बापरे, हा कॉम्प्युटर तुमच्या मनातल्या गोष्टी ओळखतो ??

'तुम्ही आता जो विचार करताय ना, तिथं जाऊ नका, तुमचं ते काम होणार नाहीये....' 'फोर व्हीलर घ्यायचं तुमच्या मनात आहे...घेऊन टाका.. निळा रंग तुम्हाला लकी ठरेल...' '  फ्लॅट विकून नव्या बंगल्यात शिफ्ट व्हायचा विचार करताय ना तुम्ही..! जरा थांबा..दोन महिन्यांनी घर बदलणं लाभदायी ठरेल'...ही आणि अशी बोलबच्चन ऐकली की लोक कथित ज्योतिषी, बुवा बाबांचे भक्त होतात...खरंतर त्यांनी केलेल्या भाकितापेक्षा त्यांनी आपल्या मनातले विचार कसे ओळखले ? याचंच् लोकांना नवल वाटतं.

स्रोत

एखाद्याच्या मनात चालू असलेले नेमके विचार ओळखायची कला साध्य व्हावी, मनकवडे व्हायची सिद्धी मिळावी अशी अनेकांची इच्छा असते. पण तसं अजून तरी कुणाला साध्य झालेलं नाही. एखादी व्यक्ती नेमका कसला विचार करतेय हे ओळखण्यासाठी शास्त्रज्ञही बराच काळ प्रयत्न करत होते. आता तुमच्या मनात काय चाललंय हे नेमकं ओळखणारा डिव्हाइस  शोधून काढण्यात वैज्ञानिकांना  यश मिळालंय... अभिमानाची गोष्ट म्हणजे अर्णव कपूर या  मूळच्या भारतीय वंशाच्या तरुणानं हा मनकवडा डिव्हाईस म्हणजे संगणकीय प्रणाली शोधून  काढलीय.

स्रोत

अमेरिकेतल्या मॅसॅच्युसेट्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमधील संशोधकांसोबत अर्णव काम करतो. त्याच्या टीमने या अभिनव संगणकीय यंत्रणेचा शोध लावलाय. या उपकरणाला 'अल्टर इगो ' असं नाव देण्यात आलंय. कॉम्प्युटरला जोडलेलं हे  उपकरण चेहऱ्यावर चढवायचं. आपण मनातल्या मनात बोलत असताना जबडा व चेहरा यांमध्ये मज्जासंस्था व स्नायूंशी संबंधित काही न्यूरोमस्क्युलर संदेश निर्माण होत असतात. ते सामान्यतः डोळ्यांनी दिसत नाहीत. पण 'अल्टर इगो ' उपकरणातील इलेकट्रोड्स हे संदेश टिपून कॉम्प्युटर यंत्रणेकडे पाठवतो. विशिष्ठ संदेशांनुसार शब्द ओळखायची क्षमता या यंत्रणेत विकसित केली गेली आहे. या उपकरणातील हेडफोन्सद्वारे  चेहऱ्याच्या हाडांमधील कंपने कानाच्या अंतर्भागात पोचवली जातात.त्यामुळे न बोलताही मनात उमटलेले शब्द कळू शकतात.अर्थातच ही यंत्रणा जरा आणखी विकसित झाली तर गुन्हेगारांच्या मनात काय चाललंय हे कळेल अन पोलिसांचं काम सोपं होऊन जाईल.हो...पण जर का भविष्यात असली डिव्हाइस घरोघरी झाली ना तर मात्र अनेक पतीराजांची पंचाईत होईल हे नक्की.

लेखक : आबिद शेख, पुणे
(मो.8806706466)