computer

मानवी शरीरातल्या या चार गोष्टींचा खरंतर माणसाला आता बिल्कुल उपयोग नाही..

उत्क्रांती होऊन माकडाचा माणूस झाला. हे व्हायला हजारो वर्षं जावी लागली खरी. अन् ते होताना शरीरात बरेच बदलही घडले.    आधीची शेपूट गळून पडली, आणखीही बरंच काय काय झालंच. पण त्यानंतरही पूर्वी  अत्यंत उपयुक्त असणाऱ्या काही गोष्टी अजून आपल्या शरीरात शिल्लक आहेत, पण आता त्यांचा  सध्याच्या आयुष्यात काहीच उपयोग नाहीय. जाणून घेऊयात काय आहे हे प्रकरण...

१. शेपटीचं हाड/माकडहाड (Tailbone)

आता आपल्याला एकेकाळी शेपटी होती हे तर सर्वमान्य आहे.  आता शेपटी राहिली नाहीय, पण शेपटीचं हाड मात्र शिल्लक आहे. गर्भाच्या प्राथमिक अवस्थेत गर्भालाही शेपूट असते. ती कालांतराने नाहीशी होते किंवा आपण असं म्हणू शकतो की शरीर ती शेपूट शोषून घेतं. पण एखाद्या दुर्मिळ केसमध्ये बाळ शेपटासह जन्म घेऊ शकतं बरं!! आता  आपल्या पूर्वजांना झाडांवरुन   उड्या मारताना अत्यंत आवश्यक असणाऱ्या शेपटीचा किंवा तिच्या हाडाचा आपल्याला काय उपयोग सांगा!! 

२. अंगावर काटा येणं

हे म्हणजे प्रेमातले रोमांच नाही बरं.. पण घाबरलेल्या क्षणी किंवा खूप थंडी वाजते तेव्हा अंगावर काटा येतो, तो आपल्या सध्या काही कामाचा नाही. 
आता आपल्या पूर्वजांच्या अंगावर भरपूर केस होते. ते तसे बऱ्याच प्राण्यांच्याही अंगावर असतात. थंडीत या केसांमुळे त्यांचं रक्षण होतं आणि शत्रू समोर आला की मांजरीसारखे केस फिस्कारले, तर शत्रूला आपण आहे त्या आकाराहून मोठे वाटतो. त्यामुळंच, अंगावर काटा येणं ही थंडीत किंवा तीव्र भावनेच्या वेळेस होणारी नैसर्गिक प्रतिक्षिप्त क्रिया आहे. आता बचाव करणारे केसच अंगावर नसतील तर त्या काट्याचाही काय उपयोग??

३. कान

अहंहं.. म्हणजे कान आपल्याला उपयोगाचे आहेत, पण त्या कानांमधले लहान स्नायू- ज्यांना अरिक्युलर मसल म्हणतात, ते काही उपयोगाचे नाहीत. म्हणजे असं बघा, उत्क्रांतीपूर्वी माणसांचे कानदेखील प्राण्यांच्या कानाप्रमाणे वर-खाली, इकडे-तिकडे असे हलू शकायचे. नंतर मात्र आपण माणसं आणि माकडांतील काही जाती, उदा. चिंपाझी हे कान न हलवता सरळ मान हलवूनच कानोसा घेऊ लागले. म्हणजे आपण त्या अरिक्युलर मसलचा तितकासा उपयोग करत नाही. पण अजूनही  काही लोकांचे कानपण नुसते वरखाली हलू शकतात. गंमत म्हणून इतर लोकांना हलते कान दाखवण्याखेरीज त्याचाही काही उपयोग नाही बरं..
काही लोकांच्या कानाच्या वरच्या कडेवर एक उंचवटाही असतो. शास्त्रीय भाषेत याला डार्विनचा पॉईंट असं म्हणतात. या पॉईंटवर कान मुडपून तो खालच्या भागाला झाकू शकत असे. काही लोकांना कान जिथं चेहऱ्याला चिकटलेला असतो तिथं छिद्रही असतं. ते म्हणे आपल्याला कधीकाळी माशांसारखे कल्ले होते, त्याचा राहिलेला निरुपयोगी भाग आहे. 

४. अक्कलदाढ

हे म्हणजे विचित्रच दुखणं असतं राव!! म्हणजे येताना येतात उशीरा आणि तोवर आपले इतर २८ दात चांगलेच वाढलेले असतात. या शेवटच्या चार दातांना यायला बरेचदा मग जागाच मिळत नाही आणि डॉक्टरकडे जाऊन ते दात काढावे लागतात. हे एक वेळ बरं म्हणायची वेळ येते, जेव्हा ते अर्धवट नुसते हिरड्यांत येतात, आणि पुढे वाढत नाहीत तेव्हा... दात दुखून दुखून हालत वाईट होते अगदी. तर या अक्कलदाढा आता उत्क्रांतीनंतर काही तितक्याशा उपयोगाच्या  नाहीत हो. 
संशोधकांचं असं म्हणणं आहे की आपल्या पूर्वजांना या अक्कलदाढांचा आपल्यापेक्षा अधिक उपयोग होत असे. 

उत्क्रांती तर तशी होतच राहाते. काही संशोधकांचं म्हणणं आहे की भविष्यात सध्या आपल्या शरीरात असलेल्या १५ गोष्टी नष्ट होतील. त्यात मग पायांची बोटे, अपेंडिक्स वगैरेंचा समावेश आहे. मात्र तेव्हा तर आपण नसू,  मग कशाला उद्याची बात...?? 

सबस्क्राईब करा

* indicates required