computer

हवामानाच्या बदलाचा अभ्यास कसा आणि हवाई बेटांवरच्या या ठिकाणीच का करतात??

मंडळी, आपण फार वर्षापासून हवामानातील बदलावर ऐकत, वाचत आलो आहोत. हा मुद्दा किती गंभीर होत चालला आहे याचं नवीन उदाहरण आज वाचूया.

हवेतील कार्बनडायऑक्साईडने आता नवीन उच्चांक गाठलेला आहे. हा एक ऐतिहासिक उच्चांक आहे. याबद्दल आणखी वाचण्यापूर्वी हवेतील वायू मोजण्याच्या एककाबद्दल जाणून घेऊ या.

हवेतील वेगवेगळ्या वायुचं प्रमाण मोजण्यासाठी  parts per million (ppm) हे एकक वापरलं जातं. म्हणजे १० लाख कणांपैकी किती भागात विशिष्ट वायू आहे हे पाहिलं जातं. या प्रमाणे हवामानातील कार्बनडायऑक्साईड हा तब्बल ४१५.२५ ppm आहे. १० लाखाच्या तुलनेत हे प्रमाण कमी वाटत असेल तर याची पूर्वीच्या आकडेवारीशी तुलना करून पाहूया.

१९५० साली जेव्हा पहिल्यांदा प्रमाण मोजण्यात आलं तेव्हा ते ३१५ ppm इतकं होतं. २०१३ साली पहिल्यांदाच या प्रमाणाने ४०० आकडा गाठला. यावर्षी हा आकडा ४१५ ppm पर्यंत पोचला आहे. म्हणजे केवळ ६९ वर्षांमध्ये १०० ppm ची भर पडली आहे.

आता या संशोधनाची प्रक्रिया समजून घेऊया.

हवाई येथील मौना लोआ वेधशाळा हवामानाचा अभ्यास केला जातो. हा भाग प्रदूषणमुक्त आणि दुर्गम असल्याकारणाने हवामानाचा अभ्यास करण्यासाठी योग्य समजला जातो. या ठिकाणी गेल्या जवळजवळ ६० वर्षात जे संशोधन झालं त्याची शेकडो-हजारो वर्षांपूर्वीच्या वातावरणाशी तुलना केली जाते. हिमयुगात (ice ages) कार्बनडायऑक्साईडचं प्रमाण २०० ppm होतं तर पुढच्या काही शेकडो वर्षात हे प्रमाण २८० ppm पर्यंत होतं. 

कार्बनडायऑक्साईडच्या वाढीचं कारण काय ?

कार्बनडायऑक्साईड प्रमाणाबाहेर जाण्याचं प्रमुख कारण आहे इंधनाचा वाढलेला वापर. नैसर्गिक पद्धतीने पण कार्बनडायऑक्साईडचं प्रमाण वाढू शकतं, पण हे काम फारच धीम्या गतीने होतं. निसर्गाच्या गतीपेक्षा माणसाची गती कैकपटीने जास्त आहे.

तर मंडळी, हवामान बदलाचे दुष्परिणाम आता आपल्या दारावर येऊन ठेपले आहेत. आता परिस्थिती हाताबाहेर जाऊ नये याची काळजी घेतली पाहिजे.

सबस्क्राईब करा

* indicates required