७७०० वर्षांपूर्वीचे सांगाडे आणि आताची पिढी यांत सारखाच डीएनए असू शकतो?

पूर्व रशियाच्या सायबेरिया आणि चीन सीमेवर एक गुहा आहे. तिला शेर्टोव्ही व्होरोटा किंवा डेव्हील्स केव्ह या नावानं ओळखलं जातं. तर ही गुहा सध्या मानववंशशास्त्रज्ञांची आकर्षण बिंदू ठरलेलीय. इथं शास्त्रज्ञांना पाच सांगाडे सापडले आहेत. पाचही सांगाडे स्त्रियांचे आहेत आणि तिथं सांगाड्यांबरोबरच काही भांडी, फेकून मारायचे भाले, काही जाळ्या, चटया आणि इतर काही वस्तूही सापडल्या आहेत. या सर्व गोष्टींमुळं मानवी इतिहासातल्या बर्‍याच नव्या गोष्टीं कळाल्या आहेत.   यांचं वय कार्बन डेटींग या शास्त्रीय पद्धतीनं तपासले, तर कळालं की हे सांगाडे सुमारे ७५०० वर्षांपूर्वीचे आहेत!!

एका व्हेरोनिका सिस्का नावाच्या हंगेरीयन विद्यार्थिनीनं या सांगाड्यांतल्या दातांची मुळं आणि कानांच्या आतल्या हाडांपासून त्यांचा डीएनए वेगळा केला . तिनं तो डीएनए तिच्या सहकार्‍यांच्या साहाय्यानं शेकडो युरोपियन आणि आशियाई वंशाच्या  केन्द्रीय जीनोम्सशी  ताडून पाहिला. या अभ्यासात या गटाला असं आढळून आलं की डेव्हिल्स केव्हपासून जवळच राहणा-या तपकीरी डोळ्याच्या, दाट आणि सरळ केस असलेल्या, साधारण उंचीच्या, आशियाई वंशाच्या उल्ची जमातीशी हे डीएनए जुळतात. म्हणजेच, सध्याच्या उल्ची जमातीच्या लोकांमध्ये इतर वंशाच्या लोकांची सरमिसळ झालेली नाही. ही जमात  मोठ्या लोकसंख्येच्या शहरांपासून दूर एकांतात राहाते. त्यामुळं झालं काय, की  ती बर्‍यापैकी शुद्ध वर्णाची राहिलेली आहे. लोकांनी एका ठिकाणाहून दुसरीकडं स्थलांतर केलं, की सहसा मग तिथंच लग्न, मुलं-बाळं हे सगळं होतं आणि दोन ठिकाणच्या दोन वेगळ्या वंशाची मिळून नवीन पिढी तयार होते. इथं  बहुधा कुणी स्थलांतर करून आलंच नाही. त्यामुळं  होणा-या वर्णसंकरापासून त्यांचा काहीसा बचाव याच कारणानं झाला आहे.

हीच ती डेव्हील्स केव्ह- सैतानाची गुहा..

याशिवाय त्या महिलांच्या सांगाड्यांसोबत सापडलेल्या वस्तूंमुळेही मानववंश शास्त्रातल्या एका मोठ्या गृहितकाला तडे जाऊ लागल्याची चिह्नं दिसू लागली आहेत. तिथं मिळालेल्या  जाळ्या आणि भाल्यासारख्या वस्तूंमुळं ती जमात मासेमारी करत होती हे निश्चित होतं. त्या बरोबरच तिथं काही गवताच्या काड्यांपासून शिवलेल्या चटया सापडल्या आहेत. त्यावरून असं कळतं की त्यात काही धान्यांच्या पिकांचे देठ वापरले आहेत. म्हणजेच त्या उल्ची लोकांनी अगदी बेसिक स्टेजमधल्या शेतीला सुरूवात केली होती.

मानवाच्या वंशसाखळ्यांचा अभ्यास करणार्‍या शास्त्रज्ञांमध्ये असा समज आहे की मानवी स्थलांतराचा परिणाम म्हणून शेतीचा प्रसार झाला. आणि डेव्हील्स केव्हच्या उल्ची महिला शिकारीतून अन्न मिळवत असतानाच शेतीतूनही अन्न निर्माण करत होत्या. पण मग त्यांनी स्थलांतरही केलं नाही. त्यामुळं स्थलांतरामुळं शेतीचा प्रसार झाला हे संशोधकांचं मूळ गृहितकच चुकीचं आहे की काय, असं प्रश्नचिह्न निर्माण झालंय.

उल्ची महिलांच्या सांगाड्यांच्या अभ्यासानं जुने प्रश्न काहीसे सुटले पण त्याबरोबरच नवे प्रश्न निर्माणही झाले आहेत हे निश्चित!

सबस्क्राईब करा

* indicates required