computer

एकाच झाडाला ४० प्रकारची फळे? काय आहे हा 'ट्री ऑफ 40’ आणि हे साध्य कसे झाले आहे?

कोणत्याही झाडाला साधारणपणे किती फळं लागतात? असं विचारल्यास तुम्ही म्हणाल, ते फळझाड कुठले आहे यावर अवलंबून असतं. अगदी बरोबर! सगळ्यांना माहिती आहे की, ठराविक झाडांना ठराविकच फळे लागतात. पण तुम्ही हे ऐकलं आहे का, की एकाच झाडाला ४० वेगवेगळी फळे लागलेली आहेत. होय! हा चमत्कार वाटेल. पण हे खरोखर घडलं आहे. न्यूयॉर्कच्या प्रोफेसर सॅम वॉन ऐकेन यांनी हे शक्य केले आहे. आज वाचूयात या अद्भुत झाडाबद्दल!

या अद्भूत झाडाला ‘ट्री ऑफ 40’ असे नाव देण्यात आले आहे. याला ४० वेगवेगळ्या प्रकारची फळं येतात. यात बदाम, खजूर, चेरी, नेक्टराइन, जर्दाळू अशी फळे येतात. या झाडाचा प्रयोग न्यूयॉर्कच्या सॅम वॉन ऐकेन यांनी केला आहे. ते सिराक्यूज युनिवर्सिटीमध्ये व्हिज्यूअल आर्टचे प्रोफेसर आहेत. प्रोफेसर वॉन २००८ पासून ट्री ऑफ ४० वर काम करत आहेत. त्यासाठी त्यांना ग्राफ्टिंग म्हणजे कलम तंत्रज्ञानाची मदत झाली आहे. कलम तंत्रज्ञान म्हणजे वेगवेगळ्या फळांच्या झाडांच्या फांद्या मुख्य झाडाला जोडल्या जातात. झाडाला फूल येण्यास सुरूवात झाली की, ही प्रक्रिया वापरता येते. त्यानंतर फांद्यावर वेगवेगळे प्रकारचे रासायनिक लेप लावले जातात. अर्थात त्यासाठी देखभाल आणि झाडाची काळजी घ्यावी लागते. वातावरणाचा अभ्यास करावा लागतो. ऐकेनना या ग्राफ्टिंगसाठी ५ वर्षं लागली.

प्रोफेसर सॅम वॉन ऐकेन हे एका शेतकरी कुटुंबातून आले आहेत. त्यामुळे त्यांनी कलम तंत्रज्ञानाबद्दल ऐकले होते. कलम पद्धतीचा वापर जपान, चीन, दक्षिण कोरिया, अमेरिका इत्यादी विकसित देशांमध्ये टरबूज, कॅंटलूप, काकडी आणि टोमॅटोसारख्या फळभाज्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर केला जातो. पण एवढ्या मोठ्या प्रमाणात फळझाडावर हा प्रयोग कोणीही केला नव्हता. वॉन यांनी लहान स्तरावर यावर काम केले होते. पुढे आणखी रिसर्च करण्यास सुरूवात केली. तसेच अनेक कृषि वैज्ञानिकांशी आणि कलम तंत्रज्ञानाची माहिती असणाऱ्यांची भेट घेतली. त्यातून त्यांना मार्गदर्शन मिळाले आणि त्यांनी प्रयोग करायचे ठरवले. तब्बल ८ वर्षांनी त्यांना यात यश मिळाले.

न्यूयॉर्कच्या स्टेट एग्रीकल्चरल एक्सपेरिमेंट च्या वेळी त्यांना एक बाग दिसली. या बागेत बरीच झाडे होती, पण त्यावर लक्ष ठेवणारे कोणीही नव्हते. तेव्हा बागेच्या देखभालेसाठी पैसेही कोणी द्यायला तयार नव्हते. झाडांची काळजी घेणारा माळीदेखील नोकरी सोडून गेला होता. तेव्हा वॉन यांनी ती बाग भाड्याने घेतली व तिथेच आपले काम करण्यास सुरूवात केली.
२०१४ पासून वॉन यांनी अशी १४ झाडे तयार केली आहे. ट्री ऑफ ४० ची किंमत जवळपास २० लाख आहे. अनेक पर्यटक ही किमया पाहायला येतात.

तुम्हाला आवडेल का असे झाड प्रत्यक्षात पाहायला?

शीतल दरंदळे

सबस्क्राईब करा

* indicates required