युक्रेनियन 'हीरो' -ओल्गा सेमिडानोव्हा- १२ मुलांची आई रशियन सैनिकांशी लढताना धारातीर्थी पडली!!
रशिया आणि युक्रेन युद्धाच्या बातम्या भारतापर्यंत पुरेशा येत नसल्या तरी अजूनही तिथे मोठे युद्ध सुरू आहे. हे युद्ध सुरु होऊन २५ दिवस उलटून गेले आहेत. बलाढ्य रशियासमोर कमकुवत युक्रेन मोठा लढा देत आहे. आजवर अशा लढाईत स्वतच्या प्राणांची बाजू लावून जागतिक स्तरावर हिरो ठरलेले अनेक पुरुष तुम्हांला माहीत असतील. पण सध्याच्या या युद्धातील एका महिलेचे हौतात्म्य मात्र जगभर चर्चेचा विषय ठरत आहे.
ओल्गा सेमीडानोवा या रशियासोबत लढत असताना धारातीर्थी पडल्या आहेत. डोनेत्स्क या शहरात सुरू असलेल्या लढाईत कॉम्बॅट मेडिक असलेल्या ४८ वर्षीय ओल्गा यांना मरण आले. ओल्गा या ज्या निकराने लढत होत्या, ते ज्यांनी बघितले आहे त्यांच्यासाठी त्यांचे शहीद होणे हा मोठा धक्का आहे.
युद्ध ऐन भरात असताना ओल्गा प्रचंड जखमी झाल्या होत्या. त्यांना अशा परिस्थितीत रणभूमी सोडून जाताही आले असते, पण त्यांनी माघार न घेता लढता लढता शहीद होण्याचा निर्णय घेतला आणि त्यांच्या याच शौर्यामुळे जगभर त्यांच्याबद्दल लोकांमध्ये कमालीची हळहळ व्यक्त केली जात आहे.
समोरासमोर चाललेल्या या लढाईत ओल्गा यांच्या पोटाला जबर मार बसला होता, त्यातून त्यांना मृत्यू आला आहे असे सांगितले गेले आहे. त्यांचे दुर्दैव इतके मोठे की ३ तारखेला त्यांचा मृत्यू होऊन पण अजूनही युद्धामुळे त्यांचा मृतदेह त्यांच्या कुटुंबाला मिळू शकलेला नाही. त्यांचा मृत्यू जिथे झाला तिथून त्यांचे घर अवघ्या १५० किलोमीटरवर आहे.
ओल्गा यांची एकूण १२ मुले मागे राहिली आहेत, विशेष म्हणजे यातली ६ मुले त्यांनी दत्तक घेतली आहेत. आता या सर्वच मुलांचा आधार कोसळला आहे असेच म्हणावे लागेल. त्यांनी शेवटपर्यंत अनेक सैनिकांचे प्राण वाचवले. इतक्या लोकांना जीवदान देऊन स्वत:ला मात्र त्या वाचवू शकल्या नाहीत.
याआधी ओल्गा यांना त्यांच्या कामासाठी मदर हिरॉईन हा पुरस्कार देण्यात आला होता. युक्रेनियन अधिकाऱ्यांकडून जे बोलले जात आहे त्यावरून त्यांच्या या कामातील महत्व लक्षात येऊ शकते. "देशाला त्यांचा अभिमान आहे. त्या नॅशनल हिरो आहेत" असे उद्गार युक्रेन अधिकाऱ्यांनी ओल्गांबद्दल काढले आहेत.
सोशल मीडियावरही ओल्गांना त्यांच्या या शौर्याबद्दल त्यांना आदरांजली वाहिली जात आहे. युक्रेनच्या लोकांना तर त्यांच्या या हौतात्म्याने मोठे धैर्य मिळत आहे. या युद्धामुळे मृत्युमुखी पडलेल्या लोकांचा अधिकृत आकडा समजू शकलेला नाही.
पुतीन विरुद्ध जगभर वाढलेला रोष आता या घटनेने चांगलाच उसळून येत आहे.
उदय पाटील




