computer

ह्यूमन कॉम्प्युटर, प्रोग्रामर, लेखक आणि रियल इस्टेट एजंटही; आज या स्त्रीमुळे सॉफ्टवेअर प्रोग्रामिंगचं दालन आपल्याला खुलं झालं आहे

कॉम्प्युटरचा उदय झाला त्या काळात कॉम्प्युटर म्हणजे जणू एक बडं प्रस्थ होतं. एनियॅक नाव असलेले हे कॉम्प्युटर्स आकाराने महाप्रचंड होते आणि जवळपास अख्खी खोली व्यापून टाकायचे. त्या काळातलं प्रोग्रामिंगही आजच्यासारखं नव्हतं. आज की-बोर्ड च्या मदतीने टायपिंग करून कॉम्प्युटरला विशिष्ट लँग्वेज मध्ये काय करायचं यासंबंधीच्या सूचना देता येतात. या सूचनांची एक फाईल तयार होते आणि ती कॉम्प्युटरच्या डिस्कवर सेव्ह केली जाते. त्या काळात मात्र असं नव्हतं. एखाद्या कामासाठी कॉम्प्युटरला द्यायच्या सूचना एका कागदावर लिहून प्रोग्रामर्स थेट मशीनच प्रोग्रॅम करायचे. त्यासाठी हजारो स्विचेसच्या गर्दीमधून ते नेमकी स्विचेस ऑपरेट करायचे आणि विशिष्ट प्लग्ज आणि वायर्सची जुळणी करून सूचना द्यायचे. थोडक्यात, प्रोग्रामिंग हार्डवेअरच्या माध्यमातून व्हायचं. अर्थातच हे काम खूप किचकट होतं. हे काम करणाऱ्या सुरुवातीच्या प्रोग्रॅमर्सपैकी एक म्हणजे जीन बार्टीक ही महिला.

जीनला ह्यूमन कॉम्प्युटर म्हणूनही ओळखलं जातं. एखाद्या विशिष्ट कार्यासाठी ज्या गणिती क्रिया कराव्या लागत असतील त्या हाताने (manually) करणं हे या ह्यूमन कॉम्प्युटर्सचं मुख्य काम होतं. दुसऱ्या महायुद्धाच्या काळात अमेरिकेत लष्कराने मोठ्या प्रमाणावर ह्यूमन कॉम्प्युटर्स म्हणून काम करण्यासाठी गणितज्ञांची भरती केलेली होती. हे गणितज्ञ ट्रॅजेक्टरी कॅल्क्युलेट करण्याचं काम करायचे.

नक्की काय होतं हे काम?

कोणतीही गोष्ट लांब फेकली असता ती काही अंतर जाऊन खाली पडते. त्याआधी ती हवेतून विशिष्ट मार्गाने जाते. हा मार्ग म्हणजे ट्रॅजेक्टरी. हेच तत्त्व क्षेपणास्त्र किंवा हवेतून मारा करणारी शस्त्रास्त्रं यांच्यासाठीही लागू आहे. एखादं क्षेपणास्त्र बरोब्बर हवं तिथे पडण्यासाठी त्याचा हवेतला मार्ग कसा असावा हे ठरवावं लागतं. त्यासाठी तिथल्या हवेची स्थिती आणि इतर काही घटकांचा विचार करावा लागतो. यासाठी काही रूल्स वापरून गणिती क्रिया करून तक्ते तयार केले जातात. याला ट्रॅजेक्टरी कॅल्क्युलेशन म्हणतात.

जीन जशी घडली त्याचं बरंचसं श्रेय ती तिच्या आजीला देते. लहानपणी जीनला अजून सहा भावंडं होती. वडील शिक्षक आणि शेतकरी. लहान मुलांना आजीआजोबांकडे जायला आवडतं तसंच छोट्या जीनचं होतं. घोड्यावर बसून ती तिच्या आजीकडे जायची. आजीकडे गेल्यावर तिला रोज वर्तमानपत्र वाचायला मिळायचं; आजीच तिला ते आणून द्यायची. ही आजी तिचं रोल मॉडेल होती. पुढे एका खोलीच्या शाळेत जीनचं शिक्षण सुरू झालं. शाळेत असताना सॉफ्टबॉल या खेळात तिला गती होती. हायस्कूलमध्ये शिकण्यासाठी शेजारच्याच शहरात ती तिच्या मोठ्या बहिणीबरोबर राहायला लागली. सोळाव्या वर्षी तिने पदवी घेतली. त्यासाठी तिने गणित हा मुख्य विषय निवडला. खरंतर त्या काळात तिचा कल पत्रकारितेकडे होता, पण केवळ सल्लागाराबरोबरचे संबंध चांगले नसल्यामुळे तिने पत्रकारिता टाळून गणित विषयात पदवी घेण्याचं ठरवलं. विसाव्या वर्षी तिने आयबीएम आणि पेनसिल्व्हानिया युनिव्हर्सिटी अशा दोन्ही ठिकाणी नोकरीसाठी अर्ज केला. आयबीएमने तिचा अर्ज नाकारला, पण पेनसिल्व्हानिया युनिव्हर्सिटीने तिला ट्रॅजेक्टरी कॅल्क्युलेशनच्या कामाची जबाबदारी दिली.

इथेच तिला आयुष्याचा जोडीदार भेटला. तो कॉम्प्युटर येण्याआधीचा काळ होता. त्यामुळे महत्त्वाची कॅलक्युलेशन्स हातानेच केली जायची. मात्र पुढे कॉम्प्युटर अस्तित्वात आल्यानंतर त्याचं प्रोग्रामिंग करण्यासाठी सुरुवातीला जे प्रोग्रामर्स निवडले गेले त्यात जीनची निवड झाली. त्या टीममध्ये तिच्याव्यतिरिक्त पाच महिला होत्या. युद्धामुळे पुरुष प्रोग्रामर्सची उणीव भासायची, तेव्हा ही दरी मिटवण्याचं काम या महिला प्रोग्रामर्सनी केलं. अशा शंभर महिलांना अमेरिकन लष्कर त्या काळात तब्बल दोन हजार डॉलर्स एवढा पगार देत होतं. काही दिवसातच जीन बार्टीक एनियॅक हाताळण्यात कमालीची कुशल बनली.

 

वास्तविक सुरुवातीला या महिलांना एनियॅक मशीनचं हार्डवेअर बघण्याचीही परवानगी नव्हती. त्या काळात हे मशीन गोपनीय या सदरात येत होतं आणि या महिलांकडे त्यासाठीचा सिक्युरिटी क्लिअरन्स नव्हता. त्यामुळे एनियॅकचं प्रोग्रामिंग कसं करायचं हे त्यांना प्रत्यक्ष मशीन न बघता केवळ आकृत्या पाहून शिकावं लागायचं. किती अवघड गोष्ट असेल ती! ते ऑपरेट करण्यासाठी त्यांच्याकडे मॅन्युअलसुद्धा नव्हतं. त्यामुळे या महिलांना त्या मशीनच्या आकृत्यांचा अभ्यास करावा लागायचा. त्यानंतर ते डिझाईन करणाऱ्या इंजिनिअर्सच्या मुलाखती घेऊन त्यांच्याकडून मिळालेल्या माहितीचा उपयोग करून त्या स्वतःला शिकवायच्या. एकदा का त्याच्यासाठी आवश्यक गणितं कागदावर सोडवून झाली, की मग त्यांना त्या खोलीत प्रवेश करण्याची परवानगी मिळायची. त्यानंतर हजारो स्विचेस आणि केबल्स वापरून प्रत्यक्ष फिजिकल कोडिंग.

एनियॅकवर काम करत असतानाच या महिलांच्या चमूने आज प्रोग्रामिंग मध्ये वापरल्या जाणाऱ्य सबरूटीन्स (प्रोग्राममध्ये एखादी कृती वारंवार करावी लागत असेल तर त्यासाठीच्या सूचनांचा संच), नेस्टिंग (एखादी गोष्ट, त्यात दुसरी तशीच गोष्ट, दुसरीत अजून तशीच तिसरी गोष्ट अशा प्रकारे स्तरांमध्ये रचना) आणि इतर मूलभूत बाबी विकसित केल्या. एका अर्थाने त्यांनी डिजिटल कॉम्प्युटरच्या प्रोग्रामिंगचा पाया घातला.

एनियॅकमुळे ट्रॅजेक्टरी कॅल्क्युलेशनचे तक्ते काही सेकंदात तयार होऊ लागले. त्यानंतर जीन आणि तिच्या सहकाऱ्यावर एनियॅक सर्वसामान्यांना खुला करून देण्याची जबाबदारी सोपवण्यात आली. त्यासाठी १५ फेब्रुवारी १९४६ रोजी त्यांनी त्याचं लोकांसमोर सादरीकरण केलं आणि त्याला प्रचंड यश मिळालं. मात्र या महिलांना त्याचं कुठलंही श्रेय मिळालं नाही. उलट या कार्यक्रमानंतर झालेल्या सक्सेस पार्टीच्या वेळी त्यांना घरी पाठवून देण्यात आलं.

त्यांच्यासाठी अर्थातच त्यांचं काम महत्त्वाचं होतं. पुढच्या दोन वर्षात म्हणजे मार्च १९४८ पर्यंत जीन बार्टीकने एनियॅकचं रूपांतर सपोर्ट प्रोग्राम कॉम्प्युटर मध्ये केलं. त्यानंतर तिने बायनॅक आणि युनिव्हॅक १ ही कॉम्प्युटरची मॉडेल्स विकसित करण्यासाठीही मदत केली. बायनॅकमध्ये माहिती साठवण्यासाठी सर्वप्रथम मॅग्नेटिक टेप्सचा वापर केलेला होता. काही वर्षांनी आपल्या नवऱ्याबरोबर जीन फिलाडेल्फियाला गेली. मात्र तिथे नवरा आणि बायको एका ठिकाणी काम करू शकत नाहीत, या कंपनीच्या धोरणामुळे तिला राजीनामा द्यावा लागला.

त्यानंतर काही काळ तिने फ्रीलान्स प्रोग्रामर म्हणूनही काम केलं. १९६७ मध्ये तिने युनिव्हर्सिटी ऑफ पेनसिल्व्हानिया येथून मास्टर्स डिग्री मिळवली आणि त्याचदरम्यान नवऱ्यापासून विभक्त होण्याचा निर्णय घेतला. मग तिने मिनीकॉम्प्युटर्सवरील टेक्निकल रिपोर्ट लिहायला आणि त्यांचं एडिटिंग करायला सुरुवात केली. पुढच्या आठ वर्षात तिने लेखक, इंजिनीयर, व्यवस्थापक अशा विविध भूमिका निभावल्या. पण नंतर ती काम करत असलेली कंपनीच विकली गेली. पुढची पंचवीस वर्षं जीन बार्टीक हिने रियल इस्टेट एजंट म्हणून व्यतीत केली. २३ मार्च २०११ रोजी वयाच्या ८६ व्या वर्षी तिचं निधन झालं.

जीनचं आयुष्य म्हणजे एक संघर्षगाथा आहे. कॉम्प्युटर प्रोग्रॅमिंगच्या क्षेत्रात उत्तम आणि पायाभूत काम करूनही तिच्या कामाची म्हणावी तशी दखल घेतली गेली नाही, तिला नोकरीत कधी बढतीही मिळाली नाही. उलट युद्धावरून परतल्यानंतर पुरुषांना काम करता यावं यासाठी अनेक कंपन्यांनी महिला कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकलं, त्यात तीही होती. पण याविरुद्ध लढा देऊन ती नोकरी टिकवून ठेवण्यात यशस्वी झाली. जीन बार्टीकच्या मृत्यूबरोबर खरंतर तिची कथा संपते. पण तिने मुख्यत: महिलांसमोर घालून दिलेला आदर्श कायम आहे.

स्मिता जोगळेकर

सबस्क्राईब करा

* indicates required