इंडियन डिमन डे ३०१६: कहाणी नव्या सणाची

शीर्षक वाचून "हे काय आहे बॉ?" असा प्रश्न नक्कीच मनात आला असेल  तर आधीच सांगतो,"आजपासून १००० वर्षांनंतर भारतात साजरा होणार्‍या एका सणाचे हे वर्णन आहे."  मुलांच्या पुस्तकातला हा धडा अर्थातच इंग्रजीत आहे पण बोभाटाच्या वाचकांसाठी तो मराठीत लिहिला आहे.
मुलांनो, आपण दरवर्षी इंडियन डीमन डे साजरा करतो. खरे म्हणजे हा डीमन डे म्हणजे दैत्याचा दिवस असा गैरसमज तुमच्या मनात झाला असेल तर तो काढून टाका. या सणाचे मूळ नाव  ’इंडियन डीमॉनीटायझेशन डे’ असे आहे.हा सण दरवर्षी ८ नोव्हेंबरपासून तीन दिवस साजरा केला जातो.


पहिल्या दिवशी म्हणजे ८ नोव्हेंबरला नवर्‍याने उशीरा घरी यायचे असते.

बायकोने दार न उघडता नवर्‍याला (भटो ,भटो कुठे गेला होता या चालीवर )  विचारायचे असते "नमो, नमो कुठे गेला होतात"?

नवर्‍याने यावर काही उत्तर न देता गप्प उभे रहायचे असते.

त्यावर दार उघडताना  बायकोने  "असला कसला रोज नवा जुमला? "असे म्हणून त्याला घरात घ्यायचे असते.

नवरा येताना एक पांढर्‍या दाढीवाल्याचा फोटो घेऊन आला  असतो, तो डायनिंग टेबलवर ठेवून घरातल्या सगळ्यांनी त्यासमोर उभे रहायचे असते. घरच्या लक्ष्मीने म्हणजे बायकोने फोटोसमोर बँक पासबुक ठेवून "अच्छे दिन आयेंगे कब? " असे विचारायचे असते.

बाकीच्यांनी मोठ्यानी हसून "Rejoice, For worst is yet to come" असे म्हणायचे असते. त्यानंतर रात्रभर चिंताक्रांत राहून नवर्‍याने उपाशी झोपायचे असते. दुसर्‍या दिवशी सकाळी बायकोने घरातल्या नोटा  नवर्‍यासमोर समोर ठेवून त्या बँकेत जमा करायला सांगायच्या असतात.

मुलांनो सण म्हणजे बँकेत गर्दी असणारच नाही का ?या दिवशी बँका नव्या नोटा छापतात आणि ग्राहकांना देतात. नोटा देण्यापूर्वी ग्राहकांनी "BIG BROTHER IS WATCHING YOU…" हा फॉर्म भरून घरी जायचे असते. लहान मुले या दिवशी रिकाम्या डब्यात खोटी नाणी भरून त्याचा खुळखुळा बनवून वाजवतात आणि जोरजोरात  "छन छन लक्ष्मी नमोस्तुते "असे म्हणतात. या दिवशी सरकारने विशेष सरकारी सुट्टी दिलेली असते.

तिसर्‍या दिवशी सकाळी पुढार्‍यांनी राजकारणाला, उद्योगपतींनी उद्योगाला. बिल्डरानी नव्या प्रोजेक्टला सुरुवात करून  नव्या खोट्या हिशोबाच्या चोपड्यांचा शुभारंभ करायचा असतो आणि इतरांनी आपापल्या कामाला जायचे असते.

सबस्क्राईब करा

* indicates required