युक्रेनबद्दल तुम्हांला या ९ गोष्टी खचितच माहित नसतील!! युरोपाचे ब्रेडबास्केट, विमानउत्पादन आणि बरंच काही आहे इथे!!
गेल्या काही महिन्यांपासून रशिया आणि युक्रेनमध्ये युद्धाचे वातावरण आहे. त्यामुळेच सध्या हे दोन्ही देश जगभरात चर्चेचे केंद्र झाले आहेत. रशियाने आक्रमण केल्याने युद्ध सुरू झालेच आहे. बहुतेक लोकांना रशियाबद्दल माहिती आहे, परंतु युक्रेनसारख्या देशाबद्दल फार कमी लोकांना माहिती आहे. रशियासमोर हा देश तितका बलाढ्य दिसत नाही. पण येत्या काळात या युद्धाचे परिणाम दिसतील. आज आम्ही तुम्हाला युक्रेनशी संबंधित काही रंजक माहिती सांगणार आहोत, ज्याबद्दल तुम्ही कदाचित वाचले नसेल.
१. युक्रेन हा युरोपातल्या सुंदर देशांपैकी एक आहे. तसेच युरोपातला तो सर्वात मोठा देशही आहे. जर युरोपमध्ये रशियाचा समावेश केला नाही, तर युक्रेन हा युरोपमधील क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठा देश आहे. युक्रेनचे एकूण क्षेत्रफळ ६०३.५५ चौरस किमी आहे. म्हणून युक्रेन हा युरोपमधील क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठा देश आहे. पण इथली लोकसंख्या त्यामानाने कमी आहे. इथे ४.३ करोड लोकसंख्या आहे.
२. युक्रेनच्या राष्ट्रीय पोशाखाचे नाव वैश्यवांका Vyshyvanka आहे. या पोशाखाचे वैशिष्ट्य म्हणजे यावर असलेले युक्रेनियन भरतकाम. हे भरतकाम आपण इतरत्र पाहतो यापेक्षा वेगळे असते. वैश्यवांका हा तागाचा बनलेला एक साधा पांढरा शर्ट असतो आणि त्यावर फुलांची सजावट केलेली असते. ही खास हाताने बनवलेली असते. आणि या पोशाखाचे अजून एक वैशिष्ट्य म्हणजे तो स्त्री आणि पुरुष दोघेही परिधान करतात.
३. युक्रेन हा शेतीच्या बाबतीत जगातील तिसरा सर्वात मोठा देश आहे. याला युरोपचे ब्रेडबास्केट असेही म्हणतात. कारण युक्रेन हा युरोपातील सर्वात मोठ्या गहू उत्पादक देशांपैकी आहे. युक्रेन १९९० मध्ये सोव्हिएत युनियनपासून वेगळा झाला. तेव्हा युक्रेनला स्वतंत्र देश म्हणून मान्यता मिळाली. येथील सुमारे ३० टक्के लोकसंख्या ग्रामीण भागात राहते. शेती हा त्यांचा उत्पन्नाचा सर्वात मोठा स्त्रोत आहे. युक्रेनमधील काळ्या सुपीक जमिनीमुळे इथे मुख्यतः गहू आणि इतर पिकं घेतली जातात.
४. युक्रेनची राजधानी कीवमध्ये आणखी एक मनोरंजक गोष्ट आहे. येथे Svitoshinko Brovarska ट्रेन लाईन हा जगातील सर्वात खोल भुयारी मार्ग आहे. ही ट्रेन प्रत्यक्षात जमिनीपासून १०५.५ मीटर खाली धावते. तीची बहुतांश स्थानकेही त्याच स्तरावर बांधलेली आहेत. हे भुयारी रेल्वे स्टेशन ६ नोव्हेंबर १९६० रोजी सोव्हिएत युनियनने बांधले आहे. हे कीव मेट्रोच्या पहिल्या टप्प्याचा एक भाग म्हणून उघडण्यात आले होते.
५. युक्रेन विमाने बनवण्यासाठीही प्रसिद्ध आहे. जगातील सर्वात मोठे विमानही याच देशात बनते. An-२२५ हे आतापर्यंतचे सर्वात मोठे विमान आहे. त्याचे वजन तब्बल ७१० टन आहे. याचा ५५९,५८० पाउंड एवढा एअरलिफ्टेड पेलोड हा एक विक्रम आहे. हे विमान युक्रेनमध्ये बांधले गेले होते जेव्हा ते सोव्हिएत युनियनचा एक भाग होते.
६. युक्रेन हा सर्वात जास्त सूर्यफूल बियाण्यांचा उत्पादक आहे. पहिला क्रमांक रशियाचा लागतो. त्यानंतर युक्रेनचा क्रमांक लागतो. अमेरिकेचा १०वा क्रमांक लागतो. असे म्हणतात की युक्रेनच्या सूर्यफूल शेतजमिनीचा एकूण आकार स्लोव्हेनियाएवढा प्रदेश व्यापतो. म्हणूनच की काय, सूर्यफूल युक्रेनचे राष्ट्रीय फूल आहे.
७. युक्रेनमध्ये ऐतिहासिक वारसा लाभलेली ७ ठिकाणे आहेत. ही सर्व ठिकाणे जागतिक वारसा स्थळांच्या यादीत आहेत. यामध्ये कीवचे सेंट-सोफिया कॅथेड्रल आणि ल्विव्हचे ऐतिहासिक केंद्र, कार्पेथियन्समधील लाकडी चर्च आणि त्यांच्या सभोवतालची असलेली घनदाट जंगले यांचा समावेश आहे. दरवर्षी सुट्ट्यांमध्ये अनेक पर्यटक येथे भेट द्यायला येतात.
८. युक्रेनमधले क्लावेन येथील 'द टनेल ऑफ लव्ह' हा सर्वात सुंदर रेल्वे मार्ग आहे. हा एक नैसर्गिक रेल्वे बोगदा आहे. याच्या दोन्ही बाजूला वेली व झाडांनी बनलेल्या हिरव्या कमानी आहेत. हे पृथ्वीवरील सर्वात रोमँटिक ठिकाण म्हणून ओळखले जाते. असे म्हणतात इथे जी जोडपी भेट देतात त्यांच्या सर्व इच्छा पूर्ण होतात.
९. १८५३ मध्ये Jan Zeh आणि Ignacy ukasiewicz या दोघांनी गॅस दिव्याचा शोध लावला. हे दोघे स्थानिक फार्मासिस्ट होते. हा शोध त्यांनी 'एट द गोल्डन स्टार' नावाच्या स्टोअरमध्ये लावला . आजही ती आठवण त्या इमारतीत जतन केली गेली आहे. त्याच इमारतीत गासोवा ल'अम्पा नावाचे कॅफे आहे.
तुमच्याकडे युक्रेनबद्दल आणखी काही विशिष्ट माहिती असल्यास जरूर कमेंट करा आणि ही माहिती शेयर करा.
शीतल दरंदळे




