साती आसरा किंवा सात आसरा म्हणजे कोणत्या देवता ?

तुमच्या आमच्या गावात साती आसरा किंवा सात आसरा हे देऊळ कुठे तरी दिसतेच दिसते.या देवळात इतर देवळांसारखा फारसा थाटमाट दिसत नाही.छोटेसे मंदीर आणि त्यात शेंदूरानी माखलेल्या सात  शिळा - रेखीव मूर्ती वगैरे काहीच नसतं.पंचांगात पण या देवतांचा फारसा उल्लेख दिसत नाही.मग या सात/साती आसरा आल्या कुठून ?
थोडीशी चर्चा आणि चौकशी केल्यावर मिळालेली माहिती अशी : 
या सात आसरा म्हणजे सात अप्सरा. अप्सरा या शब्दाचा अपभ्रंश आसरा ! आता पुढचा प्रश्न सात का ? तर या अप्सरा म्हणजे जलदेवता आहेत आणि ज्या सात जलचरांच्या रुपातच असतात.जलाशयांचे रक्षण हेच त्यांचे काम! त्यामुळे तुम्हाला पाण्याच्या जागीच या अप्सरांचे मंदीर दिसेल.काही गावात तीन रस्ते जिथे एकत्र येतात तिथे पण या आसरांचे मंदीर दिसेल. पण सर्वसाधारणपणे जलाशयाच्या आसपासच सात आसरा हे देऊल दिसेल. 
आता वाचा या सात अप्सरांची नावं - मत्स्यी कूर्मी कर्कटी दर्दुरी जतुपी सोमपा मकरी !
मत्स्यी म्हणजे माशांच्या रुपात , कुर्मी म्हणजे कासवाच्या रुपात असा अर्थ लावला तर त्यांचे रुप तुमच्या लक्षात येईल.तरी पण एकदा रांगेत या नावांचा अर्थ वाचूनच घ्या.
मत्स्यी- मासा . कुर्मी - कासव , कर्कटी- खेकडा , दर्दुरी- बेडूक,मकरी - मगर  जतुपी आणि सोमपा या दोन नावांचा अर्थ आम्हालाही मिळालेला नाही.
तुमच्याकडे आणखी काही माहिती असेल तर कमेंट बॉक्समध्ये शेअर करा.

सबस्क्राईब करा

* indicates required