computer

एक्झिट पोल्स म्हणजे काय आणि एक्झिट पोल्स का घेतले जातात ??

मंडळी, काल शेवटचं मत नोंदवलं गेलं आणि दबा धरून बसलेल्या न्युजचॅनेलन्सनी एक्झिट पोल्सचा मारा करायला सुरुवात केली. आता एक्झिट पोल्स काय म्हणतायत हा आपल्या लेखाचा विषय नाही. विषय आहे एक्झिट पोल्सचा.

काल पासून जे एक्झिट पोल्सचं वादळ आलंय ते पाहून तुम्हाला नक्कीच प्रश्न पडला असणार की हे एक्झिट पोल म्हणजे काय आहे ब्वा ? आज बोभाटा तुम्हाला एक्झिट पोल बद्दल सगळी माहिती देणार आहे.

सुरुवात करूया एक्झिट पोल्सच्या अर्थापासून !

मंडळी, मतचाचणी (opinion poll) आणि एक्झिट पोल्स या दोन मार्गांनी निवडणुकीचा कौल तपासला जातो. मतचाचणी म्हणजे मतदानापूर्वी घेतलेला कौल तर एक्झिट पोल म्हणजे मतदान झाल्यानंतरचा नोंदवलेला मतदारांचा कौल. मतदार मतदान करून बाहेर पडल्यानंतर त्याला प्रश्न विचारले जातात आणि त्याद्वारे त्याने कोणाला मत दिलं हे पाहिलं जातं. हे काम न्यूजचॅनेल्स आणि काही खाजगी कंपन्या करतात.

भारतात एक्झिट पोल्स नेहमीच मतदान झाल्यानंतर जाहीर केले जातात. तसा निवडणूक आयोगाचा नियम आहे. जर समजा पहिल्या टप्प्यातील मतदानानंतर लगेच एक्झिट पोल्सचे निकाल आले तर इतर टप्प्यातील मतदानावर त्याचा परिणाम होऊ शकतो. २०१० साली सगळ्या पक्षांच्या अनुमतीने हे निर्बंध लावण्यात आले आहेत.

तर, आता पाहूया एक्झिट पोल्स घेताना कोणकोणत्या बाबी लक्षात घ्याव्या लागतात.

सॅम्पल साईझ : निरीक्षण नोंदवण्यासाठी किती मतदारांना प्रश्न विचारले जातील ?  एकूण संख्येच्या तुलनेत ही संख्या नाममात्र असेल तर चाचणीचे अंदाज चुकीचे येऊ शकतात.

दुसरी महत्त्वाची बाब आहे मॉडेल : यामध्ये प्रश्न कशा पद्धतीने, कोणाला विचारायचे, त्यामध्ये लिंग, शिक्षण, वय असे फरक करावे किंवा नाही असे निर्णय घ्यावे लागतात. उदाहरणार्थ, निवडणुकीच्या पोल मध्ये ज्यांचे वय 18 पेक्षा कमी असेल ते मॉडेलच्या बाहेर असतील. या सोबत प्रश्न विचारणारा देखील त्रयस्थ पध्दतीने काम करतो हे पण फार महत्वाचे आहे. फक्त तरुण, सुशिक्षित, शहरी असेच उत्तर दाते मिळवून जर सर्व्हे केला तर मिळाणारी उत्तरं चुकीचीच असतील.

एकूण लोकसंख्येच्या ०.०१ इतक्याच किंवा कमी लोकांचा सर्व्हे घेतला जात असल्यामुळे चाचणी करणारे मॉडेल सुदृढ असेल तरच कल निश्चित करता येतो.

स्विंग मॉडेल : सध्याच्या निवडणुकीचे निकाल काय असतील याचं निरीक्षण करताना मागच्या निवडणुकांचा अभ्यास करणे म्हणजे स्विंग मॉडेल. भारतासारख्या विविधता असलेल्या देशात अचूक एक्झिट पोल्स देणे कठीण होऊन बसते. अशावेळी स्विंग मॉडेल पद्धत वापरली जाते. स्विंग मॉडेल म्हणजे केवळ मागच्या निवडणुकींचे निकाल तपासणे नव्हे. मागच्या निवडणुकांमध्ये राजकीय परिस्थिती काय होती आणि यावेळी परिस्थिती काय आहे याचा पण अभ्यास केला जातो.

एक्झिट पोल्स खात्रीलायक असतात का ?

मंडळी, शेवटी एक्झिट पोल म्हणजे अंदाज वर्तवणे. अंदाज खोटे पण ठरू शकतात किंवा खरेही ठरू शकतात. वरील महत्वाच्या बाबी लक्षात घेऊन जर एक्झिट पोल्स घेतले असतील तर बऱ्याचदा एक्झिट पोल्सचे निकाल खऱ्या निकालाजवळ जाणारे असतात.

एक्झिट पोल्सचा भारतातला इतिहास बघितला तर असं लक्षात येईल की २००४ आणि २००९ सालच्या निवडणुकांच्या वेळी एक्झिट पोल्स साफ खोटे ठरले होते. एक्झिट पोल्सच्या पूर्ण विरुद्ध निकाल आले. आजच्या काळात तंत्रज्ञान बदललेलं आहे आणि गोष्टी सोप्प्या झालेल्या आहेत त्यामुळे एक्झिट पोल्सच्या खरेपणावर परिणाम होऊ शकतो.

एक्झिट पोल्सचा इतिहास

(मार्सेल व्हॅन डॅम)

एवढं सगळं वाचलं आता थोडा इतिहास पण जाणून घेऊया. मंडळी, एक्झिट पोल्स नेमके कोणी सुरु केले याबद्दल वाद आहेत, पण इतिहासात एका माणसाचं नाव घेतलं जातं. हा माणूस म्हणजे डच राजकारणी, समाजशास्त्रज्ञ “मार्सेल व्हॅन डॅम”. मार्सेल रावांनी १५ फेब्रुवारी १९६७ सालच्या डच विधानसभा निवडणुकींसाठी एक्झिट पोल घेतला होता. याखेरीज असं म्हणतात की १९६७ साली वॉरेन नावाच्या व्यक्तीने पण एक्झिट पोल घेतला होता. आता गोंधळ असा आहे की पहिल्या एक्झिट पोलची नोंद १९४० सालची आहे. म्हणजे नेमका कोणी कधी एक्झिट पोल घेतला हे कळायला मार्ग नाही.

मंडळी, निवडणूक संपली की पुढच्या ३ ते ४ दिवसातच अधिकृत निकाल जाहीर होणार असतो, मग एक्झिट पोल्स पाहिजेत कशाला ? त्याचं उत्तर असं आहे, की निवडणुकीचा निकाल काय असेल याची उत्सुकता शमवण्यासाठी एक्झिट पोल्स जाहीर केले जातात. खरं तर सामान्य नागरिकांची उत्सुकता शमवण्यासाठी आणि राजकीय पक्षांचं निवडणुकीचं टेन्शन दूर करण्यासाठी. फार गंभीर विचार केला तर एक्झिट पोल्समुळे शेअर मार्केट पण गडगडू शकतं.

मंडळी, काही का असेना एक्झिट पोल्सना आजच्या घडीला महत्व आलेलं आहे. आता तुम्हीच सांगा तुम्हाला काय वाटतं एक्झिट पोल्सबद्दल ??  

सबस्क्राईब करा

* indicates required