computer

जेव्हा नॉर्थ कोरीयन हॅकर्सच्या सायबर हल्ल्यात सोनी पिक्चर्स बरबाद होण्याची वेळ आली होती.

त्या दिवशी सकाळी सोनी पिक्चर्सचे अमेरिकेतील ऑफिस सुरू झाले तेव्हा आपल्यापुढे नक्की काय वाढून ठेवले आहे याची तेथील कर्मचाऱ्यांना पुसटशीही कल्पना नव्हती.

नेहमीप्रमाणे सुरू झालेला दिवस होता तो. तारीख होती २४ नोव्हेंबर २०१४. सोमवार असल्याने काहीजणांना कदाचित मंडे ब्ल्यूज वगैरे जाणवत असतील.

पण सगळ्यांनाच खाडकन जमिनीवर आणणारी एक गोष्ट काही वेळातच समोर येणार होती.

 एक खळबळजनक मेसेज सोनीच्या ऑफिसमधील सर्वच काँप्युटरच्या स्क्रीनवर झळकलेला.

त्यात म्हटले होते, "आम्ही तुम्हाला याआधीही वॉर्निंग दिली होती. ही फक्त सुरुवात आहे.तुम्ही जोवर आमच्या मागण्या मान्य करत नाही तोवर आमचे हल्ले सुरूच राहतील. आमच्याकडे आत्ता तुमच्याकडचा सर्व गोपनीय आणि सेन्सिटिव्ह डेटा आहे. तुम्ही आमचं म्हणणं ऐकलं नाही तर ही सगळी गोपनीय आणि महत्त्वाची माहिती जगासमोर आणली जाईल.'' पुढे त्या डेटाच्या लिंक्स दिलेल्या होत्या. हे हॅकर्स स्वतःला 'गार्डियन्स ऑफ पीस' (शांतीरक्षक) म्हणवून घेत होते. पण विरोधाभास असा की त्यांच्या कृतीने त्यांनी सोनीच्या ऑफिसमधील शांतता ढवळून टाकली होती.

कसली वॉर्निंग होती ती? कोणती माहिती जगासमोर येणार होती?

कर्मचाऱ्यांच्या लक्षात आले, सोनीमधील कॉम्प्युटर नेटवर्क बंद पडले आहे. ते पूर्ववत करण्यासाठी तंत्रज्ञ नंतर अनेक आठवडे झगडत होते. या काळात कॉम्प्युटर्स नसले तरी सोनीचे काम सुरूच होते. इथला स्टाफ आता व्हाईट बोर्डवर काम करत होता. सोनीच्या नेटवर्कमधून कित्येक टीबीचा डेटा अटॅकर्सनी चोरला होता, त्याच्या ओरिजिनल कॉपीज डिलीट केल्या होत्या आणि तोच डेटा उघड करण्याची धमकी ते आता देत होते.

काही दिवसांनीच आपली धमकी खरी करत ते हा गोपनीय डेटा इंटरनेटवर लीक करू लागले. काय नव्हते त्यात? सोनीच्या नेटवर्कमधून चोरलेल्या फाईल्स, सोनीचे पाच सिनेमे (त्यापैकी चार रिलीज व्हायचे होते), अनेक गोपनीय कागदपत्रे, सोनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांमधील पत्रव्यवहार, कर्मचाऱ्यांचे पगार आणि परफॉर्मन्सविषयक अहवाल, त्यांच्या आपापसातील संभाषणे, इतर खासगी, गोपनीय, संवेदनशील आणि महत्त्वाच्या गोष्टी असे सगळेच उघड व्हायला सुरुवात झाली. या घटनेने चांगलीच धमाल उडवून दिली. ज्यांच्या गुपितांचे बुडबुडे फुटले त्यांचे चेहरे पाहण्यासारखे झाले. आता यात काही फाईल्स पासवर्ड प्रोटेक्टेड होत्या. या फाईल्स त्यांनी पत्रकारांकडे पाठवल्या. त्यातून त्या अजून पसरल्या.

यातून कायकाय समोर आले याची यादी बरीच मनोरंजक आहे -
- अँजेलिना जोली, केविन हार्ट यांच्यासारख्या कलाकारांसाठी सोनीच्या उच्चपदस्थांनी वापरलेल्या शेलक्या शिव्या
- सोनीच्या एक्झिक्युटिव्ह्जमध्ये केवळ एकच स्त्री असण्याची कारणे
- जेनिफर लॉरेन्सला 'अमेरिकन हसल'मधील भूमिकेसाठी पुरुष सहकलाकारांपेक्षा मिळालेले कमी मानधन
- ऍमी पास्कल या महिला एक्झिक्युटिव्हने प्रेसिडेंट ओबामाविरोधात केलेले असभ्य विनोद
- कर्मचाऱ्यांमधील गॉसिप
- महत्त्वाची व्यापारी गुपिते
याचा परिणाम म्हणून काही दिवसात सोनीने अनेक टॉप बॉसेसना काढून टाकले.

पण हे सगळे कशासाठी चालले होते?

यामागील कारण होते 'द इंटरव्ह्यू' नावाचा सिनेमा. पोलिटिकल सटायर या प्रकारात मोडणारा हा विनोदी चित्रपट सोनीने निर्माण केला होता. दोन अमेरिकन पत्रकार नॉर्थ कोरियाचा हुकूमशहा असलेल्या किम जोंग उनची मुलाखत घेण्यासाठी जातात आणि त्याआधीच सीआयए ही अमेरिकेची गुप्तचर संघटना त्यांना त्याला ठार मारण्याची सुपारी देते, त्यानुसार ते किमची हत्या घडवून आणतात अशी या सिनेमाची स्टोरी. या सिनेमात स्पेशल इफेक्ट्स आणि स्लो मोशन तंत्राचा वापर करून किम प्रवास करत असलेल्या हेलिकॉप्टरचा स्फोट होतो आणि त्यात त्याचे शरीर ज्वाळांनी लपेटले जाते असे दाखवलेले होते. साहजिकच या सिनेमाने नॉर्थ कोरियात वादळ निर्माण झाले.

तसा हा तमाशा अगदी अलीकडील नव्हता. याआधीही नॉर्थ कोरियाने युनायटेड नेशन्सला एक पत्र लिहून असा सिनेमा तयार करायला परवानगी देऊन अमेरिका एकप्रकारे दहशतवादाला खतपाणीच घालत आहे असा आरोप केला होता. जपानमध्ये सोनीच्या कॉपोरेट पेरेंटनेही किम-जोंग-उन च्या मृत्यूच्या सीनला आक्षेप घेतला होता. कारण स्पष्ट होते. जपानसाठी नॉर्थ कोरिया म्हणजे सुरक्षेच्या दृष्टिकोनातून डोकेदुखी होती. दोन्ही देश तसे एकमेकांच्या जवळ असल्याने नॉर्थ कोरियात कोणताही तणाव वाढल्यास जपानलाही त्रास होणार होता.

शेवटी सगळीकडून वाढणाऱ्या दबावापुढे झुकत सोनीने 'तो' सीन काहीसा सौम्य करून दाखवण्याची तयारी दाखवली होती. किमच्या चेहऱ्यावरील जळाल्याच्या खुणा कमी करणे, केसांभोवती लपेटलेल्या ज्वाळा निम्म्याने कमी करणे या गोष्टी करण्याचे त्यांनी मान्य केले होते. याहून जास्त बदल करणे म्हणजे सिंहाचे दात आणि नख्या काढून टाकण्यासारखेच होते.

पण इकडे हे हॅकर्स ऐकायला तयार नव्हते.

हा सिनेमा २५ डिसेंबरला प्रदर्शित होणार होता. त्याचे प्रदर्शन रद्द करणे ही त्यांची मुख्य मागणी होती. डिसेंबरमध्ये त्यांनी अजून एक ईमेल पाठवून चक्क ११ सप्टेंबरसारखा दहशतवादी हल्ला करण्याची धमकीच दिली. यामुळे वातावरण ढवळले गेले. सिनेमाचे प्रदर्शन रद्द करण्याची मागणी चित्रपटगृहांचे वितरकही करू लागले. अखेर १६ डिसेंबर रोजी चित्रपटगृहांना तशी परवानगी दिली गेली.

परत एक नवीन वाद उफाळून आला. काहीजणांच्या मते या मूठभर लोकांच्या धमक्यांना भीक घालून सोनी चुकीचा पायंडा पाडत होती. यात अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा हेही होते. कुणाच्याही धमक्यांना घाबरण्याइतके आपण कणाहीन आहोत का? असा त्यांचा सवाल होता.

पुन्हा एकदा सोनीने पवित्रा बदलला. आता त्यांनी जे वितरक हा सिनेमा दाखवू इच्छित असतील त्यांना प्रदर्शित करू द्यायचे ठरवले. याशिवाय कुणी हा सिनेमा पाहण्याची मागणी केल्यास त्याच्यासाठी तो ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर ऑन डिमांड रिलीज करायचेही ठरले. पण एवढे करूनही हा व्यवहार सोनीसाठी तोट्याचा ठरला. ४४ दशलक्ष डॉलर्स खर्चून बनवलेल्या या सिनेमातून त्यांना केवळ ३६ दशलक्ष डॉलर्स एवढी कमाई झाली.

अमेरिकन सरकारच्या मते या हॅकिंगच्या मागे नॉर्थ कोरियाचा हात होता. त्यांच्याकडे तसा पुरावा होता. अटॅकसाठी वापरलेले मालवेअर कोरियन भाषेत लिहिलेले होते. शिवाय नॉर्थ कोरियाने यापूर्वी साऊथ कोरिया आणि सौदी अरेबिया यांच्यासाठीही अशीच पद्धत वापरून सायबर हल्ले केले होते. नॉर्थ कोरियाने मात्र हा आरोप फेटाळत हात वर केले.

यात एक प्रश्न होता- नॉर्थ कोरियासारख्या गरीब, तुलनेने मागास, आणि हुकूमशाही देशात इतक्या उच्च दर्जाचे हॅकर्स असू शकतील का? नॉर्थ कोरिया इतर देशांसारखा नाहीय. जेथे पर्सनल कॉम्प्युटर, इंटरनेट वापरायला बंदी होती तेथे हॅकर्स कुठून येणार? अनेकांना हा प्रश्न पडला होता. पण हे वरवर दिसते तितके सरळ नव्हते.
नॉर्थ कोरियात हॅकर्स होते. तेही साधेसुधे नाहीत तर चांगले प्रशिक्षित, चीन, रशिया येथून हॅकिंगचे प्रशिक्षण घेऊन आलेले होते. त्यांना या देशात चांगला पगार, सोयीसुविधा होत्या. आत्तापर्यंत अनेक हाय प्रोफाइल सायबर हल्ले त्यांनी यशस्वीरित्या पार पाडले होते आणि आता मनोरंजन उद्योगातील मोठे नाव असलेल्या सोनी पिक्चर्सलाच त्यांनी दणका दिला होता.

अलिकडल्या इतिहासातील हा सर्वात मोठा सायबर हल्ला समजला जातो. याचे परिणाम केवळ मनोरंजन उद्योगापुरते सीमित नव्हते, तर अमेरिकेच्या नॉर्थ कोरियाबरोबरच्या परराष्ट्र धोरणावरही होणार होते. या सगळ्या प्रकरणात सोनीने काय भूमिका घेतली, अशा प्रकारे एका कंपनीची अब्रू चव्हाट्यावर आणणे नैतिकदृष्ट्या बरोबर होते की नाही यापेक्षा राजकीयदृष्ट्या संवेदनशील सिनेमा बनवल्यावर काय होऊ शकते याची ही चुणूक होती.

स्मिता जोगळेकर

सबस्क्राईब करा

* indicates required