computer

धूमकेतूंनी झाडलेल्या पायधूळीतून अवकाशातील व्हायरस पृथ्वीवर येतात का ?

माणूस हा विचार करणारा प्राणी आहे. तो वेळोवेळी वेगवेगळे सिद्धांत मांडत असतो. काही खरे ठरतात, काही दावे अगदी हास्यास्पद ठरतात आणि बर्म्युडा ट्रँगलसारख्या काही गोष्टी कायमचं रहस्यमय गूढ बनून राहतात. या वैचारिक भूमिकेमुळे माणूस नैसर्गिक आपत्तींचा सबंध निसर्गाच्या इतर अनेक घडामोडींशी जोडणं हा मानवी स्वभाव आहे. उदाहरणार्थ सूर्य अथवा चंद्र ग्रहणाचा संबंध त्या ग्रहणानंतर येणार्‍या आपत्तींशी जोडला जातो. तसे पाहिले तर निव्वळ अशास्त्रीय संबंध जोडून मनाचे समाधान करून घेणे या पलीकडे या तर्कांना फारसे महत्व नसते. पण काही वेळा हे सत्य असू शकेल इतपत संख्यात्मक पुरावे पण हाताशी येतात. 

आता सध्याच्या परिस्थितीचा आपण विचार करू या. हे कोविडचे विषाणू आले कुठून? तर त्याला निश्चित उत्तर कोणाकडेच नाही. त्यामुळे ते अमुक एका देशाने बनवले असतील आणि नंतर प्रकरण हाताबाहेर गेल्याने संपूर्ण जगात हाहाकार माजला आहे अशी बर्‍याचजणांची ठाम समजूत असेल. याला कॉन्स्पिरसी थिअरी असे म्हणण्यापलीकडे काहीच महत्व नाही. शास्त्रज्ञांना पण असेच प्रश्न बुचकळ्यात टाकतात. ते त्याची शास्त्रीय उत्पत्ती शोधतात. काहीवेळा शक्यतेच्या सीमारेषेपर्यंतही ते पोहचतात. तर विषाणू आले कुठून हा प्रश्न जेव्हा त्यांना पडला, तेव्हा त्यांनी संशोधनाची दिशा बदलून बघितली. त्यातून एक नवीन शक्यता त्यांना दिसली की आपल्याला वेठीस धरणारे हे व्हायरस कदाचित अंतराळातून आले असावेत. म्हणजे पृथ्वीच्या बाहेरून, अवकाशातून, ब्रह्मांडाच्या कुठल्यातरी अनोळखी कोपर्‍यातून हे विषाणू आले असावेत. या शास्त्रज्ञांमध्ये हॉयल आणि विक्रमसिंघे या शास्त्रज्ञांनी बरेच कार्य केले आहे. आजच्या लेखात त्यांच्या आणि त्यांच्या सिध्दांताचा पाठपुरावा करणार्‍या अनेकांचे विचार काय आहेत ते वाचू या!!


आकाशातून आपल्यापर्यंत संकटे येऊन पोहचतात. धूमकेतू ही संकटे आणतात ही संकल्पना माणसाच्या मनात फार पूर्वीपासून आहे. चीनमध्ये Mawangdui silk नावाचा एक प्राचीन ग्रंथ आहे. त्यात २९ धूमकेतू  वेगवेगळी २९ संकटे घेऊन आले याची नोंद आहे. म्हणजे ही संकल्पना तशी काही नवी नाही. सोबत दिलेले चित्र बघा. पण आपण यावर पूर्ण विश्वास न ठेवता तीन टप्प्यांत या प्रश्नाचे उत्तर शोधूया! 

यातल्या पहिल्या टप्प्यात अंतराळात जंतू आणि विषाणू असतात का? याबद्दल आपण वाचलेत. आता पाहूया पुढचे टप्पे.. 

दुसरा टप्पा: धूमकेतू किंवा इतर अंतराळातील घडामोडी  जबाबदार आहेत का? 
तिसरा टप्पा : सध्या कोणते धूमकेतू आपल्याजवळ आहेत का?

दुसरा टप्पा: धूमकेतू किंवा इतर अंतराळातील घडामोडी रोगांच्या साथीला जबाबदार आहेत का?

आता विचार करू या धूमकेतू आणि रोगांच्या साथीचा!! धूमकेतूला धूमकेतू हे नाव देण्याचं कारण कदाचित असं आहे की त्याला धूरासारखी दिसणारी शेपूट असते. जुन्या ग्रंथात त्याचा उल्लेख व्रात्य असा आहे. व्रात्य म्हणजे उनाड, भटक्या असा! पण प्रत्यक्षात तो उनाड किंवा वांड नसतो, त्याची फक्त अवकाशात फिरण्याची पध्दत वेगळी असते. त्यामुळे काही धूमकेतू शतकानुशतकं गायब झालेले दिसतात. हॅलेच्या धूमकेतूसारखे काही ७६ वर्षांच्या अंतराने येतात. काही धूमकेतू छोटे म्हणजे २० किलोमीटर व्यासाचे, तर काही ३०० किलोमीटर व्यासाचे असतात.

धूमकेतू जेव्हा सूर्याच्या जवळ जातात तेव्हा त्याच्या पृष्ठभागावरची आवरणे वितळायला सुरुवात होते. त्यामुळे त्याला शेपूट फुटते. ही शेपूट काही वेळा दुहेरी असते. नासाच्या डीप इंपॅक्ट प्रोग्राममधून असे आढळले आहे की धूमकेतूच्या पृष्ठभागावर पाणी, माती, सेंद्रीय पदार्थांचा थर असतो. सूर्याजवळ आल्यावर हे थर वितळून त्यामधून दोन शेपट्या तयार होतात. एक प्लाझ्माच्या स्वरुपात तर दुसरी माती, सिलीकेट आणि सेंद्रीय पदार्थाच्या स्वरुपात! या शेपटाची लांबी काही वेळा लक्षावधी किलोमीटर लांबीची असते. जेव्हा ते पृथ्वीजवळून जातात तेव्हा हे पदार्थ धुळीसारखे बाहेर फेकले जातात. तर काही वेळा धुमकेतूची काही शकले होतात आणि ती त्याच्यासोबतच फिरत असतात. या सर्वांमधून कचरा पृथ्वीसारख्या ग्रहांवर फेकला जातो.

हे केवळ धूमकेतूंमुळेच होते असे नाही, तर अवकाशातून हजारो टन धूळ पृथ्वीवर फेकली जात असते. १९१० साली हॅलेचा धूमकेतू जेव्हा आपल्याजवळून पुढे गेला तेव्हा त्याची अनेक शकले वातावरणात फेकली गेली. वातावरणात ती जळून जाताना अनेकवेळा प्रकाशमान होताना दिसल्याची नोंद आहे. पण या वातावरणात शिरलेली सूक्ष्म धूळ (मिलीमीटरचा हजारावा भाग ) बराच काळ मेसोफिअरमध्ये तरंगत राहते. मेसोफिअरमध्ये असलेले जंतू या धूळीच्या कणांना धरून राहतात. ही धूळ बराच काळ तरंगत राहाते, पण यथावकाश जंतूंना घेऊन खाली उतरते. हवेच्या हालचालीप्रमाणे ती धूळ वेगवेगळ्या ठिकाणी पण उतरू शकते. हवेच्या तात्काळ संपर्कात येणार्‍या पक्षांना त्याची आधी बाधा होते आणि नंतर जमिनीवरच्या इतर प्राण्यांपर्यंत हे जंतू आणि विषाणू पोहोचतात.

हॉयल आणि विक्रमसिंघे यांच्या संशोधनानुसार १९१८ साली आलेली फ्ल्यूची साथ हॅलेच्या धुमकेतूमुळे आली असावी. अनेक वर्षांच्या संशोधनानंतर त्यांनी असा सिध्दांत मांडला की "at the very least some component of the infective agent responsible for the 1918-1919 outbreaks of a lethal brand of influenza fell directly from the skies "(Hoyle and Wickramasinghe 1979). पण काही संशोधनाच्या आधारे हा हॅलेचा परिणाम नसून एन.के. नावाच्या दुसर्‍या एका धूमकेतूमुळे ही साथ आली असावी.

इथे हे लक्षात घ्यायला हवे की ही सर्व निरिक्षणे तर्कावर आधारित आहेत. या घटनेला शंभराहून अधिक वर्षे लोटल्याने थेट पुरावे उपलब्ध नाहीत. निश्चित अनुमानाला कदाचित आणखी वेळ लागेल.

सध्यापुरतं बोलायचं तर H1N1 आणि बर्ड फ्लू या साथीसुध्दा अशाच अंतराळातील धूळीतून आल्या असण्याचा शास्त्रज्ञांचा तर्क आहे.

वाचकहो, ही निरिक्षणे त्या-त्या शास्त्रज्ञांनी डेटा(माहिती, विदा) गोळा करून लिहिली आहेत. यात कपोलकल्पीत असे काही नसले तरी ठाम निष्कर्षापर्यंत अजून कोणीही पोहोचलेले नाही.

साहजिकच आता प्रश्न असा मनात येईल की आता सध्या कोणते धूमकेतू पृथ्वीवरून दिसत आहेत का? ही माहितीही आम्ही तुम्हाला नक्कीच देऊ. पण त्याचा सध्याच्या साथीसोबत काहीही संबंध जोडणे अयोग्य असेल. शास्त्रज्ञ त्यावर काम करतही असतील, पण आपण सध्या स्वत:ची काळजी घेत त्यांच्याबद्दल वाचू या!!

सबस्क्राईब करा

* indicates required