तसं पाह्यलं तर लै कामं करु शकतात. रोजच्या बातम्या, हवामान, जगाच्या कुठल्या कोपऱ्यात किती वाजले आहेत, कुठे किती ट्रॅफिक आहे, अमक्या सिनेमातलं ढमकं गाणं लावणं, तमक्याला फोन लावणं किंवा मेसेज पाठवणं, रिमाईंडर्स सेट करणं.. हे तर बेसिक झाले. पण जर व्हर्च्युअल असिस्टंट्स घरातल्या टीव्ही आणि इलेक्ट्रिक बोर्डासोबत कनेक्ट केलेत, तर टीव्ही लावणं/बंद करणं, आवाज कमी जास्त करणं, लाईट्स चालू बंद करणं, फॅनचा स्पीड कमी जास्त करणं, युट्यूबवर पुढचं गाणं लावणं असली सगळी कामं तोंडी सूचना देऊन व्हर्च्युअल असिस्टंट्स कडून करवून घेता येतात. आता पटलं ना, यांच्यामुळे आळशीपणा कसा वाढतो ते!!
तर, या सगळ्या व्हर्च्युअल असिस्टंट्स सर्वात लोकप्रिय व्हर्जन आहे ॲलेक्सा!! गेल्या काही काळात ती प्रसिद्ध झाली की या व्हर्च्युअल असिस्टंट्सवर बरेच मीम पण वायरल झाले आहेत. आपल्या देशात अद्यापही काही लोकांना वाचता-लिहिता येत नाही, असे लोक फक्त बोलून ॲलेक्साकडून कामे करवून घेत आहेत. आठवतंय, एका परदेशातल्या मुलीचा व्हिडिओ खूप व्हायरल झाला होता. ती ॲलेक्साला "बेबी शार्क" गाणं लाव म्हणून सांगत होती आणि शेवटी ॲलेक्साला ती मुलगी काय म्हणते ते कळलं आणि गाणं लावल्यावर बाळ खूष झालं. आता या बाळाला नीट बोलताही येत नव्हतं त्यामुळे ॲलेक्साला इंग्रजीत सांगितलेलंही नीट कळत नव्हतं. आपल्या भारतात लोकांना नीट बोलायला येत असूनही ॲलेक्साला त्यांच्या सूचना कळत नाहीत. का? जाणून घ्या याचं कारण...