अच्छे दाग वाली ही शाई येते तरी कूठून : या घेऊया शाईचा मागोवा

मतदानाच्या वेळी बोगस मतदान होऊ नये म्हणून मतदारांच्या बोटावर शाई लावली जाते. निवडणुकीतील ही शाई मैसूरमध्ये असलेली ‘मैसूर पेंट्स अँड वॅर्निश लिमिटेड’ कंपनी तयार करते. एकेकाळी या प्रकारची शाई तयार करणारी मैसूर पेंट्स ही एकमेव कंपनी होती. ‘कृष्ण राज वोडियार’ या मैसूरच्या राजानं ‘मैसूर लॅक अँड पेंट्स लिमिटेड’ नावाने या कंपनीची स्थापना केली होती.

भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर या मैसूर पेंट्सचं रुपांतर सार्वजनिक क्षेत्रातल्या कंपनीत करण्यात आलं. भारतात पहिल्यांदा लोकसभा आणि विधानसभा निवडणूका झाल्या त्या १९५२ साली. त्यानंतर लोकांना  ’बोगस मतदान’ हे प्रकरण लक्षात आलं.  त्यावर उपाय म्हणून निवडणूक आयोगानं पुढं १९६२ साली झालेल्या 'तिसऱ्या सार्वत्रिक निवडणूकीत' या शाईचा  पहिल्यांदाच वापर केला गेला.

निवडणुकीत वापरल्या जाणाऱ्या या शाईत २५ टक्क्यांपर्यंत ‘सिल्वर नायट्रेट’ असतं. हे रसायन खूप महागडं असतं. त्वचेमधील प्रथिनांशी त्या क्षाराची रासायनिक क्रिया होते आणि त्याचा एकदम पक्का काळा रंग तयार होतो. या शाईचं वैशिष्ठ्य म्हणजे ही शाई कोणत्याही मार्गानं बोटावरून खोडली जाऊ शकत नाही. कमीत कमी तीन आठवडे ही शाई बोटांवर राहील अशी या शाईची निर्मिती केली गेली आहे. ‘नॅशनल फिजीकल सोसायटी’ मधल्या डॉ. एम. एल. गोयल यांच्या नेतृत्वाखाली शास्त्रज्ञांनी ही विशिष्ट शाई तयार केली. आणि अर्थातच या शाईचा फॉर्मुला अत्यंत गोपनीय ठेवण्यात आला आहे.

सर्व निवडणुकांमध्ये ही शाई वापरली जाते. उत्तर प्रदेशमध्ये लोकसंख्येमुळे या शाईचा जास्त वापर होतो तर लक्ष्यद्वीपमध्ये या शाईचा सर्वात कमी वापर केला जातो.

सबस्क्राईब करा

* indicates required