computer

तुम्हाला माहिती आहे की पहिला फोटो १८२६मध्ये काढला गेला होता? जाणून घ्या आणखी काही शोधांबद्दल..

२०००च्या दशकाच्या अखेरीस आणि त्यानंतर जन्मलेल्या पिढीला एकेकाळी माणशी काय, घरटीसुद्धा फोन आणि टीव्ही नव्हते हे सांगूनही पटायचं नाही. संगणकाची तर मग बातच सोडा. मुंबईत अमक्या वाजता ढमक्या प्लॅटफॉर्मवर इंडिकेटरखाली भेटण्याचे संकेत असत, तर एका ठिकाणाहून दुसरीकडे पत्र जायला किमान २-३ दिवस लागत.

आज बोभाटा.कॉम घेऊन आले आहे मागोवा या यंत्राच्या सुरवातीच्या काळातला..

 

जगातील पहिला टेलिफोन

१८७६मध्ये अलेक्झांडर ग्रॅहम बेल या स्कॉटिश शास्त्रज्ञाने टेलिफोनचा शोध लावला. त्याचं यंत्र अगदी प्राथमिक स्वरूपाचं आहे. आता कधी कधी घरसजावटीसाठी म्हणून आकडे गोल फिरवण्याचे यंत्र काही लोकांकडे दिसतं.

जगातील पहिला मोबाईल फोन

इंग्रजांच्या काळातच फोनसुविधा चालू झाली असली तरी तिचं प्रत्येक घरी आगमन झालं नव्हतं. परदेशात तिचा बर्‍यापैकी प्रसार झाला होता आणि लोकांना कधीही , कुठेही संपर्क साधता येण्याची गरज किंवा चैन -हवं ते म्हणा-निर्माण झाली. १९७३ साली मोटोरोला कंपनीच्या मार्टिन कूपर यांनी अस चालताबोलता वापरावयाचा म्हणजेच भ्रमणध्वनी निर्माण केला. 

हा अर्थातच खूप जड होता आणि तो बाळगण्यासाठी दुसरी एक बॅग सोबत ठेवावी लागे. भारतात मोबाईल फोन्स यायला १९९८-९९ उजाडावं लागलं होतं. 

जगातील पहिला संगणक

आताशा अगदी घड्याळ, कार आणि टीव्हीमध्येही संगणकशास्त्र आलं असलं तरी १९४६ मध्ये आलेला पहिला सर्वसाधारण उपयोगासाठी वापरला जाऊ शकणारा (General Purpose) असा संगणक म्हणजे १८०० चौरस फुटाचं धूड होतं. त्याला द्यायचं इनपुटही आजइतकं सहजी नव्हतं. मात्र नंतरच्या या शाखेतल्या उत्तरोत्तर प्रगतीमुळे आज संगणकाशिवय जगणं अवघड होऊन बसलंय. 

या पहिल्या संगणकाला ENIAC म्हणजेच Electronic Numerical Integrater and Computer असं त्याच्या आकाराप्रमाणेच लांबलचक नांव होतं. 

जगातील पहिला लॅपटॉप

पहिली लॅपटॉप सदृश्य गोष्ट झेरॉक्स पार्क (Xerox PARC) या कंपनीने १९७६ मध्ये झेरॉक्स नोट टेकर म्हणून तयार केली असली तरी त्यांनी त्या यंत्राचे दहाच नग बनवले होते. त्यामुळे ते उपकरण सर्वांपर्यंत पोचलंच नाही. त्यामुळे १९८१ साले बनलेल्या ऑसबॉर्न-१ या यंत्राला पहिला लॅपटॉप म्हणवून घेण्याचा मान जातो. 

तुम्ही लॅपटॉपचा इतिहास पाहिलात तर मोबाईलसारखाच त्याचा स्क्रीनसाईज वाढत गेलेला दिसतो. पहिल्या लॅपटॉपची स्क्रीनसाईज तर फक्त पाच इंच आणि इतर हार्डवेअरच जास्त होतं.

जगातील पहिला कॅमेरा

कॅमेर्‍याचं तंत्र तसं फार जुनं. कॅमेरा ऑब्स्कुरा या नावाने ओळखलं जाणारं तंत्र प्राचीन चीन आणि ग्रीक लोकांनी विकसित केलं होतं. यात भिंग वापरून वा छिद्राच्या साह्याने बाहेरील प्रतिमा कॅमेर्‍यात पाडण्यात येत असे. हा कॅमेरा अगदी  एखाद्या खोलीइतका मोठा असायचा आणि एक-दोघे त्यात सहज करू शकत. 

कॅमेर्‍यानं काढलेला फोटो डेव्हलप करता येऊ शकणारा आणि वाहून नेता येण्यासारख्या लहान आकाराचा कॅमेरा यायला मात्र १८३९ उजाडावं लागलं. आता DSLR चा जमाना आहे आणि त्यातही थेट वायरलेस यंत्राला जोडता येऊ शकणारे कॅमेरे बाजारात उपलब्ध आहेत.

जगातील पहिला फोटो

आजकाल छान फोटो दिसला की लगेच शटरस्पीड, एक्स्पोजर वगैर शंका यायला लागतात आणि नवा DSLR खरेदी केलेल्यांचा उत्साह तर विचारू नये. पण सुरवातीच्या काळात कॅमेर्‍याचं वजनच इतकं असे की ते सगळं गैरसोईचं होई. हा वरचा जगातील काही पहिल्या फोटोपैकी असलेला फोटो आहे १८२६ किंवा २७ साली काढलेला ’ल ग्रास’ येथील एका खिडकीतून दिसणार्‍या दृश्याचा. फोटो डेव्हलप लरण्याचा  पहिला अर्धवट यशस्वी प्रयत्न १८१६ मध्येफोर नेप्से ( Nicéphore Niépce) या शास्त्राज्ञाने केला होता. 

पुढे साधारण १८३९पर्यंत तंत्र आणखी सुधारल्यानंतर फोटो तुलनात्मकरित्या अधिक काढले जाऊ लागले. 

जगातील पहिला रेडिओ

१८८८ मध्ये ’हेन्रिच हर्टझ’ यांनी हर्टझलाटांचा सिद्धांत मांडला आणि १८९५मध्ये इटालियन शास्त्रज्ञ गुग्लीमो मार्कोनी यांनी बिनतारी यंत्रणेचा शोध लावला. परंतु मानवी आवाज रेडिओवर ऐकू येण्यासाठी १९०० साल उजाडावे लागले. 

जगातील पहिला टीव्ही

जॉन लॉगी बेअर्ड यांनी १९२५ मध्ये टीव्हीचा शोध लावला आणि १९३२ मध्ये बीबीसीने प्रसारणही चालू केले होते. परंतु टीव्ही घराघरांत पोचायला १९४६साल उजाडावे लागले. वरती पाहात आहात तो RCA 630-TS हा जगातला पहिला मोठ्या प्रमाणावर उत्पादन केलेला टीव्ही आहे. 

सबस्क्राईब करा

* indicates required