१९७४चा रेल्वे संप म्हणजेच देशातील सर्वात मोठ्या संपाचा अखेरचा दिवस

भारतीय रेल्वेचा "चक्का जाम " करणारा रेल्वे संप ८ मे १९७४ रोजी सुरु झाला आणि तब्बल वीस दिवसांनी २७ मे १९७४ रोजी मागे घेण्यात आला.
का झाला होता हा संप?
सतत वीस वर्षे पगारवाढीच्या मागण्या डावलल्यामुळे चिडीस आलेले रेल्वे कामगार जॉर्ज फर्नांडीस यांच्या लढाऊ नेतृत्वाखाली एकत्रित झाले. स्वतंत्र भारताच्या इतिहासातील सरकारी कर्मचार्यांचा जास्तीत जास्त दिवस चाललेला हा संप खर्या अर्थाने देशव्यापी संप होता.
सरकारने संप कसा हाताळला?
तत्कालीन पंतप्रधान इंदीरा गांधींनी आपल्या अधिकाराचा पुरेपूर वापर करून हजारो कर्मचार्यांना तुरुंगात डांबले. आंदोलनकर्त्या कामगारांना ताबडतोब नोकरीतून बडतर्फ करण्यात आले. वाटाघाटी न करता हा संप चेचून काढण्याचे तंत्र इंदिरा गांधींनी अशा प्रकारे वापरले की असा देशव्यापी संप पुन्हा करण्याचे धैर्य कोणत्याही कामगार संघटनेत शिल्ल्क राहिलेले नाही. संपाच्या सुरुवातीला जनतेचा पाठींबा संपकर्यांना होता. पण १८ मे रोजी भारताने पहील्या अणुबाँबची यशस्वी चाचणी केल्याचे वृत्त आले आणि सहानुभूतीचा ओघ इंदीरा गांधींकडे वळला.
पुढे काय झाले?
इंदीरा गांधींसाठी ही एक प्रकारे रंगीत तालीम होती. या नंतर वर्षभराच्या आत म्हणजे १९७५ मध्ये हेच दडपशाहीचे तंत्र वापरून देशात आणीबाणी जाहीर करण्यात आली आणि घटना प्रदत्त हक्कांवर बंदी घालण्यात आली. या संपामुळे ’ऑल इंडीया रेल्वे मेन्स फेडरेशन’चे अध्यक्ष जॉर्ज फर्नांडीस यांच्या नेतृत्वाला अखिल भारतीय मान्यता मिळाली.