computer

पत्नीचा नागदंशाने घडवला खून, पण कोणताही पुरावा नसताना विज्ञानामुळे गुन्हा असा शाबित झाला!!

कोर्ट म्हणले की पोलीस, गुन्हेगार, वकील, न्यायाधीश हे सर्व आले. यात सर्वात महत्वाचे काय असते? तर ते म्हणजे पुरावे! पुरावे नसल्यास कधीकधी गुन्हेगार सुटले आहेत आणि निर्दोष माणसांनाही शिक्षा झाली आहे. पण नुकतीच एक वेगळी घटना घडली आहे ज्यात कोणताही पुरावा नसतानाही विज्ञानाच्या आधारे एका गुन्हेगाराला पकडण्यात आणि त्याला शिक्षा ठोठवण्यात पोलिसांना मोठे यश मिळाले आहे. नुकतेच केरळच्या एका माणसाला आपल्या पत्नीची हत्या केल्याबद्दल दुहेरी जन्मठेप आणि ५ लाख रुपये दंड ठोठावण्यात आला आहे. विषारी नागाचा वापर करून गुन्हेगाराने आपल्या पत्नीला मारले. पोलिसांनी वैद्यकीय, फॉरेन्सिक आणि वैज्ञानिक पुराव्यांद्वारे केस तयार केली. अत्यंत खिळवून ठेवणारी ही घटना पोलिसांनी कशी उलगडली हे आज समजून घेऊयात.

सुरज कुमार असं शिक्षा झालेल्या तरुणाचं नाव आहे. २८ वर्षांच्या सुरजने गेल्या वर्षी ७ हजार रुपयांना एक नाग विकत घेतला होता. नाग म्हणजेच किंग कोब्रा जगात विषारी मानल्या जाणाऱ्या सापांमध्ये मानला जातो. भारतात सापांची खरेदी-विक्री करणं हा गुन्हा आहे. पण सुरजने आपल्या पत्नीचा मृत्यू नैसर्गिक वाटावा म्हणून थंड डोक्याने हा सापळा रचला. एका सर्पमित्राकडून बेकायदेशीरपणे हा नाग विकत घेतला. एका प्लास्टिकच्या डब्यात हा विषारी नाग ठेवला होता. त्यांनतर हा नाग घेऊन तो थेट आपल्या सासरी गेला. तिथं त्याची पत्नी उत्तरा ही आधीपासूनच एका सर्पदंशावर उपचार घेत होती. सूरजने उत्तरावर नाग चावण्यापूर्वी तिला रसात मिसळून झोपेच्या गोळ्या दिल्या. ती बेशुद्ध झाल्याची खात्री पटल्यावरच तिच्या अंगावर नाग सोडला आणि तिच्या डाव्या हातावर दोनदा चावा घेतल्यावर तिच्या मृत्यूची खात्री केली. मात्र या सगळ्या प्रकारात तिच्या कुटुंबाला संशय आला. ते थेट पोलसांकडे गेले आणि सूरजवर त्यांना संशय असल्याचे सांगितले.

पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला. सापाची छेड काढल्याशिवाय तो कधीच चावत नसतो. सूरजने त्याचं तोंड पकडून त्याला पत्नी उत्तराचा चावा घेण्यास भाग पाडलं असं एका सर्पतज्ज्ञांनी सांगितलं. या प्रकरणाचा तपास ७८ दिवस चालला. त्यामध्ये १ हजारपेक्षाही जास्त पानांचं आरोपपत्र दाखल करण्यात आलं. सुनावणीदरम्यान ९० हूओन जास्त व्यक्तींकडून माहिती घेण्यात आली. यामध्ये सर्पतज्ज्ञ आणि डॉक्टर यांचा समावेश होता.

सूरजच्या फोनचे कॉल रेकॉर्ड, इंटरनेट हिस्टरी, मागच्या बागेतून सापडलेला मृत नाग, कुटुंबियांच्या गाडीत सापडलेला झोपेच्या औषधाचा अंश आणि इतर पुराव्यांद्वारे त्याने एक नव्हे, तर दोन साप आणल्याचं निष्पन्न झालं. उत्तरा सुरुवातीला ज्या घोणस सापाच्या दंशावर उपचार घेत होती. तो सापही सूरजनेच विकत घेतला होता असं तपासादरम्यान समोर आलं.

सर्पतज्ज्ञांच्या मते सापाने सूरज-उत्तराच्या खोलीत उंचावरील खिडकीतून प्रवेश करणं ही अशक्य बाब होती. ती खिडकी सूरजने मुद्दाम उघडी ठेवली होती. तसेच या सापाची सक्रिय असण्याची वेळ संध्याकाळी ५ ते ८ ही असते. रात्री उशिरा हे साप खोलीत घुसून कोणावर हल्ला करत नाहीत. तसेच नाग घराच्या भिंतीला लावलेल्या पाईपवर चढू शकत नाही असेही तज्ज्ञांनी सांगितले. इतकंच नव्हे, तर तपासादरम्यान एक खराखुरा नाग, सर्पमित्र तसंच बेडवर एक पुतळा ठेवून गुन्ह्याचं दृश्य पुन्हा रिक्रिएट करण्यात आलं. डमीवर जितक्या वेळा नाग सोडला त्या प्रत्येक वेळी नाग तिथून निसटून खाली गेला. खोलीतील एका अंधाऱ्या कोनाड्यात जाऊन हा नाग प्रत्येकवेळी लपत होता. शिवाय कित्येकवेळा छेडलं तरी सापाने चावा घेण्याचा प्रयत्न केला नाही. त्यानंतर प्लास्टिकच्या डमी पुतळ्याच्या हातावर चिकनचा तुकडा बांधून एक प्रयोग करण्यात आला. यावेळी सर्पमित्राने एका नागाचं तोंड पकडून तो हातावर दाबला. यावेळी त्या नागाचा चावा आणि उत्तराच्या हातावरील चावा यांच्यात साम्य आढळून आलं. त्यात सापाने २ चावे घेतले. उत्तराच्या शरीरावरच्या दोन्ही चाव्यांची रुंदी २ सेमींपेक्षा जास्त होती . दोन सलग दंश एकमेकांपासून २ मिमी अंतरावर होते. सामान्यतः नाग विष सोडण्यात कंजूषी करतात. एकाच वेळी इतक्या जवळ ते दंश करत नाहीत आणि व्यक्ती झोपेत असेल तर शक्यता आणखीच कमी होते.

सूरज आपल्या मुलाच्या जन्मापासूनच पत्नीचा खून करण्यासाठी कट रचत होता. त्याने कित्येक वेळा विषारी साप यांच्याबाबत इंटरनेटवर सर्च केलं होतं. तसंच युट्यूबवर त्याने कित्येक विषारी सापांचे व्हीडिओ पाहिले होते. हा सगळा अभ्यास करून त्याने सैतानी योजना आखली .गेल्या चार महिन्यांत सूरजने पत्नीवर केलेला हा दुसरा नव्हे, तर तिसरा सर्पदंश हल्ल्याचा प्रयत्न होता. सापाचा चावा नैसर्गिक हत्या नसल्याचे सिद्ध करण्यासाठी पोलिसांनी थेट प्रात्यक्षिक दाखवलेच. याशिवाय अनेक वैज्ञानिक आधारही तपासून पाहिले. त्यासाठी अनेक साक्षीदारांची साक्ष करण्यात आली. पशुवैद्यकीय डॉक्टर, वन्यजीव अधिकारी, प्राणीशास्त्रज्ञ, हर्पेटोलॉजिस्ट (सरपटणारे प्राणी तज्ञ) आणि उभयचर), साप हाताळणारे आणि वैद्यकीय तज्ञ यांची साक्ष महत्वाची ठरली.

मे मध्ये ही घटना घडली. उत्तरा ही गडगंज घरातली होती. म्हणून सूरजने उत्तराशी लग्न करण्याचं मान्य केलं होतं. त्यावेळी त्याला उत्तराच्या कुटुंबाकडून ७६ तोळे सोनं, एक सुझुकी सेडान आणि ४ लाख रुपये रोख असा घसघशीत हुंडा मिळाला होता. तसंच सूरजला मुलीच्या देखभालीसाठी प्रत्येक महिन्याला ८ हजार रुपये इतकी रक्कमही तिच्या कुटुंबाकडून दिली जात होती. त्यांना १ वर्षाचा मुलगाही आहे. उत्तराच्या मृत्यनंतर मिळणारे पैसे बुडू नयेत म्हणून सूरज तिचा मृत्यू नैसर्गिक दाखवण्याचा प्रयत्न करत होता. पैशासाठी तो तिचा छळ करत होता.

हे प्रकरण म्हणजे सैतानी आणि भीषण हत्यांकांडाचा प्रकार आहे, असं मत न्यायाधीश एम. मनोज यांनी नोंदवलं. त्यांनी सुरजला पत्नी उत्तराच्या हत्येप्रकरणी दोषी मानत जन्मठेपेची शिक्षा सुनावली. त्याने उत्तराचा खून तर केलाच, शिवाय हा सर्पदंशाने झालेला अपघाती मृत्यू असल्याचं दर्शवून दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. तिचे सगळे पैसे घेऊन त्याला दुसऱ्या महिलेशी लग्न करायचं होतं.

इतक्या खालच्या थराला जाऊन आपल्या पत्नीला ठार मारणे ही घटना अतिशय क्रूर आहे, सूरजला याची शिक्षा झालीच आहे. ज्या पद्धतीने या घटनेचा तपास लावला गेला त्यामुळे न्यायव्यवस्थेवर सर्वसामान्यांचा विश्वास नक्कीच दृढ होईल.

शीतल दरंदळे

सबस्क्राईब करा

* indicates required