलेल्या या भागात त्या काळापासूनच जेरुसलेम जवळ एक झरा वाहतो, जो इथे प्यायला आणि मानवी वस्ती करायला पाणी पुरवतो. त्या झऱ्या भोवती या भागात मनुष्य वस्ती सुरु झाली असावी असा अंदाज आहे. आज तो झरा आणि त्याच्या आजुबाजू ची जुईश मंदिरे यहुदी (ज्यू) लोकांसाठी पवित्र प्रार्थनास्थळ आहे. तेथील डेव्हिड  व सॉलोमन या राजांची मंदिरे यांनाही धार्मिक महत्व आहे. 

ख्रिस्ती लोक मानतात कि २००० वर्षांपूर्वी जेव्हा येशू ख्रिस्ताने पवित्र मेरी च्या पोटी जन्म घेतला तेव्हा त्याला वाढवण्यासाठी तिने त्याला जेरुसलेम मध्ये आणले, कारण त्या काळात हे शहर जगाचा केंद्रबिंदू समजले जात असे.येशू ख्रिस्ताने त्याच्या आयुष्याचा मोठा काळ जेरुसलेम मध्ये घालवला, धर्मप्रसार केला ,आणि त्याला सुळावर देखील इथेच चढवले गेले. इथेच ख्रिस्ताने पुनर्जन्म घेतला आणि तो स्वर्गस्थ झाला.त्यामुळे जेरुसलेम ला ख्रिस्ती लोकांमध्ये अनन्यसाधारण महत्व आहे. 
 

सुन्नी मुस्लिम लोकांसाठी मक्का आणि मदिना नंतर जेरुसलेम तिसरे महत्वाचे प्रार्थनास्थळ आहे. कुराणामध्ये नमूद केल्या प्रमाणे प्रेषित मोहम्मद यास एका रात्रीत मक्का वरून जेरुसलेमपर्यंत प्रवास ईश्वराने घडवला.  तिथे अलअक्सा मस्जिदीत प्रार्थना करून पैगंबराने ईश्वरासोबत स्वर्गाची सैर केली. पैगंबरापूर्वीचे प्रेषित अब्राहाम, डेव्हिड , सॉलोमन आणि जीझस यांचेही ते शहर असल्याने सगळेच प्रार्थना करण्यासाठी येतात.. थोडक्यात जेरुसलेम हे शहर आणि त्या भोवतीचा परिसर इसवी सन पूर्व ३००० ते इसवी सन १००० पर्यंत महत्वाची नागरी केंद्र राहिलेले आहे.म्हणून च सर्व राजसत्ता व धर्मसत्तांचा तो भूभाग  काबीज  करण्याचा  सतत प्रयत्न राहिलेला आहे.

इसवी सनपूर्व १०१० मध्ये दैवी राजा डेव्हिड याने सध्याच्या इस्राएल  भागात जुदाह चे राज्य स्थापन केले. तिथून ज्यू लोकांनी त्या भागाला आपले मूळ स्थान मानायला सुरुवात केली. त्या नंतरचा दैवी राजा सॉलोमन याने तिथे ज्युईश मंदिरांची स्थापना केली.राजा सॉलोमन च्या मृत्यू नंतर मात्र  ज्यूदाह च्या राज्याची  दोन शकले झाली - किंग्डम ऑफ जुदाह  आणि किंग्डम ऑफ इस्राएल.  या दोन्ही राजांच्या मिळून कालखंडालाच इस्राएलाईट पिरियड म्हणतात. या ऐतिहासिक पार्श्वभूमीतूनच आजचे ज्यू सध्याच्या इस्राएलला आपली मातृभूमी मानतात. 

इसवी सन पूर्व ९०० मध्ये जवळच्या इजिप्ती फॅरोह (महाराजा)ने या राज्यावर मोठा हल्ला करून हा भाग स्वतः च्या ताब्यात घेतला. या मोठ्या हल्ल्यात इथे जो हिंसाचार व हानी झाली त्याची वर्णने ज्यूईश लोकांच्या धर्मग्रंथात दिसून येतात. त्या नन्तरहि इ.स.पु. ८व्या  व ७व्या शतकात या समृद्ध राज्यावर फिलीस्तीन,इथिओपियन आणि अरब लोकांद्वारे अनेक हल्ले झाले,ज्यात या भागाची लुटालूट झाली आणि असंख्य लोकांची कत्तलही झाली. त्यानंतर मोठा काळ हा भाग इजिप्ती व बॅबिलोनियन राजांच्या ताब्यात राहिला. इसवी सन पूर्व ५० मध्ये इजिप्ती साम्राज्यावर हल्ले करून रोमन साम्राज्याने हा भाग आपल्या ताब्यात घेतला. त्यानन्तर रोमन संसदेने  इथे ज्यूईश  राजांना मांडलिकत्व देणे सुरु केले.

इसवी सन ०६ च्या सुमारास बाल येशू ख्रिस्ताला माता मेरीने जेरुसलेम मध्ये आणले. पुढील ३० वर्षे  येशूने धर्मोपदेश आणि चमत्कारांच्या माध्यमातून स्वतःच्या नव्या धर्माचा प्रसार  केला. हे तेथील प्रस्थापित धर्मगुरूंना रुचणारे नव्हते. त्यामुळे ख्रिस्ताच्या वयाच्या ३३ व्या वर्षी ज्युईश धार्मिक नेत्यांनी रोमन संसदेच्या मदतीने ख्रिस्ताला सुळावर चढवले,असे मानले जाते.  तरीही तिथून ख्रिश्चन धर्माचा  मोठ्या प्रमाणात प्रसार झाला. हा भूभाग मात्र रोमन व बायझेंटिन साम्राज्यातील चकमकींमुळे तणावपूर्णच राहिला.

 

इसवी सन ६०० मध्ये प्रेषित मोहम्मद पैगंबर यांचा नवा धर्म इस्लाम मूळ धरू लागलेला होता.अरब मुस्लिमांची कॅलिफेट सेना मक्का व मदिनेवरून आजूबाजूला सशस्त्र धर्मप्रसार करत होती. त्यांनी जेरुसलेम आणि आजूबाजूच्या भागावर सत्ता स्थापन केली.त्यानंतर जवळ जवळ ३ शतके हा भूभाग शांत होता. ११व्या शतकात मात्र इथे हिंसाचार पुन्हा सुरु झाला.अनेक चर्च व यहुदी मंदिरे यांची जाळपोळ व लुटालूट झाली. कट्टरपंथीयांनी या भागाचा पूर्ण ताबा घेतला. 
तरीही, मध्ययुगीन काळ संपे पर्यंत ख्रिश्चन क्रुसेडर सेनांनी या भागावर अनेक हल्ले केले आणि या भागाची सत्ता मुस्लिम, ज्यू आणि ख्रिश्चन यांच्यामध्ये  बदलत राहिली. निर्णायक विजय मिळवून पूर्ण सत्ता मात्र कोणालाही मिळवता आली नाही. 

१५१६ मध्ये ऑट्टोमन साम्राज्याने इस्राएल व सीरियाचा अधिकांश भाग स्वतःच्या अधिपत्याखाली आणला. ऑट्टोमन राजा सुलेमान याने या भागात शांतता प्रस्थापित केली आणि विविध धर्मांना प्रार्थना करण्याची आणि भयमुक्त जगण्याची परवानगी दिली. ऑट्टोमन साम्राज्याची सत्ता पुढे १९ व्या शतकाच्या मध्य पर्यंत या भागात राहिली. मात्र पहिल्या विश्वयुध्दानंतर ऑट्टोमन साम्राज्याच्या पूर्ण ऱ्हास झाला आणि तत्कालीन पॅलेस्टाईन- इस्राएल  भागावर ब्रिटिशांनी  आपली सत्ता प्रस्थापित केली, आणि या भागाला  कंट्रोल्ड पॅलेस्टाईन असे नाव दिले. त्यानंतर या भागात तात्पुरती शांतता प्रस्थापित झाली. ब्रिटिश राज्यकाळात  इथे मोठ्या प्रमाणात ज्युईश लोकांचे येणे सुरु झाले. अनेक सधन ज्युईश लोकानी इथे मोठ्या प्रमाणावर जमिनी खरेदी केल्या, आणि अनेक ज्युईश कुटुंबे आजूबाजूच्या अरब भागातून, तसेच युरोपमधून ही येऊन स्थायिक होऊ लागली.  

विषय खोल असल्यामुळे भाग १ इथे संपतो. उद्या संध्याकाळी भाग २ आपण वाचूया

सबस्क्राईब करा

* indicates required