computer

एक नाही,दोन नाही तब्बल सात कोटी 'किसेस'ची कहाणी !

सध्या मराठी मध्यमवर्गीय लोकांची राजधानी समजल्या जाणारे डोंबिवली एका वेगळ्याच कारणासाठी बातम्यांममध्ये गाजते आहे.एका प्रेमी युगुलाने  रेल्वे प्लॅटफॉर्मवर घेतलेल्या चुंबनाची क्लिप व्हायरल झाली आहे.तुम्ही ती बघितली असेलच. पण बोभाटाचा आजचा विषय तो नाही तर तब्बल सात कोटी 'किसेस'चा म्हणजे हर्शीज चॉकलेटचा आहे ज्याचं नावच आहे 'किसेस' ! आता याचा सात कोटींशी काय संबंध ते शेवटी सांगूच पण आधी अधिक वाचू या हर्शीज बद्दल !

 

दुबई काय किंवा अमेरिका काय , कोणतीही परदेशवारी करून आलेला माणूस आठवणीने एक चॉकलेट सोबत नक्कीच घेऊन येतो ते म्हणजे 'किसेस' ! किसेस चॉकलेट वाटल्याशिवाय परदेशवारीचे पुण्य मिळत नाही असा एक अलिखित सामाजीक संकेत आहे. ते छोट्याश्या मोदकासारखे दिसणारे , बारीक कागदाची शेंडी असलेले किसेस सगळ्यांना वाटले की परदेश वारीचा समारोप झाला असेच समजले जाते. खरं सांगायचं तर पुण्यात जसे 'वाटण्याचे' पेढे मिळतात तसेच हे 'वाटण्याचे चॉकलेट' आहे. पण या चॉकलेटचा इतिहास भारीच गमतीदार आहे.इतिहास म्हटला की वाचायचा कंटाळा येईल म्हणून किसेसच्या काही गंमतीदार गोष्टीच इथे वाचूया !   

 

 

KISSES ची निर्मिती १९०७ साली झाली. १९२१ पर्यंत चॉकलेट हातानी कागद गुंडाळूनच बांधले जायचे.चॉकलेटच्या डोक्यावरून डोकावणारी   कागदी 'शेंडी'तेव्हापासूनच आहे. त्या कागदाच्या लेबलला 'प्लम' असे म्हटले जाते.हे चॉकलेट कंपनीची अधिकॄत निर्मिती आहे हे दर्शवण्यासाठी त्यावर 'हर्शीज' छापलेले असते.नंतरच्या काळात हर्शीजच्याऐवजी 'किसेस' छापण्याची पध्दत सुरु झाली. सुरुवातीला कागदात पॅक होणारं चॉकलेट काही वर्षांनी 'अ‍ॅल्युमिनियम फॉइल'मध्ये गुंडाळायला सुरुवात झाली. दुसर्‍या महायुध्दात अ‍ॅल्युमिनियमची चणचण झाल्यावर चार वर्षं या चॉकलेटची निर्मिती बंदच झाली होती.२००७ साली या चॉकलेटच्या निर्मितीला १०० वर्षं पूर्ण झाली तेव्हा हर्शीजने शताब्दी साजरी करण्यासाठी एकच मोठ्ठे 
'किसेस' बनवले होते. या चॉकलेटचे वजन होते ३०५४० पाउंड म्हणजे जवळजवळ१४००० किलो ! नेहेमी बाजारात मिळणारी ३० लाख चॉकलेट एकत्र केली तर जे वजन होईल त्या वजनाचे हे चॉकलेट होते. आता एक गमतीदार प्रश्न मनात येईल तो असा की साधंसं चॉकलेट इतकं लोकप्रिय झाल्यावर तसंच ड्युप्लिकेट चॉकलेट बाजारात  का आलं नसेल ? त्याचं उत्तर असं आहे की १९२४ साली हे मोदकासारखे डिझाइन लोकप्रिय झाल्यावर ते डिझाइन आणि 'किसेस' हे नाव अमेरिकन ट्रेडमार्क कायद्याखाली नोंदणीकृत करण्यात आलं. त्यामुळे त्यासारखं दुसरं चॉकलेट बाजारात आलंच नाही.

भारतासारख्या देशात जेव्हा असं चॉकलेट बनवायची वेळ आली तेव्हा त्याला किसमी Kismiअसं नाव पार्ले कंपनीने दिलं.हीच संकल्पना कॅडबरीने वापरायची ठरवली तेव्हा त्यांनी असं काही नाव न वापरता एक नवी कविता वापरली.

Kiss Me, Close Your Eyes And Miss Me !
I Can Wet Your Lips, On Your Fingertip
And Happiness In Your Eyes Kiss Me !!

अजूनही या चॉकलेटचं नाव 'किसेस' का आहे याचं उत्तर तुम्हाला मिळालं नसेल तर ते आता सांगतो.या नावाचा 'रोमान्स' सोबत काहीही संबंध नाही. १९२१ पर्यंत ही चॉकलेटं हातानी कागदात गुंडाळली जायची. १९२१ साली ऑटोमॅटीक मशीनच्या साह्याने निर्मिती सुरु झाली.या ऑटोमॅटीक मशीनवर तयार झालेली चॉकलेटं एका यांत्रिक हाताने उचलून जेव्हा कन्व्हेयर बेल्ट्वर ठेवली जातात तेव्हा जो आवाज येतो तो आवाज 'किसेस'असा येतो म्हणून त्याचं नाव 'किसेस'! सक्शन पंप आणि न्युमॅटीक मशीन वापरणार्‍या आमच्या वाचकांना हा आवाज काही नवा नाही.

 

आता शेवटचा प्रश्न आजच्या शिर्षकाचा ! सात कोटी किसेसचा ! त्याचं उत्तर असं आहे की शंभर वर्षं  उलटून गेली तरीहि या चॉकलेटची लोकप्रियता अखंड आहे.आजच्या तारखेस हर्शीज कंपनी रोज सात कोटी चॉकलेट बनवते आणि विकते !  तात्पर्य काय तर प्रेम अमर आहे पण ते सांगायला चॉकलेटचा खर्च करावाच लागतो. 

सबस्क्राईब करा

* indicates required