computer

येत्या काही दिवसांत ४ ग्रह एकत्र येत आहेत. कोण, कधी, काय कसे हे पटकन वाचून घ्या!!

आकाशात ग्रह तारे पाहणे हे खूप जणांना आवडते. खास करून उन्हाळ्यात आकाश निरभ्र असते. त्यामुळे आकाश दर्शन फार सुंदर होते. तुम्हालाही या सगळ्यांचं कुतूहल असेल तर हा लेख खास तुमच्यासाठीच आहे.

तर, एप्रिल महिन्यात अनेक ग्रहांची दिशा बदलणार आहे. तसेच एक सुंदर दुर्मिळ योगही पाहता येणार आहे. नासाने नुकतीच एप्रिल महिन्यात कोणकोणत्या ग्रहांची युती आपण उघड्या डोळ्यांनी आणि कुठल्या दिशेला पाहू शकतो याची माहिती दिली आहे. आज या लेखात आपण त्याबद्दल जाणून घेऊयात.

एप्रिलचा शेवटचा आठवडा जगभरातील खगोल प्रेमींसाठी सर्वाधिक खास ठरणार आहे. शुक्र, मंगळ, गुरू आणि शनि या चार ग्रहांचे दुर्मिळ संयोग या महिन्यात होण्याची अपेक्षा आहे. हे ग्रह एकमेकांपासून खूप दूर असले तरी ते एका सरळ रेषेत असल्यासारखे दिसतील. हे सर्व एका ग्रह विशिष्ट स्थानावर असतील. आणि फक्त हेच नाही, तर विशेष म्हणजे आणखी दोन ग्रह - बुध आणि युरेनस या वर्षाच्या शेवटी संरेखनात ( म्हणजे या सरळ रेषेत) सामील होण्याची अपेक्षा आहे. हा दुर्मिळ योग म्हणजे सर्व खगोल प्रेमींसाठी एक पर्वणीच आहे.

नासानुसार ही दुर्मिळ घटना अजून विशेष असेल. कारण दुर्बिणी किंवा इतर पाहण्याचे साधन न वापरता फक्त डोळ्यानाही दिसू शकेल. आकाश ढगाळ नसेल तर हा अनुभव सगळ्यांनाच घेता येईल.
नासाच्या वेबसाइटनुसार एप्रिलच्या सुरुवातीला, शुक्र, मंगळ आणि शनि सूर्योदयापूर्वी आग्नेय दिशेला एकत्र आले होते. तर शनी दररोज मंगळाच्या दिशेने फिरताना दिसतो. त्यानंतर एप्रिल महिन्याच्या मध्यापर्यंत, गुरू पहाटेच्या पूर्व भागात येऊन या तिघांच्या रेषेत दिसतो. पहाटेच्या वेळेस अश्याप्रकारे शुक्र, मंगळ, गुरु आणि शनि यांचे एका रेषेत दिसणे म्हणजे फार सुंदर अनुभव असणार आहे. असे योगायोग नेहमीच घडत नाहीत. त्यामुळे हा अनुभव घेण्यासाठी सगळ्यांच्या नजरा आकाशाकडे असणार आहेत.

तुम्ही हे कधी पाहू शकता?

अर्थस्कायच्या मते, सकाळी सूर्योदयापूर्वी हे चार ग्रह उत्तम प्रकारे पाहिले जाऊ शकतात. भारतातील बर्‍याच ठिकाणांसाठी ते सकाळी ५ ते ६ दरम्यान दिसतील. पूर्वेला ३० एप्रिल अखेरपर्यंत ही घटना साध्या डोळ्यांनाही दिसून येईल.

हे चार ग्रह एका रेषेत आल्यानंतर 24 जूनच्या आसपास बुध, युरेनस देखील संरेखनात सामील होतील. तेव्हा आकाश निरभ्र असेल तर ५ ग्रह एका रेषेत दिसतील. सहावा ग्रह युरेनसही यात असेल. पण त्याचा आकार इतका लहान आहे की उघड्या डोळ्यांनी पाहणे जवळजवळ अशक्य आहे.

हे ग्रह ओळखणार कसे?

शुक्र सर्व चार ग्रहांमध्ये सर्वात तेजस्वी असेल, त्याचा चमकदार पांढरा प्रकाश चमकेल. गुरु हा दुसरा सर्वात तेजस्वी, पांढरा रंग चमकणारा असेल. शनी इतर तिघांपेक्षा फिका असेल. मंगळ ग्रह रंगामुळे इतरांपेक्षा वेगळा म्हणजे तेजस्वी नारिंगी बिंदूप्रमाणे दिसेल.

हे सगळे ग्रह आणि सोबत चंद्रकोर एकाच वेळेस दिसतील. त्यामुळे तुम्ही हा अनुभव घेण्यास नक्कीच उत्सुक असाल नाही का?

शीतल दरंदळे

सबस्क्राईब करा

* indicates required