computer

अंतराळवीरांनी अंतराळात केलेल्या संपाची आणि मागण्या मान्य करुन घेतल्याची गोष्ट!! थोडं अविश्वसनीय वाटतंय ना??

बंद, मोर्चा, संप, हे शब्द ऐकल्यावर किंवा वाचल्यावर तुमच्या डोळ्यासमोर कुठले चित्र उभे राहते? कुठल्या तरी कारखान्यासमोर गर्दीने उभे असलेले कामगार आणि त्यांच्या घोषणा, हातात आपल्या मागण्यांचे बोर्ड घेऊन उभे असलेल्या अंगणवाडी सेविका, शेतकरी आंदोलक, अशा वेगवेगळ्या व्यवसायक्षेत्रातील कर्मचारी तुमच्या कल्पनेत तुम्ही पाहू शकाल. पण अंतराळात जाऊन अवकाशसंशोधकांनी संप पुकारला आहे असे चित्र तुमच्या डोळ्यासमोर उभे राहणार नाही. कारण अशी कधी बातमी तुमच्या वाचनात आलेलीच नाही. पण आज आम्ही तुम्हाला अवकाश संशोधकांच्या अनोख्या संपाचा किस्सा सांगणार आहोत जो १९७३ सालच्या स्कायलॅब ४ या अवकाश मोहिमेत प्रत्यक्षात घडला होता. विशेष म्हणजे जसे सगळ्याच मोर्चेकरी आणि आंदोलकांचे तोंड दाबले जाते, त्यांच्या मागण्या धुडकावून त्यांना जेरीस आणले जाते तसेच काही या मोहिमेतील अंतराळ संशोधकांच्या बाबतीतही घडले होते. वाचा तर मग हा अंतराळातील पहिल्याच संपाचा किस्सा बोभाटावर!

१९७३ साली नासाने स्कायलॅब-फोर नावाची एक अंतराळ मोहीम आखली होती. अंतराळवीर जेरी कार हे या मोहिमेचे प्रमुख होते. त्यांच्यासोबत एडी गिब्सन आणि पायलट विल्यम पोग या ८४ दिवसांच्या मोहिमेचा एक भाग होते. नासाने आखलेल्या या आधीच्या अवकाश मोहिमांमध्ये यांपैकी तिघांपैकी कुणाचाच समावेश नव्हता. तिथेही अवकाश प्रवासात नवखेच होते. ८४ दिवसांच्या या प्रदीर्घ कालावधीसाठी अशा नवख्या संशोधकांना पाठवणे फारसे हिताचे ठरणार नाही, असा सल्ला अनेकांनी दिला असूनही नासा आपल्या भूमिकेवर ठाम राहिली.

अवकाशातले हे ८४ दिवस त्रासाचे आणि खडतर असणार आहेत याची या तिघाही संशोधकांना माहिती होती. पण प्रत्यक्षात जेव्हा ते अवकाशात गेले तेव्हा मात्र त्यांना अक्षरश: घाम फुटला. कारण अवकाशातील त्यांचे काम खूपच जास्त वेळ खाऊ होते. दिवसातील १६ तास त्यांचे कामातच जात असत. सलग ८४ दिवस सोळा तास काम करणे म्हणजे काही खायची गोष्ट नव्हती.

८४ दिवसांत या अंतराळवीरांना कामाची किती मोठी यादी दिली होती बघा.
१. सूर्याचे निरीक्षण करणे,
२. कोहाउट या धुमकेतूचे निरीक्षण करणे, हा त्यावर्षी पहिल्यांदा पृथ्वीच्या सर्वात जवळ येणारा धुमकेतू होता.
३. अवकाशातून पृथ्वीचे निरीक्षण करणे आणि तिचे फोटो घेणे
५. वैद्यकीय चाचण्या पूर्ण करणे आणि
६. चार वेळा स्कायवॉक करणे

ही सगळी कामे करण्यासाठी त्यांना एक वेळापत्रकही आखून दिले होते. त्यानुसार एकही मिनिट वाया न घालवता या लोकांना सलग १६ तास काम करायचे होते.
 

आता तुम्हीच सांगा १६-१६ तास काम करायला ते काय मशीन होते का? इथे पृथ्वीवर राहून आपण १६ तास काम करू शकत नाही, मग तिथे अवकाशात राहून ते कसं काय जमणार होतं? शिवाय पोगला तर अवकाशीय वातावरणाचा कंटाळा येऊ लागला. त्याला सतत पृथ्वीची, घराची आणि आपल्या माणसांची आठवण येऊ लागली. थोडक्यात काय, तर तो लवकरच होमसिक झाला.

तिघेही जेव्हा अवकाशात गेले तेव्हा त्यांना जाणवलं की त्याचं पूर्ण शेड्युल खूपच टाईट आहे. अगदी मिनिटामिनिटाचा हिशेब ठेवूनच जणू त्यांचा हा दौरा आखला असावा. त्यांना कामासाठी असणारे पर्यायी रोबोटही मिळाले नाहीत. सगळ्या कामाची जबाबदारी त्यांच्याच खांद्यावर होती. त्यांचे शेड्युल इतके व्यस्त ठेवल्याबद्दल तिघांनाही आपल्या वरिष्ठांचा राग येत होता. या मोहिमेचा प्रमुख असणाऱ्या कारने वरिष्ठांशी संपर्क करून कितीदा तरी याची जाणीव करून दिली. तर उलट त्यांच्यावरच तक्रारखोर असा शिक्का मारण्यात आला. सलग काम करून थकवा आलेल्या या अंतराळवीरांनी मग नासाच्या पृथ्वीवरील ऑफिसला दिल्या जाणाऱ्या रेडिओ संदेशच ऑफ करून टाकला. एक दिवस स्वतःच्या मर्जीप्रमाणे काम केले.
 

एक दिवस तिघांनीही अवकाशातील आपल्या कामाला बुट्टी मारली आणि निवांत बसून राहिले. वरून काहीच सिग्नल येत नसल्याने नासाचे पृथ्वीवरील संशोधक हैराण झाले. चोवीस तासांनंतर स्कायलॅबचा पुन्हा एकदा सिग्नल मिळू लागला. चोवीस तासांत सिग्नल न मिळाल्याचे कारण विचारले तेव्हा तिघांनीही त्यांनी केलेल्या एकदिवसीय अंतराळ संपाची माहिती दिली आणि त्यांचे कामाचे तास कमी करण्याची मागणी केली.

इकडे नासा रेडिओ सिग्नल मिळत नसल्याने चिंतेत होते. जेव्हा त्यांना खरे कारण समजले तेव्हा त्यांनी या अंतराळवीरांची मागणीमान्य केली. त्यांच्या अतिव्यग्र वेळापत्रकात थोडी ढिलाई दिली आणि त्यांची उरलेली काही कामे त्यांच्या वेळेनुसार करण्याची मुभाही दिली. त्यानंतर या तिघाही अंतराळवीरांनी कसलीही तक्रार केली नाही. ८४ दिवसांची आपली मोहीम संपवून ते पृथ्वीवर परत आले. त्यानंतर नासाने या तिघांना पुन्हा कधीच अंतराळ मोहिमेवर पाठवले नाही. उलट यानंतरच्या अंतराळ मोहिमेत अंतराळ वीरांचे वेळापत्रक फार व्यस्त असणार नाही याची काळजी घेतली जाऊ लागली.

अंतराळवीर म्हणजे काही रोबॉट नसतात त्यांच्याकडून काम करवून घेताना याचे भान ठेवणे गरजेचे असल्याचे नासाला कळून चुकले. या अंतराळ वीरांचा संप यशस्वी झाला. पण त्यांना याचे परिणामही भोगावे लागले.

कशी वाटली मग ही पहिल्या वहिल्या अंतराळ संपाची कथा? कमेंटच्या माध्यमातून आम्हाला नक्की सांगा.

मेघश्री श्रेष्ठी

सबस्क्राईब करा

* indicates required