computer

बंदुकीच्या गोळीने पोटाला छिद्र पडलं आणि रसायनशास्त्राचा इतिहासच बदलला !!

इतिहास उकरून बघितला तर समजेल जगात जेवढे म्हणून शोध लागले त्यातले बरेचसे अपघातानेच लागले आहेत. आज आम्ही जी गोष्ट सांगणार आहोत ती सुद्ध अशाच एका अपघातातून लागलेल्या शोधाची गोष्ट आहे.

ही गोष्ट आहे डॉक्टर विल्यम ब्यूमॉन्ट यांची. त्यांनी पचनक्रिया काम कशी करते हे शोधून काढलं. त्यांना हा शोध कसा लागला ते पाहू.

(डॉक्टर विल्यम ब्यूमॉन्ट)

१८२२ साली अॅलेक्सीस मार्टिन नावाचा कॅनिडीयन माणूस होऊन गेला. तो नाविक होता. अमेरिकेतल्या लोकर कंपनीसाठी तो काम करायचा. तो एकदा मिशिगनच्या मॅकीना बंदरावरील कंपनीच्या दुकानाजवळ उभा होता, त्यावेळी एका व्यक्तीच्या बंदुकीतून चुकून गोळी झाडली गेली. ती गोळी अॅलेक्सीस मार्टिनच्या डाव्या बाजूच्या बरगडीखाली लागली. परिणामी त्या भागात एक छिद्र तयार झालं. शिवाय हाडं मोडली गेली, फुफ्फुसाला आणि पोटाला इजा झाली. गोळी लागल्यामुळे त्या भागात इतकी गंभीर दुखापत झाली होती की खाल्लेलं अन्न त्या छिद्रातून बाहेर येऊ लागलं.

एलेक्सीस मार्टिनच्या सहकाऱ्यांनी उपचारासाठी डॉक्टर ब्यूमॉन्ट यांना पाचारण केलं. डॉक्टर ब्यूमॉन्ट यांनी मार्टिनवर उपचार तर केले, पण हेही सांगितलं की तो ३६ तासांपेक्षा जास्तकाळ जगणार नाही. आश्चर्य म्हणजे मार्टिन जगला. दिवसेंदिवस तो बरा होत गेला. इथे गोष्टीत एक ट्विस्ट आहे.

(अॅलेक्सीस मार्टिन)

मार्टिनची प्रकृती ठीक होत होती. पुढच्या १० महिन्यात त्याची जखम भरून आली, पण बऱ्याच शस्त्रक्रियेनंतरही पोटाचं छिद्र बंद होत नव्हतं. या कारणाने मार्टिनला अन्न घेता येत नव्हतं. मार्टिनची ही समस्या होती तर डॉक्टर ब्यूमॉन्ट यांच्या डोक्यात वेगळंच सुरु होतं. त्यांनी याला एक संधी म्हणून बघितलं. त्यांच्यासाठी हे छिद्र म्हणजे माणसाच्या पचनसंस्थेचा अभ्यास करण्याचा मार्ग होता.

मंडळी, त्याकाळी पचनक्रियेसंबंधी दोन सिद्धांत होते. पहिला सिद्धांत असा, की पचनक्रिया ही यांत्रिक पद्धतीने चालणारी क्रिया आहे. दुसरा सिद्धांत असा की ही एक रासायनिक प्रक्रिया आहे. म्हणजे पोटातील जठररस (gastric juice) अन्न पचवतो.

दोन्हीपैकी कोणता सिद्धांत बरोबर आहे हे तपासण्यासाठी ब्यूमॉन्ट यांनी मार्टिनचा वापर गिनिपिग सारखा केला. त्यांनी त्या छिद्रातून अन्न आत ढकललं आणि एका ठराविक वेळेने ते बाहेर काढलं. आपण मासे पकडण्यासाठी दोरीला अन्न बांधून ते पाण्यात टाकतो तसा प्रकार त्यांनी जिवंत माणसासोबत केला होता. एका दोरीला ते मटणाचे लहानलहान तुकडे बांधायचे आणि ते छिद्रातून आत सोडायचे. ते वेगवेगळ्या वेळाने बाहेर काढले जायचे. त्या तुकड्यांमध्ये होणारा बदल तपासला जायचा. या प्रक्रियेचा संपूर्ण लेखाजोखा ब्यूमॉन्ट ठेवत होते.

आजच्या काळात पोटातील जठररसाची तपासणी करणे हे अगदी सामान्य काम झालेलं आहे, पण त्याकाळी इतिहासात हे पहिल्यांदाच घडत होतं. ब्यूमॉन्ट यांनी मार्टिनच्या जठररसाचे काही नमुने तपासासाठी पाठवले होते. या सगळ्या संशोधनाच्या शेवटी ब्यूमॉन्ट यांनी इतिहास घडवला. त्यांनी हे सिद्ध केलं की पचनक्रिया ही “रासायनिक” क्रिया आहे.

मंडळी, या संशोधनाने आणखी एका गोष्टीकडे त्यावेळच्या संशोधकांच लक्ष वळवलं. ते म्हणजे रुग्णाची तपासणी करणे आणि त्याची निरीक्षणे नोंदवणे. आजच्या काळात ही पद्धत सर्वसामान्य आहे. साधा ताप आला तरी डॉक्टर स्टेथोस्कोपने रुग्णाला नीट तपासतो, डोळे, घसा यांची तपासणी होते आणि मग औषधं दिली जातात. ब्यूमॉन्ट यांच्या काळात डॉक्टर रुग्णाला न बघताही आजाराचं निदान करायचा. बरेचदा ही निदानाची पद्धत १६०० वर्ष जुन्या ग्रीक उपचारपद्धतीवर आधारलेली असायची. ब्यूमॉन्ट यांनी ज्या प्रकारे संशोधन केलं ती क्रांतिकारी होती.

मंडळी, या गोष्टी मागची एक गोष्ट सांगायची तर राहूनच गेली. डॉक्टर ब्यूमॉन्ट यांनी अॅलेक्सीस मार्टिनवर संशोधन केलं आणि इतिहास घडवला, पण ही प्रक्रिया दिसते तेवढी ऐतिहासिक नव्हती. याची मानवी बाजू अशी की ब्यूमॉन्ट यांनी मार्टिनला जवळजवळ १ वर्ष घरात डांबून ठेवलं होतं. ब्यूमॉन्ट स्वतः त्याला खाऊपिऊ घालायचे, त्याची मलमपट्टी करायचे. या दरम्यान मार्टिनला त्याच्या बायकोशी आणि मुलांशी भेटायची परवानगी नव्हती. ब्यूमॉन्ट यांनी मार्टिनला आपल्याकडेच ठेवण्याचा खूप आटापिटा केला. त्यांनी मार्टिनला घरगडी म्हणून पण ठेवलं होतं. कारण अर्थातच संशोधन हे होतं.

१८३४ पर्यंत म्हणजे दुर्घटनेच्या १२ वर्षांनी मार्टिनने यशस्वीपणे आपली सुटका करून घेतली. त्यानंतरही ब्यूमॉन्ट यांनी मार्टिनला परत आणण्याचे प्रयत्न केले, पण त्यात यश आलं नाही. अखेरी १८५३ साली ब्यूमॉन्ट यांचा मृत्यू झाला. मार्टिन पुढची २७ वर्ष हयात होता. तो ८३ व्या वर्षात या जगातून गेला.

तर मंडळी, संशोधनाचा इतिहास अशाच चमत्कारिक व विचित्र माणसांनी/घटनांनी भरलेला आहे. अशा आणखी कथा आम्ही तुमच्यापर्यंत पोचवत राहू. तोवर ही कथा कशी वाटली ते नक्की सांगा.