computer

मुंग्या आणि माणसं यांच्यातलं साम्य शोधण्यासाठी धडपडणाऱ्या या माणसाचं काम डार्विनच्याच तोलामोलाचं आहे

तुम्ही मुंग्यांची रांग बघितली आहे ना? या रांगेतल्या दोन मुंग्या एकमेकींच्या जवळ आल्या की काही सेकंद का होईना थांबतात, जणू एकमेकींना 'जादू की झप्पी' देतात आणि मग पुढे जातात. निसर्गात प्रत्येक सजीवाची स्वतःची अशी समाज व्यवस्था असते, याचं हे उत्तम उदाहरण आहे. या मुंग्यांकडे पाहून बहुतेकजण दुर्लक्ष करून पुढे जातात.पण एखाद्याच्या मनात या मुंग्या का थांबतात याबाबत कुतूहल निर्माण होतं. एडवर्ड विल्सन या शास्त्रज्ञाने हे उत्तर शोधण्याचा जन्मभर खटाटोप केला ! 

या शास्त्रज्ञाने वाळवी व मुंग्यांमधील सामाजिक व्यवस्थेचा अभ्यास करण्यासाठी संपूर्ण आयुष्यभर वाहून घेतलं. त्यासाठी त्यांनी काय नाही केलं! मानव आणि मुंग्या हे दोन्ही समाजशील प्राणी. त्यामुळे त्यांनी या दोघांच्या सामाजिक वर्तनाचा अभ्यास केला. त्यात कायकाय साम्य आहे ते शोधलं. यासाठी या सजीवांच्या पेशींमधील जीन्स कारणीभूत आहेत आणि त्यांचा सामाजिक वर्तनावर परिणाम होतो हे सिद्ध केलं. मुंग्यांचा अभ्यास हे त्यांचं कार्यक्षेत्रही बनलं आणि जीवनाचं ध्येयही.

पण विल्सन आणि मुंग्या यांच्यातला दुवा एका विचित्र योगायोगामुळे सांधला गेला. लहानपणापासूनच ते निसर्गाच्या सान्निध्यात रमायचे. वडील सतत इकडून तिकडे कामाच्या शोधात फिरायचे. त्यात त्यांना दारूचं व्यसन होतं. त्यामुळे त्यांना फारसे मित्र नव्हते. झाडं, पशुपक्षी, कीटक यांच्याशीच जणू दोस्ती. एकदा मासे पकडताना एक छोटासा अपघात झाला. माशाच्या पंखामुळे त्यांच्या डोळ्याला इजा झाली. बरं याबद्दल घरी सांगायचीपण चोरी! घरच्यांना काही कळलं तर आपल्याला बाहेरच जाता येणार नाही म्हणून त्यांनी घरच्यांना अंधारात ठेवलं. पण त्यांच्या डोळ्यांना सूज येऊन प्रकरण पार शस्त्रक्रियेपर्यंत गेलं. त्यामुळे त्यांचा उजवा डोळा कायमचा निकामी झाला. डाव्या डोळाही बराच अधू झाला. त्यांना आकाराने मोठ्या असलेल्या गोष्टी स्पष्ट दिसेनात. पण एक मात्र झालं. हा डोळा सूक्ष्म गोष्टी जास्त स्पष्टपणे टिपायला लागला. त्यामुळे त्यांना किटकांचे डोळे, स्पृशा(मिश्या), अंगावरचे रोम (केस) स्पष्ट दिसायचे. या अपघाताने लहानग्या विल्सनला या कीटकांच्या अभ्यासात रस निर्माण झाला.

वयाच्या नवव्या वर्षी विल्सन वॉशिंग्टन डीसी येथील रॉक क्रीक पार्क येथे मोहिमेसाठी गेला. तिथे गेल्यावर त्याने तिथले किडे, मुंग्या, फुलपाखरं गोळा करायला आणि त्यांचं निरीक्षण करायला सुरुवात केली. त्याचदरम्यान त्याला फुलपाखरांविषयी आवड निर्माण झाली. झाडू, कोटाचे हँगर आणि चीज क्लॉथच्या पिशव्या यांच्यापासून तो फुलपाखरं आणि किडे पकडण्याच्या जाळ्या तयार करायचा. अशाच मोहिमेदरम्यान त्याला मुंग्यांविषयी आकर्षण निर्माण झालं. एकदा एका कुजलेल्या झाडाचं खोड बाजूला केल्यानंतर त्याला त्याच्या खाली सिट्रोनेला जातीच्या मुंग्या आढळल्या. यामध्ये कामकरी मुंग्या होत्या. त्यांच्या शरीरातून तीव्र असा लिंबाचा गंध बाहेर पडत होता. यातूनच त्याला मुंग्यांबद्दल कुतूहल निर्माण झालं. अठराव्या वर्षापर्यंत त्याने कीटकशास्त्रज्ञ व्हायचं नक्की केलं होतं. त्यासाठी त्याने माश्या गोळा करायला आणि त्यांचा अभ्यास करायला सुरुवातही केली होती. पण दुसऱ्या महायुद्धादरम्यान इन्सेक्ट पिन्सचा (कीटकांचा अभ्यास आणि निरीक्षण करण्यासाठी त्यांना विशिष्ट प्रकारच्या टाचण्यांच्या मदतीने काचपट्टीवर बसवलं किंवा टोचून ठेवलं जातं, त्या टाचण्या म्हणजे इन्सेक्ट पिन्स) तुटवडा निर्माण झाला. त्यामुळे त्याला त्याचं लक्ष मुंग्यांवर केंद्रित करावं लागलं. तेरा वर्षाचा असताना त्याने अलाबामामध्ये पहिली फायर अँट जातीच्या मुंग्यांची वसाहत शोधून काढली.

पुढे एडवर्ड विल्सन यांना जागतिक दर्जाचे कीटकतज्ञ म्हणून ओळख मिळाली. त्यांना आधुनिक जगाचा डार्विन म्हणून ओळखलं जायला लागलं. द अँट मॅन म्हणून ते प्रसिद्ध झाले. त्यांनी मुंग्यांवर बरंच संशोधन केलं. मुंग्या एकमेकांशी फेरोमोन नावाच्या गंधद्रव्यांच्या साहाय्याने संपर्क साधतात, हा शोधही त्यांनीच लावला. पुढे त्यांनी हार्वर्ड विद्यापीठातून डॉक्टरेट मिळवली. तिथं काही काळ अध्यापनही केलं. त्यांना दोनदा प्रतिष्ठेचं पुलित्झर पारितोषिक मिळालं आहे.

विल्सन यांनी सोशियोबायोलॉजी आणि उत्क्रांतीचा सिद्धांत यांचा वापर करून समाजप्रिय किटकांचं वर्तन कसं असतं हे स्पष्ट करण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या म्हणण्यानुसार, माणसासह सर्व प्राण्यांचं वर्तन हे मुख्यतः आनुवंशिकता, आजूबाजूचं वातावरण, भूतकाळात आलेले अनुभव यांनुसार ठरतं, आणि फ्री विल म्हणजे कोणत्याही बाह्य हस्तक्षेपाशिवाय निर्णय घेण्याचा अधिकार असणं हा केवळ एक आभास आहे. आपल्या या मताच्या पुष्ट्यर्थ त्यांनी अनेकांशी वाद घातला. त्यातूनच सोशियोबायोलॉजी ही नवीन शास्त्रशाखा विकसित झाली. या शास्त्रज्ञांचं नुकतंच, दिनांक २६ डिसेंबर २०२१ रोजी वयाच्या ९२ व्या वर्षी निधन झालं. त्यांना बोभाटा परिवारातर्फे श्रद्धांजली.

स्मिता जोगळेकर

सबस्क्राईब करा

* indicates required